P. Sainath Agrowon
ॲग्रो विशेष

P. Sainath : शेतकरी नव्हे; मानवी संस्कृती धोक्यात

Latest Agriculture News : दिशाहीन सरकारी धोरणांमुळे शेतकरी नव्हे; तर भारतातील मानवी संस्कृती संकटात आहे. सरकार केवळ अदानी, अंबानींचे ऐकते आहे.

Team Agrowon

Pune News : दिशाहीन सरकारी धोरणांमुळे शेतकरी नव्हे; तर भारतातील मानवी संस्कृती संकटात आहे. सरकार केवळ अदानी, अंबानींचे ऐकते आहे. देशात गरीब आणि शेतकऱ्यांना वाली राहिलेला नाही.

आता विश्वगुरुचे हुकूमशाहीचे पर्व सुरु आहे. आपल्याला केवळ संविधान वाचवेल. त्यासाठी संघटितपणे लढा द्यावा लागेल,’’ असे परखड मत रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी मांडले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त महात्मा गांधी निधीतर्फे पुण्याच्या गांधी भवनात आयोजित व्याख्यानमालेत गुरुवारी (ता. ५) ‘आजचे वर्तमान आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव जांबुवंत मनोहर, संघटक अप्पा अनारसे, संदीप बर्वे उपस्थित होते.

“आतापर्यंत शेतकरी व ग्रामीण व्यवस्थेला केवळ कोरोना नव्हे तर एकूण तीन मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. १९९१ चे उदारीकरण, २०२० मधील कोरोना आणि आताची असमानता ही सर्वात मोठी संकटे आहेत. देशाच्या ग्रामीण भागात जगण्यासाठी साधन नाही.

चुकीच्या सरकारी धोरणांमुळे लाखो लोक गाव सोडून शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. ग्रामीण उपजीविकेच्या पारंपरिक व्यवस्था नष्ट झाल्या आहेत. शेतमजूर व्यवस्था, बलुतेदारी उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या दोन दशकात चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषी व्यवस्थेवरील संकटावर उपाय करण्याऐवजी ते दाबून टाकले जात आहे,” अशी खंत श्री. साईनाथ यांनी व्यक्त केली.

‘‘उदारीकरणानंतर सर्वात आधी शेतकरी नव्हे; तर गावांमधील बलुतेदारी व्यवस्थेत आत्महत्यांची प्रकरणे घडली. आंध्र प्रदेशात ते घडत असताना संसदेत प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर गवंड्यांचे भूकबळी चालू झाले होते. गावागावातील वस्तू देवाणघेवाण आधारित व्यवस्था कोलमडून पडली.

परंतु, या समस्यांकडे कोणीही गांभिर्याने पाहिले नाही. कोरोना काळात ४० लाख मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, सरकार केवळ साडे चार लाख मृत्यू झाल्याचा दावा करीत होते. कोट्यवधी जनता विस्थापित झाली. तरीही सर्व आलबेल असल्याचा दावा केला गेला. विश्वगुरु बोलते तेच सत्य धरले जात असल्यामुळे कोरोनातील लाखो मृत्युंबाबत कोणत्याही माध्यमाने प्रश्न उपस्थित केला नाही,’’ अशी चिंता श्री. साईनाथ यांनी व्यक्त केली.

‘असमानतेचे संकट कोरोनापेक्षाही मोठे’

‘‘देशातील असमानतेचे संकट कोरोनाच्या लाटेपेक्षाही मोठे आहे. माध्यमे आता कॉर्पोरेट जगताची बटिक बनली आहेत. असमानतेमुळेच देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी अब्जाधीशांची संख्या मात्र दुप्पट, तिप्पट होताना दिसते आहे.

कोरोनात गरीब व शेतकरी भरडला जात होता. देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) कोसळत असताना नवे अब्जाधीश आरोग्य क्षेत्रात तयार झाले. देशाची लूट करून अब्जाधीश वाढत असल्यास शेतकऱ्यांचा उद्धार होणार नाही,’’ असा इशारा पी.साईनाथ यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT