Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस नाही. त्यात कृषिपपांचा वीजपुरवठा विस्कळित आहे. तासभरदेखील सुरळीत वीज मिळत नाही. ढगाळ वातावरणामुळे सौर कृषिपंपदेखील चालत नाहीत. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही उगवलेली खरीप पिके जगविण्यासाठी पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
परभणी, हिंगोली जिल्ह्यात जूनमध्ये आजवर अपेक्षित सरासरी पावसाच्या ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या आशेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केलेला कापूस, हळद, पेरणी केलेले सोयाबीन, मूग, तूर आदी खरीप पिके तसेच ऊस, केळी, भाजीपाला, फळ पिकांना पाण्याची गरज आहे.
परभणी जिल्ह्यात महावितरणअंतर्गत मेअखेर एकूण १ लाख ११२२ कृषिपंपांना वीज जोडण्या दिलेल्या असून २ हजार १५० जोडण्या प्रलंबित आहेत. हिंगोलीत महावितरणकडून कृषिपंपांच्या ८० हजार ७७० वीजजोडण्या दिलेल्या असून २ हजारांवर जोडण्या प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या वीजवापर केला जात आहे.
त्यामुळे अधिकृत ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. दाब वाढल्याने वीज वाहक तारा तुटत आहेत. त्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेच्या अतिरिक्त वापरामुळे रोहित्र बिघडत आहेत. रोहित्रावरील बॉक्सची दुरवस्था झाली आहे. फ्यूजची तुटफूट झाली आहे. त्यांची देखभाल दुरुस्ती नियमित केली जात नसल्यामुळे योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नाही.
सौर कृषिपंपधारक अडचणीत
परभणी जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत १ हजार ३६ तर पीएम कुसुम योजनेत १३ हजार ६०१ सौर कृषिपंप स्थापित करण्यात आले. १० हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषिपंप आणि पीएम कुसूम सौर कृषिपंप योजनेत ५ हजार ८७४ पंप स्थापित असून साडेचौदा हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत.
वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सौर कृषिपंप पॅनेलचे नुकसान झाले. परंतु दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. ढगाळ वातावरणामुळे सौर कृषिपंपदेखील चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हळद चार एकर लागवड केली. एकरभर मूग पेरणी केली. आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस नाही. मुगाला तुषार सिंचनने तर हळदीला ठिबक सिंचनने पाणी देत आहोत. सौर पंप आहे. इतर शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा सुरळीत व्हावा.- बाजीराव शेवाळे, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी
पाऊस खूप कमी आहे. कपाशी १ एकर, १८ एकर सोयाबीन, अडीच एकर हळद लागवड केली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. ढगाळ वातावरणात सौर कृषिपंप चालत नाहीत.- गोरखनाथ हाडोळे, भोसी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.