Water Conservation Mission Maharashtra : जलतारा संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर लोकसहभागासाठी शासन यंत्रणेने जोरदार प्रयत्न सुरू केले. पण लोकांचा प्रतिसाद यथातथाच होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक समाजसेवी आणि स्वयंसेवी संस्थांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
आज मागे वळून पाहताना जलतारा चळवळीत स्वयंसेवी संस्थांच्या योगदानाबद्दल प्रशासनातील सर्वच अधिकारी भरभरून बोलत आहेत. स्वतः एस.डी.ओ. देवकर मॅडम यांनीही त्यांचे कौतुक केले. प्रशासनाला मिळालेल्या त्यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच वाशीम तालुका सर्व जिल्ह्यामध्ये आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
वाशीम जिल्ह्यात मारशेटवार गुरुजी आणि त्यांचे दोन्ही उच्चशिक्षित चिरंजीव गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाज घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात. रविभाऊ मारशेटवार हे पूर्ण वेळ समाजसेवेत असून, अविनाश मारशेटवार हे स्थापत्य अभियंते असून, तेही हिरिरीने सामाजिक कार्य करतात. जलतारा प्रकल्पाच्या विस्तारासाठी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत ते गावागावात जाऊ लागले.
जलतारा योजना व त्याच्या फायद्याची माहिती दिली. पण त्यांनी ठरल्याप्रमाणे उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांसाठी बक्षिसेही जाहीर केली. पुढाकार घेऊन स्वतःच्या गावात ३०० पेक्षा जास्त जलतारा तयार करून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘वॉटर हिरो’ अशी नवी उपाधी दिली.
त्यांच्यासह त्या गावात खोदकाम यंत्र चालविणाऱ्या चालकांचा सत्कार चांदीचा शिक्का, शेला आणि मिठाई देऊन करण्यात येऊ लागला. प्रत्येक गावभेटीवेळी उत्तम काम करणाऱ्या ‘वॉटर हिरों’ना प्रोत्साहन दिले जाईल. परिणामी गावोगावी उत्साह निर्माण झाला. सर्वात जास्त जलतारा करून घेणाऱ्या ‘वॉटर हिरो’ला त्यांनी विमान प्रवासाचे बक्षीस जाहीर केले. तामसाळा (ता. जि. वाशीम) या गावात सर्वात जास्त जलतारा करून घेणारे सात वॉटर हिरो होते. त्यांनी ते बक्षीस पटकावले.
समाजोपयोगी उपक्रमात आघाडीवर असणारे डॉ. हरीश बाहेती यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत त्यांच्या अनुयायांनाही या उपक्रमात सामील करून घेतले. जिल्ह्यातील तीन गावांत सामाजिक विषयावर कीर्तन करणाऱ्या आळंदी येथील डॉ. पानेगावकरांच्या जलकीर्तनाचे आयोजन केले गेले. त्याचा वारकरी संप्रदायातील लोकांबरोबरच अन्य लोकांवरही सकारात्मक प्रभाव पडला.
लोकांच्या प्रबोधनासाठी दिव्यांग व्यक्तींनी चालविलेल्या ‘चेतन सेवांकूर’ या ‘वाद्यमेळा’चे (ऑर्केस्ट्राचे) प्रयोग काही गावांत सादर झाले. योगशिक्षिका सौ. वानखेडे ताईंनी आपल्या पतंजली परिवाराबरोबरच जिल्ह्यातील श्री फाउंडेशन, आस्था फाउंडेशन, ओॲसिस ग्रुप, नारी शक्ती, टेकाळे ग्रुप, राजे ग्रुप, रेडिओ वत्सपुल्म, सर्वधर्म मित्रमंडळ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, समता फाउंडेशन, आरजे ग्रुप, जलताराचे फॅक्ट फाउंडेशन अशा असंख्य संस्था, कार्यकर्त्यांना जोडून घेतले. जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले.
कोण जास्त जलतारा करतो याची गावागावात स्पर्धा लागली होती. काही जलताराचे शोषखड्डे मनरेगाअंतर्गत, तर अनेक लोकांनी स्वयंप्रेरणेने स्वखर्चाने तयार केले. आर्थिकदृष्ट्या शक्य नसलेल्या काही लोकांना दानशूरांकडून मदत मिळवून देण्यात आली.
अनेक गावांत खुदाई यंत्रांची उपलब्धता केली गेली. त्यामुळे कमी वेळात अधिक काम करणे शक्य झाले. या साऱ्या नियोजन व अंमलबजावणीत गावोगावच्या ‘वॉटर हिरों’नी महत्त्वाची भूमिका बजावली. गावागावात ३१ मेपर्यंत सर्वाधिक जलतारा बनविण्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या.
त्यामध्ये जिल्हा पातळीवर तीन, तालुका पातळीवर तीन तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले. तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५१५०० रुपये, दुसरे बक्षीस ३११३१ रुपये, तर तिसरे २११२१ रुपये जाहीर केले होते. तर जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १,११,१११ रुपये, दुसरे ७७,७७७ रुपये तर तिसरे बक्षीस ५५,५५५ रुपये असे होते.
बक्षिसाची रक्कम ज्येष्ठ समाजसेवी मारशेटवार गुरुजी मित्र मंडळ’ ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ‘आस्था फाउंडेशन व इतर या संस्थांनी मिळून गोळा केली. वैयक्तिक पातळीवरही लोकांनी मोठ्या रकमा दिल्या. डॉ. हरीश बाहेती यांनी नऊ लाख तीस हजार रुपयांची बक्षिसांची रक्कम जमविण्याची जबाबदारी घेतली. राजकीय कार्यकर्ते राजू पाटील व ॲड. बाकलीवाल यांनी प्रत्येकी एक लाख रुपये दिले.
वास्तुतज्ज्ञ डॉ. अर्चनाताई मेहकरकर या गेली सत्तावीस वर्षे दर महिन्याला त्यांच्या उत्पन्नातला ठरावीक हिस्सा समाजकार्यासाठी देतात, त्यांनीही या कामासाठी पैसे व वेळ दिला. काही सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वतः पैशांचे योगदान दिले.
वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती, खदान युनियन, ओॲसिस ग्रुप, नारीशक्ती फाउंडेशन, आस्था फाउंडेशन यांचे भरीव आर्थिक योगदान आहे. रिसोड तालुक्यात समता फाउंडेशनने काम केले. सर्व रक्कम मिळून पंचवीस लाख रुपयांपर्यंत पोहचली.
लोकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी आर्थिक बक्षिसांसोबतच अन्य कल्पक योजनाही राबवल्या गेल्या. उदा. गावात पाचशे जलतारा झाले तर दुसऱ्या दिवशी उपजिल्हाधिकारी त्या गावातील लोकांसोबत चहापाणी करतील, तर हजाराच्या पुढे आकडा गेला तर खुद्द जिल्हाधिकारी गावकऱ्यांसोबत चहापाणी घेतील. उच्च अधिकारी गावात येऊन कामाचे कौतुक करणार म्हटल्यावर लोकांनीही उत्साहाने काम केले.
चक्क ३१ मे च्या रात्री बारापर्यंत लोक अधिकाधिक शोषखड्डे करण्यात गर्क होते. परवेज शेख या कार्यकर्त्याने रात्रंदिवस ध्यास घेऊन काम केले. जिल्ह्यातील कामावर जास्तीत जास्त जलतारा कसे होतील यासाठी समन्वयकाच्या कामासह आर्थिक हिशोब ठेवण्याची जबाबदारी सांभाळली. यासाठी जिल्हाधिकारी मॅडम यांनी परवेझ यांचे जाहीर कौतुक ही केले.
प्रत्येक जलतारा नोंदविला जिओ टॅगिंगने...
प्रत्येक गावातील प्रत्येक जलतारा व्यवस्थित मोजला जावा, त्यात पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून त्यांचे जिओ टॅगिंग केले. त्यासाठी ‘वॉटर हिरो’ शासन यंत्रणेला मदत करत होते. त्यामुळे रोज रात्री प्रत्येक गावातील त्या दिवशी झालेल्या जलताराची नोंद घेऊन, झालेल्या जलताऱ्यांची गणती सर्वांसमोर मांडली जाई. त्यामुळे पारदर्शकता आली. स्थानिक लोकांना व प्रशासनालाही पुढील नियोजन व उपाययोजना करणे सोपे झाले. मागे पडलेल्या गावांना बरोबरीला आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था, उत्साही कार्यकर्ते व प्रशासन मदत करत होते.
अडचणीतून काढला मार्ग
बहुतेक गावांमध्ये विहिरींची कामे झालेली असल्याने दगड गोटे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. पण काही परिसरात खड्ड्यात भरायला दगड गोटे उपलब्ध नव्हते. मग तेथील शेतकऱ्यांनी अधिक कल्पकता दाखवत दगडांऐवजी शेतातला काडीकचरा विशेषतः कपाशीच्या पऱ्हाट्या आणि तुरीच्या तुराट्या खड्ड्यात टाकल्या.
त्यामुळे पाणी गाळण्याची प्रक्रिया तर होईलच, पण त्याचे वर्षभरात कुजून खत तयार होईल. एका शोषखड्ड्यातून सुमारे एक ट्रॉली कंपोस्ट खत उपलब्ध होईल. वाशीमच्या कृषी अधिकाऱ्यांनी या उपक्रमालाही वैशिष्ट्यपूर्ण नाव दिले आहे- ‘वत्सगुल्म कंपोस्ट रिचार्ज पीट’!
(वत्सगुल्म हे वाशीमचे प्राचीन नाव. ती वाकाटक राजांची राजधानी होती.)
- सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.