Safflower - PBNS 184 Variety
Safflower - PBNS 184 Variety Agrowon
ॲग्रो विशेष

करडईचे नवीन वाण का आहे फायदेशीर ?

Team Agrowon

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने करडईचं (Safflower) नवीन वाण विकसित केले आहे. पीबीएनएस - १८४ (PBNS 184)असे या वाणाचे नाव आहे. या वाणाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यामधील कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पूर्वी करडईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. परंतु हळूहळू करडईचे क्षेत्र घटत गेले. सरकारच्या धोरणांमुळे किफायतशीर भाव न मिळणे हे त्यामागचे एक कारण आहे. तर दुसऱ्या बाजूला करडईत नवीन वाण नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन आणि काढणीत अनेक अडचणी यायच्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा कमी झाला. परंतु गेल्या काही वर्षांत आरोग्याबद्दल जागरूकता वाढली. त्यामुळे करडई तेलाला मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा एकदा करडईकडे वळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर परभणीच्या विद्यापीठाने विकसित केलेले नवीन वाण महत्त्वाचे ठरणार आहे.

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंमी खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. अवर्षणप्रवण आणि जिरायती क्षेत्रात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बऱ्याच वेळेला हे पीक दुष्काळात सापडते त्यामुळे पाण्याचा ताण पडतो. काही भागात हे पीक आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून घेतले जाते. त्यामुळे पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष होते. खरीप पिकानंतर उशिरा पेरणीमुळे मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तसेच सुधारित जातीच्या बियाण्यांचा अभाव यासारख्या कारणामुळे करडईचे उत्पादन कमी येते.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत अखिल भारतीय बियाणे संशोधन प्रकल्पाद्वारे करडईचे अधिक उत्पादन देणारे पीबीएनएस - १८४ हे वाण विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये तेलाचे प्रमाण, रोग व कीड प्रतिकारक्षमता, पक्वता या सर्व निकषांवर पीबीएनएस - १८४ हे वाण इतर प्रचलित तुल्यबळ (चेक) वाणांपेक्षा सरस आढळून आले. त्यामुळे हैदराबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालयाने या वाणाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमधील कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस केली आहे.

काय आहेत पीबीएनएस १८४ वाणाची वैशिष्ट्ये ?

- पीबीएनएस १८४ या वाणाची प्रचलित परभणी १२ व अन्यगिरी - १ या तुल्यबळ वाणाबरोबर (चेक) अखिल भारतीय स्तरावर उत्पादन चाचण्या घेण्यात आल्या. पीबीएनएस १८४ या वाणांमध्ये या दोन वाणांच्या तुलनेत अनुक्रमे १०.६० व १३.७० टक्के अधिक तेलाचे उत्पादन मिळाले आहे. पीबीएनएस १८४ या वाणामध्ये ३१.३ टक्के तेलाचे प्रमाण आहे. करडईच्या इतर कोणत्याही वाणापेक्षा ते जास्त आहे.
- जमिनीतून उद्भवणाऱ्या मर रोगास तसेच पानावरील ठिपके रोगास हे वाण सहनशील आहे.
- दाणे टपोरे असून कोरडवाहू लागवडीमध्ये १२० ते १२३ दिवसांत काढणीस तयार होते.

नवीन वाण का विकसित करावे लागले ?


- करडई तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलांपेक्षा बरेच कमी असते. त्यामुळे हृदयरोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. म्हणूनच करडई तेलाची बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन पीबीएनएस १८४ हे वाण विकसित करण्यात आले आहे.

- मावा ही करडई पिकावरील प्रमुख कीड आहे. त्यामुळे उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट येते. हे वाण मावा किडीस सहनशिल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या किडनाशकाच्या एक ते दोन फवारण्या वाचतात. याशिवाय उत्पादनही वाढते. तुल्यबळ वाणापेक्षा पीबीएनएस १८४ या वाणाचे १० टक्के जास्त उत्पादन मिळाले.

- मर रोगामुळे करडई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नवीन वाण मर रोगास सहनशील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT