Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. इगतपुरी व घोटी या दोन्ही महसूल मंडलांत गुरुवारी (ता. २९) गेल्या २४ तासांत १५५ मिमी पाऊस नोंदविला गेला.
गेल्या सात दिवसांपासून येथे संततधार पाऊस सुरू आहे. शिवाय पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतही पावसाचा जोर आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या कामाला वेग येऊ लागला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पाऊस परिस्थितीच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रावर पडणाऱ्या प्रभावाआधारित अंदाज बुधवारी (ता. २८) देण्यात आला होता.
त्यानुसार २८ व ३० जून रोजी घाट विभागात जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती. इगतपुरी तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरल्याने घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे ग्रामीण भागासह पाणलोट क्षेत्रांतही संततधार कायम होती.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने भात पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारमुळे जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाणा, बोरगाव, मनखेड व बाऱ्हे या महसूल मंडलांत पावसाचा जोर दिसून आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वर, वेळूंजे व हरसूल या महसूल मंडलांतही पावसाने जोरदार हजेरी लावली.
तुलनेत पेठ तालुक्यात पाऊस काहीसा कमी होता. पेठ, जोगमडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली तर कोहोर परिसरात पावसाचा जोर कमी राहिला. दिंडोरी तालुक्यातील ननाशी महसूल मंडलात पावसाने जोरदार हजेरी लावली.
सटाणा तालुक्यातील मुल्हेर परिसरात व जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव तालुक्यात हिसावळ महसूल मंडलातही जोरदार पाऊस बरसला. तर निफाड, सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यांतही पावसाच्या अधूनमधून सरी सुरू असल्याने सध्या शेतकऱ्यांना पेरणी योग्य परिस्थिती होऊ लागली आहे. कळवण व सटाणा तालुक्यांतही पावसाच्या सरी सुरू होत्या.
भात, नागली, वरई रोपनिर्मितीची तयारी
जिल्ह्याचे पश्चिम पट्ट्यातील मुख्य पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील भात, नागली, वरई उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. मात्र आता पाऊस सुरू झाल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक शिवारे गजबजली असून शेतकरी कामात व्यग्र झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.