Nagpur News : साथी (सीड ट्रेसेबिलीटी, ऍथेन्टीकेशन ॲँण्ड होलेस्टिक इन्हेंटरी) पोर्टलच्या माध्यमातून बियाणे विक्री व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे त्याबाबतची सक्ती कृषी सेवा केंद्रधारकांना करण्यात येऊ नये, अशी मागणी नागपूर डिस्ट्रिक्ट ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष निशिकांत पदमावार, सचिव शरद चांडग, कोशाध्यक्ष विजय लोहिया यांच्या नेतृत्वात या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार खरीप आणि रब्बी हंगामात बियाणे विक्री एका ठराविक कालावधीपूरती मर्यादित राहते. अशावेळी पोर्टलवरील तांत्रिक बाबींमध्ये गुतूंन पडल्यास व्यापारावर त्याचा परिणाम होणार आहे.
बियाणे उत्पादक कंपनीकडून २५ टन मालाची गाडी आल्यास त्या गाडीतील संपूर्ण बियाणे बॅगवरील टॅग तसेच लॉट क्रमांकाची पडताळणी करणे शक्य होणार नाही. वितरकाला गाडीतील २० ते २५ टन मालाचा पुरवठा २० ते २५ किरकोळ विक्रेत्यांना करावा लागतो. या सर्वांचे लॉट व टॅग नंबरप्रमाणे डिलिव्हरी मेमो पोर्टलवर नोंदवित बिल तयार करणे व्यवहारिकरित्या शक्य नाही.
ग्रामीण भागात ७० टक्के कृषी सेवा केंद्रधारक खुद चालक-मालक या धर्तीवर व्यवसाय करतात. एकट्या व्यक्तीला पोर्टल हाताळत व्यवसाय करणे अवघड होणार आहे. एकाच गावातील अनेक शेतकरी एकत्रित बियाणे खरेदी करतात.
त्याकरिता एकाच वाहनधारकाला बियाणे आणण्यासाठी पाठविले जाते. अशावेळी त्या वाहनधारकास त्याच टॅग किंवा लॉट नंबरचे बियाणे देणे शक्य होत नाही. वाहनधारक एक ते दोन दिवस उशिरा आल्यास अशावेळी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नागपूर डिस्ट्रिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले.
साथी पोर्टलवर सत्यप्रत बियाण्यांसदर्भाने माहिती भरणे व्यावहारिक नसल्याचे कृषीसेवा केंद्रधारकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीतून प्रबोधन केले जाईल. अडचणी सोडविण्याचे याव्दारे प्रयत्न होतील.- रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.