Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग स्थगित करण्याच्या हालचाली

Land Acquisition : अनेक भागांतून वाढता जनक्षोभ पाहून प्रस्‍तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग स्थगित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : अनेक भागांतून वाढता जनक्षोभ पाहून प्रस्‍तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग स्थगित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महामार्गाला विरोध करून राज्य सरकारमधील मंत्री व अन्य लोकप्रतिनिधींनी हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याने राज्य सरकार विधानसभा निवडणूका होईपर्यंत तरी हा निर्णय स्थगित ठेवण्याच्या विचारापर्यंत आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. मात्र स्थगिती न देता हा महामार्ग रद्द करण्याच्या भूमिकेवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी ठाम आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपयशाला सामोरे जावे लागले. दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याचा फटका बसू नये, यासाठी राज्य सरकार किमान निवडणुका होईपर्यंत तरी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया स्थगित ठेवण्याची शक्यता आहे. ८०२ किलोमीटरचा ८६ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग आहे. मार्चमध्ये सरकारने या प्रश्नी अधिसूचना काढल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्‍या.

सुमारे बारा जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग अनावश्यक आहे. हजारो हेक्टर जमीन या महामार्गामुळे खराब होणार आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांकडून महामार्गाला विरोध होत आहे.

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महामार्ग सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगितले होते. निवडणुकीपूर्वीपासून याला विरोध सुरू होता. निवडणुकीत सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर प्रचंड नाराजी व्यक्‍त झाली होती.

लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारची पिछेहाट झाल्यानंतर राज्य सरकारमधील नेत्यांनी सावध भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र झाले. निवडणुकीपूर्वी मौन बाळगलेल्या महायुतीतील मंत्री व लोकप्रतिनिधींनी निकालानंतर मात्र आंदोलकांची बाजू घेत महामार्गाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली.

घरचाच आहेर मिळत असल्‍याने सध्या तरी राज्य सरकारने या प्रश्नी भूमिका मवाळ केली. नोटिसा काढण्याचे कामही थांबवले. या वर निर्णय घेण्याची ग्वाहीही कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. यानंतर वरिष्ठ पातळीवरून या महामार्गाच्या बाबतीतील प्रक्रिया तूर्त थांबविण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महामार्गाला स्थगिती नाही; तो रद्दच करावा, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि तीच मागणी आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा महामार्ग रद्द केला जाणारच आहे.
- आमदार सतेज पाटील, काँग्रेस गटनेते, विधान परिषद
सध्या निवडणुका आहेत म्हणून स्थगिती देण्यात येऊ शकते. निवडणुका झाल्या की, ऑक्टोबरनंतर पुन्हा महामार्ग आणतील. यामुळे महामार्ग रद्द होईपर्यंत या विरोधात लढा सुरू राहील. - राजू शेट्टी, माजी खासदार
- राजू शेट्टी, माजी खासदार
‘ठंडा करके खाओ’ अशी ही शासनाची चाल असावी; पण त्याला शेतकरी बळी पडणार नाहीत. या विरोधात आंदोलन सुरूच राहील.
- गिरीश फोंडे, समन्वयक, शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT