Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Team Agrowon

Solapur News : परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची ७२ तासाच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे, त्यानुसार जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्वसूचना दिली आहे. त्यात अक्कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश सर्वाधिक आहे. सध्या विमा कंपनीकडून संबंधित नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने अगदी सुरवातीपासूनच सातत्य ठेवले आहे. त्यामुळे खरीप पिके तशी चांगली होती. पण ऐन काढणीवेळीही त्याने आपली हजेरी कायम ठेवल्याने जोमदार आलेली पिके आता पाण्यात, चिखलात कोमेजून गेली आहेत. आधी मूग, उडदाच्या काढणीवेळी मोठे नुकसान झाले.

त्यानंतर पुन्हा सोयाबीन काढणीतही ऐनवेळी पावसाने फटका दिला. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आजही शिवारातच अडकून पडले आहे. त्याशिवाय कांदा, भुईमूग, तूर, बाजरी या पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांनी सूचना दाखल केल्या आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे आपत्कालीन परिस्थितीत असे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करता येतो. यंदा जिल्ह्यातील जवळपास ७ लाख ३३ हजार ३०३ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी नुकसानग्रस्त १ लाख २४ हजार ६८३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीच्या सूचना दाखल केल्या आहेत.

सर्वच तालुक्यांतून विमा कंपनीला पूर्वसूचना

पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांत सर्वाधिक बार्शी तालुक्यातील ३८ हजार ४६१, अक्कलकोटमधील ३२ हजार ५६२, माढ्यातील १४ हजार ४१९, मंगळवेढ्यातील १० हजार १२१, उत्तर सोलापुरातील ८ हजार ८०३, दक्षिण सोलापुरातील ६ हजार ४५७, करमाळ्यातील ६ हजार २०६, मोहोळमधील ४ हजार ८१२, माळशिरसमधील ३८५, पंढरपुरातील ४३२ आणि सांगोल्यातील २०२५ अशा एकूण १ लाख २४ हजार ६८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून सुरू आहेत. कृषी विभागाचे कर्मचारीही या कामात साह्य करत आहेत. या कामानंतर पंचनाम्याचा अहवाल विमा कंपनीकडे जाईल. त्यानंतर नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला जाईल.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

SCROLL FOR NEXT