Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेतील खरीप हंगाम विमा नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत एक कोटी तीन लाख अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून रोज नव्याने पाच लाखांहून अधिक अर्ज दाखल होत आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या खरिपात राज्यातून एकूण १.७० कोटी अर्ज आले होते. यंदा मात्र गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंत २.९९ लाख कर्जदार आणि एक कोटीहून अधिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, अर्जांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र अर्ज भरण्यासाठी अजून पाच दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण अर्ज संख्या दीड कोटीच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्यात खरिपाचे क्षेत्र १४२ लाख हेक्टरच्या पुढे आहे. पीकविमा काढण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क असूनही शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांची केवळ ६७.२३ लाख हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. पेरा झालेल्या खरीप पिकांवरील विमा संरक्षित रक्कम आताच ३२ हजार ९६८ कोटींच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्या अर्जांची संख्या बघता विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी भरपूर रक्कम पदरी पडणार आहे.
विमा कंपन्यांचा आतापर्यंत एकूण ५०७० कोटी रुपयांचा व्यवसाय निश्चित झालेला आहे. कंपन्यांना अनुदानापोटी राज्याकडून २९८५ कोटी रुपये; तर केंद्राकडून २०८४ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. अर्थात, गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत गुरुवारपर्यंत (ता. ११) शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभाग ६१ टक्क्यांच्या आसपास आहे. ही टक्केवारी अजून वाढू शकते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
जिल्हानिहाय आलेल्या अर्जांची संख्या
अहमदनगर ७,००,०८५, नाशिक २,९२,०१८, चंद्रपूर १,३९,९२९, सोलापूर ४,३४,११३, जळगाव २,१२,६८१, सातारा १,६२,१७८, परभणी ५,६३,८३५, वर्धा १,२०,३३२, नागपूर १,६३,३७५, जालना ६,६९,५८४, गोंदिया ९७,२९३, कोल्हापूर २०,९०५, नांदेड ७,९३,४६०, ठाणे ३२,७२६, रत्नागिरी ३,०२६, सिंधुदुर्ग ५,५६९, छत्रपती संभाजीनगर ८,४५,७७५, भंडारा १,०३,९२२, पालघर २०,७०९, रायगड ११,०३९, वाशीम ३,३१,०६३, बुलडाणा ४,६३,९१९, सांगली १,०९,८५२, नंदुरबार ३८,३८५, बीड १,२७,०७०१, हिंगोली ३,५५,८६३, अकोला २,५९,९९७, धुळे १,३०,५३०, पुणे १,४४,७७६, धाराशिव ५,७५,४०४, यवतमाळ ५,१६,९७१, अमरावती २,०५,७७५, गडचिरोली २९,१४४ आणि लातूर ५,५६,९९७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.