Sugarcane Farming
Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ऊस शेतीत आत्मसात केले एकरी १०० टनांपुढे उत्पादन तंत्र

सुदर्शन सुतार

- सुदर्शन सुतार

दर्जेदार बेणे निवड, बीजप्रक्रिया (Seed Treatment), माती परीक्षणातून सेंद्रिय- रासायनिक खतांचा एकात्मिक वापर , लागवड पध्दत आणि शास्त्रज्ञांसह अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन.

या आधारे उसाचे सातत्याने एकरी शंभर टन व त्यापुढे उत्पादन घेण्याचे तंत्र बेंबळे (जि, सोलापूर) येथील सोमनाथ हुलगे (Somnath Hulge) यांनी विकसित केले आहे.

राज्यातील आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख बनविली आहे.  

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीपासून १०-१२ किलोमीटरवर बेंबळे गाव आहे. भीमा नदीचा काठ आणि उजनी धरणाच्या कालव्यामुळे गावपरिसराला पाण्याचा शाश्‍वात स्रोत मिळाला आहे.

केळी आहेच. पण ऊसक्षेत्र सर्वाधिक आहे, गावात सोमनाथ हुलगे यांची १६ एकर शेती आहे. त्यात साडेतेरा एकर ऊस आणि दीड एकर केळी आहे.

पाचवी इयत्तेत असतानाच वडील गेल्याने घरची सर्व जबाबदारी सोमनाथ यांच्यावर आली. मग शेतीतच लक्ष घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अनेक बरे-वाईट प्रसंग वाट्याला आले. पण त्यातून मार्ग काढत आज आई श्रीमती बेबीताई, पत्नी दीपाली, मुले ओमकार आणि धनश्री यांच्यासह शेतीत त्यांनी चांगलाच जम बसवला आहे.

डाळिंब, टोमॅटो, केळीतही विविध प्रयोग करून उत्पादनवाढ साधली आहे. आता केळी आणि उसावरच लक्ष केंद्रित केले आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडीचे शेतकरी त्यांना म्हणता येईल.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, सांगलीचे कृषिरत्न संजीव माने, इस्लामपूरचे प्रगतिशील शेतकरी

अशोक खोत, टेंभुर्णीचे डॉ. विजयकुमार चोपडे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ऊसविकास अधिकारी नारायण लगड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि साह्य त्यांना मिळते.  

प्रयोगांनी वाढवला उत्साह
सन २००७ मध्ये दोन एकरांत केळी घेतली. त्यातून चार लाखांचे उत्पन्न मिळाले. हा सुखद धक्का होता. त्यातून उत्साह चांगलाच वाढला.

याच पैशातून केळीचे क्षेत्र वाढवले, उत्पन्नही वाढले. सन २०१३ मध्ये चार एकर शेती घेतली. पाणी कमी पडत असल्याने भीमा नदीवरून पाच इंची पाइपलाइन करून पाणी आणले. शेतीतला हा प्रवास योग्य मार्गावर व उत्साहाने सुरू झाला.

सन २०१९ पासून केळीचे क्षेत्र दोन एकर ठेवून ऊस वाढवला. त्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू केले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आदी संस्थांत प्रशिक्षण घेतले. प्रयोगशील ऊस उत्पादकांकडे भेटी दिल्या.

आज एकरी शंभर टन व त्यापुढे उत्पादनात सातत्य ठेवण्याचा हातखंडा तयार केला आहे.

सन्मान आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सोमनाथ यांना ऊसशेतीतील प्रयोगांसाठी जिल्ह्यासह परिसरातील संस्था, संघटनांसह कंपन्यांकडूनही पुरस्काराने गौरविले आहे.

ज्ञानाची देवाणघेवाण व एकरी शंभर टन उद्दिष्ट या हेतूने दोन व्हॉट्‍सॲप ग्रुपही सोमनाथ यांनी तयार केले आहेत. त्या माध्यमातून पाचशे ते सातशे शेतकरी जोडले आहेत. अनुभवी शेतकऱ्यांकडे शिवारफेरीही सुरू असते.

उत्पादन
एकरी सुमारे ५८०० डोळे बसतात. तर पुढे गाळपयोग्य उसाची संख्या ३५ हजार ते ४० हजारांपर्यंत मिळते. प्रति उसाचे वजन अडीच ते तीन किलो गृहीत धरले तरी एकरी १०० ते १२० टनांपर्यंत उत्पादन मिळते असे गणित तंत्रामागे आहे.

त्यातून सलग तीन वर्षांत सोमनाथ यांनी उत्पादनात चांगला हातखंडा मिळवला आहे. सन २०२१ मध्ये एकरी ११० टन, २०२२ मध्ये ११७ टन आणि पंधरवड्यापूर्वी १२५ टन उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले आहे.  

ऊसशेतीचे व्यवस्थापन (ठळक मुद्दे)

सध्या एकूण ऊसक्षेत्र साडेतेरा एकर. को ८६०३२ वाण. पाच एकर आडसाली लागवड. सात एकरांत मागील जूनमध्ये लागवड केलेला आणि खोडवा ऊस.

सुरुवातीला पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातून बेणे आणले. आता क्षेत्रानुसार स्वतः बेणेमळा तयार करतात.

पूर्वमशागतीत उभी, आडवी नांगरणी. डबल फण, रोटर वापर. त्यानंतर एकरी चांगले कुजलेले सहा ट्रॉली शेणखत व एक टन कारखान्यातील राख मिश्रण यांचा वापर.  

त्यानंतर एकरी शंभर किलो डीएपी, ७५ किलो पोटॅश, १५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, १५ किलो गंधक, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, १० किलो कीटकनाशक असा बेसल डोस.
बेणेप्रक्रिया. त्यानंतर पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड.

एक डोळा टिपरी पद्धतीचा वापर.
लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी तणनाशक वापर. कात्रीच्या साह्याने पुढे जेठा कोंब काढून घेतात.

पहारीच्या साह्याने खताची दुसरी मात्रा (लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी).
उसाच्या बुडात एकरी १०० किलो २४ः२४ः०, ५० किलो अमोनिअम सल्फेट, ४५ किलो युरिया आणि पोटॅश. त्यानंतर बाळबांधणी. त्याच वेळी तीन ट्रॉली कंपोस्टखत आणि दीड टन कोंबडीखत.  १०० ते ११० दिवसांनी मोठी बांधणी.

त्या वेळी तिसरी मात्रा. एकरी ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश, ९० किलो युरिया, २० किलो दाणेदार गंधक, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, प्रत्येकी १० किलो झिंक व फेरस सल्फेट, ५ किलो मॅगेनीज, एक किलो कॅापर.विद्राव्य खतांचा पीकवाढीच्या अवस्थेनुसार ठिबकद्वारे वापर.

मोठ्या बांधणीनंतर प्रत्येक महिन्यानंतर एक वेळा १० किलो कॅल्शिअम नायट्रेट स्वतंत्रपणे.
एकावेळी ४०० ग्रॅम याप्रमाणे पूर्ण कालावधीत तीन किलो बोरॅान. पीएसबी, पीएमबी आणि ट्रायकोडर्मा यांचाही वापर.

लागवडीनंतर दीड महिन्याने दर वीस दिवसांनी अशा सहा संजीवक फवारण्या. सहावी फवारणी ड्रोनच्या साह्याने. जिवामृत स्लरीचाही पंधरा ते वीस दिवसांतून वापर. त्यासाठी १६०० लिटर क्षमतेचा ‘फिल्टर’ बसवला आहे.

मोठी बांधणी झाल्यानंतर उसाला मोठ्या प्रमाणात पाला येतो. त्यातून वाळलेला पाला सरसकट काढला जातो. त्यामुळे हवा खेळती राहते, पिकाला सूर्यप्रकाश भरपूर मिळतो.

फुटवे चांगले येतात. नत्र-स्फुरद- पालाशयुक्त खते वापरण्यापूर्वी आठ ते दहा दिवस शेणखतामध्ये मिश्रण करून त्याची भट्टी तयार केली जाते.

चांगले मिश्रण करून मग वापर होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही याच पद्धतीने होतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT