Nashik News : शेतीचे सरंक्षण करणे हे प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देऊन पाणी आवर्तनात होणारी गळती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे गुरुवारी (ता. १६) आयोजित गंगापूर व कडवा कालवा सल्लागार समिती बैठकीत मंत्री विखे-पाटील बोलत होते.
त्यांनी बैठकीत जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड धरण, ओझरखेड प्रकल्प, गंगापूर प्रकल्प, कडवा प्रकल्प व चणकापूर प्रकल्पांतील पाण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर आढावा घेतला.
या वेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव दूरदृष्यप्रणालीद्वारे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, सर्वश्री आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अधीक्षक अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचित राजेश गोवर्धने,
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज डोके, यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
विखे-पाटील म्हणाले, की शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनाचे केलेले नियोजन लक्षात घेता नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार महानगरपालिका क्षेत्रासाठी बिगर सिंचन पाण्याची मागणी तुलनेत वाढत आहे.
धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अपव्यय टाळण्यासाठी १०० टक्के पाणी मीटरिंग करावे. तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल यासाठी जलसंपदा विभाग तसेच महानगरपालिका यांनी समन्वयाने नियोजन करावे, अशी सूचनाही विखे यांनी केली.
शेतीसाठी पाण्याचे आर्वतन जूनपर्यंत देता आले पाहिजे
पाऊस उशिराने येतो त्यामुळे उन्हाळ्यातही शेतीसाठी पाण्याचे आर्वतन जूनपर्यंत देता आले पाहिजे. शेतीसाठी आवर्तन देताना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचे प्रमाण दिसून येते. यामुळे सिंचनाचे पाणी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही. पाणी गळतीचे प्रमाण ६० वरून २० टक्क्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभाग यांनी काटेकोर नियोजन करावे. यासाठी कालव्यांचे लायनिंग केले पाहिजे, अशा सूचना विखे पाटील यांनी केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.