Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Manikrao Kokate: मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरण: मंत्री कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा

Housing Scam and Fake Documents: मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी बनावट दस्तऐवज सादर केल्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता.२०) ठोठावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या कोकाटे यांच्या संबंधित या निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला.

दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप श्री. कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता. कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका घेताना स्वतःच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक माहिती सादर करावी लागते.

असे असताना कृषिमंत्री श्री. कोकाटे व त्यांचे बंधू श्री. विजय यांनी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागातील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. तसेच या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता.

या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर १९९७ मध्ये जिल्हा प्रशासनाने चौकशी केली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार होती..त्यावरून चार जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याचा निकाल तब्बल २९ वर्षांनी लागला असून, न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.त्यानंतर लगेचच त्यांना जामीन मंजूर झाला असून, त्यांनी यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.

वरच्या न्यायालयात आव्हान देणार : कोकाटे

तीस वर्षांपूर्वी तुकाराम दिघोळे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. त्यातूनच त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती. त्या केसचा निकाल गुरुवारी लागला आहे. या निकालाविरोधात मी वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहे. ही न्यायालयीन बाब असून यासंदर्भात जास्त भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा : तपासे

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ते म्हणाले, की आता अजित पवार म्हणू शकणार नाही की गुन्हा सिद्ध होऊ द्या. आता तर कृषिमंत्री यांच्यावर गुन्हादेखील सिद्ध झाला असून जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. भाजपप्रणीत सरकारने माणिकराव कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT