Milk Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी धाडी टाकून १६ दूध संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान यामध्ये १० लिटरमागे जवळपास ५०० ते ७०० मिलीपर्यंत लूट होत असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडकडून उघडकीस आणण्यात आला.
दरम्यान यावर आता जिल्ह्यातील दूध संस्था आक्रमक झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेकडो दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) च्या कार्यालयावर धडक दिली.
दूध संस्थांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या निश्चितपणे सुधारल्या पाहिजेत. मात्र, ज्यांचा दुग्ध व्यवसायाशी संबंध नाही, अशा लोकांना घेऊन शासकीय अधिकारी दूध संस्थांवर धाड टाकत असतील तर जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक दूध संस्था कर्मचारी रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेने दिला.
जिल्ह्यातील शेकडो दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) च्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले, 'दूध संस्थांच्या माध्यमातून संकलित होणारे दूध हे शासनाच्या नियमानुसार घ्यावे, असे आदेश आहेत. मात्र, काही ठिकाणी फॅट किंवा एसएनएफ न पाहताच दूध संकलन करून संस्था शेतकऱ्यांची फसवृणक करोत आहेत, अशा तक्रारी सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे आल्या आहेत.
त्यानुसार अशा संस्थांवर कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई चुकीच्या पध्दतीने केली जात आहे. शेतकऱ्यांचे दूध गावातच संकलित व्हावे, त्यांना बाहेर जायला लागू नये यासाठी दूध संस्थांकडून ही सेवा केली जात आहे. मात्र, कोणीतरी आंदोलन करते किंवा मागणी करते यासाठी चुकीच्या पध्दतीने निबंधक कार्यालय कारवाई करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.
काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत. पण, चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असेल तर संबंधितांना जशाचे तसे उत्तर दिले जाईल. यावेळी विश्वास पाटील, शामराव पाटील, सुरेश जाधव, संजय पानारी, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
'दूध संस्था टिकल्या पाहिजेत. मात्र, काही संस्थांच्या पदाधिका-यांनी आपला कारभार सुधारला पाहिजे. आम्ही कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तपासणी करत नाही. जे कोणी आले होते, ते स्वतःहून आले होते. संस्थांनीही शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी केली पाहिजे. - प्रदीप मालगावे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.