वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Agriculture Produce Market Committee Maval Election) प्रतिष्ठेची केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनेल व भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी गावोगावी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ तारखेला होणार असून समितीच्या १८ जागांसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नगरपरिषदा व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून आप आपली ताकद अजमाविण्याचा प्रयत्न तालुक्यातील राजकीय पक्ष व त्यातल्या त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन पक्ष करीत आहेत व एक प्रकारे दुधाची तहान ताकावर भागविण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही निवडणुकीच्या राजकारणात मोठा रस असल्याने नावाजलेले पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादी काँगेस प्रणित महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल व भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व १८ जागांवर उमेदवार दिले असून, प्रामुख्याने या दोन पॅनेलमध्येच सरळ लढत होत आहे.
कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण जागा, भटक्या विमुक्त जागा व ग्रामपंचायत मतदार संघाच्या व्यापारी व आडते मतदार संघात निवडणूक लढवत असलेल्या चार अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. काँग्रसने भाजपबरोबर केलेला घरोबा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी फडकावलेला बंडाचा झेंडा यामुळेही मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे.
दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार
दोन्ही पॅनेलने तालुक्याचे श्रद्धास्थान श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला.
सहकार पॅनेलने आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेलने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, काँग्रसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर आदींच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली.
दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचाराला केवळ पाच सहा दिवसांचा कालावधी मिळाल्याने उमेदवारांनी लागलीच जोरदार प्रचाराला सुरुवात केली.
निवडणुकीबाबत...
- उमेदवारांकडून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी गाठी
- भर उन्हात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उमेदवार एका गावातून दुसऱ्या गावात मजल दरमजल करत मतदारांना गाठत आहेत
- मतदारांच्या पाया पडून मतदान करण्याचे उमेदवारांकडून आवाहन
- सोशल मीडियावरही जोरदार प्रचार सुरू
- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या पिकांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी मोठी आश्वासने
- दोन्ही पॅनेलने जाहीरनामाही प्रसिद्ध
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.