Indian Marriage Agrowon
ॲग्रो विशेष

Marriage and Technology: विवाह व्यवस्था तंत्रज्ञान संलग्न होईल

Future of Marriage: पुढील ३० वर्षांत विवाह केवळ एका पारंपरिक बंधनापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो सहजीवनाच्या विविध प्रकारांना सामावून घेणारा अधिक समावेशक व वैयक्तिक अनुभव बनेल.

शेखर गायकवाड

Tradition to Technology: विवाह ही भारतात दोन कुटुंबांमधील एक महत्त्वाची सामाजिक संस्था मानली जाते. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली असून, तिच्यात काळानुसार अनेक बदल घडत गेले आहेत. भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात विवाहाचे स्वरूप, रीतिरिवाज आणि अपेक्षा भिन्न भिन्न असतात. सध्याच्या डिजिटल युगात, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आणि तंत्रज्ञानामुळे विवाह संस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. पारंपरिक विवाह हे स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाचे प्रतीक होते, मात्र आता विवाहाच्या व्याख्येत बदल होऊ लागले आहेत.

समलैंगिक विवाह, लिव्ह-इन रिलेशनशिप्स, आणि स्वतंत्र जीवनशैली स्वीकारणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. मॅट्रिमोनियल वेबसाइट्स, अ‍ॅप्स, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जोडीदार शोधणे ही गोष्ट आता सामान्य झाली आहे. पुढील काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुबक आणि प्रगत होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जोडीदार निवड प्रणाली, व्यक्तिमत्त्व चाचण्या, व वर्च्युअल डेटिंग अशा गोष्टी अधिक प्रचलित होतील. ऑनलाइन विवाह, व्हर्च्युअल लग्न समारंभ व डिजिटल नोंदणी ही नवी संस्कृती बनू शकते.

शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे स्त्रिया आता आपले जीवनसाथी स्वतः ठरवू लागल्या आहेत. विवाहात आता फक्त सामाजिक प्रतिष्ठा किंवा घरच्यांच्या पसंतीपेक्षा वैयक्तिक पसंती, विचारसाम्यता, आणि समान मूल्यं यांना अधिक महत्त्व दिलं जातंय. आगामी काळात स्त्री-पुरुष दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील, परिणामी विवाहात सत्ताकेंद्रितपणा कमी होईल आणि परस्परसन्मान व समतेवर आधारित नाते अधिक बळकट होईल.

पूर्वी विवाहानंतर नवऱ्याचे घर म्हणजे स्त्रीचे घर असे समजले जाई. परंतु आता ती संकल्पना झपाट्याने बदलत आहे. नवे दाम्पत्य स्वतंत्रपणे राहू इच्छितात. संयुक्त कुटुंबापेक्षा छोटे कुटुंब अधिक पसंत केले जात आहे. दोघेही घरकाम आणि मुलांच्या संगोपनात समान जबाबदारी घेत आहेत. पुढील काळात पालकत्व, करियर आणि कौटुंबिक निर्णय यामध्येही संतुलन दिसून येईल.

भारतामध्ये विवाह अनेक वेळा जाती, धर्म, आणि सामाजिक गटांच्या आधारावर ठरवले जातात. तथापि, शिक्षण आणि सामाजिक बदलांमुळे आंतरजातीय व आंतरधार्मिक विवाहांची संख्या वाढत आहे. पुढील काही दशकांत जातपातीच्या मर्यादा हळूहळू कमी होतील, आणि व्यक्तीस्वातंत्र्य, समजूतदारपणा व प्रेम यांवर आधारित विवाह अधिक मान्यता मिळवतील. आजच्या पिढीत लग्न उशिरा करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

करिअर, शिक्षण, आत्मनिर्भरता हे सर्व घटक विवाहाच्या वेळेला पुढे ढकलतात. शिवाय, ‘संपूर्ण आयुष्यभरासाठी एकच जोडीदार’ ही संकल्पना कमी होत चालली आहे. घटस्फोट किंवा परस्पर सहमतीने विभक्त होणे आता सहजतेने स्वीकारले जात आहे. पुढील काळात ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ किंवा ठरावीक काळासाठीच्या विवाह संकल्पनाही उदयास येऊ शकतात. या सगळ्यांचा प्रभाव ग्रामीण संस्कृतीवर पडल्याशिवाय राहणार नाही.

लग्नाच्या नव्या संकल्पना

सोशल मीडियाचा प्रभाव विवाह व्यवस्थेवरही पडतो आहे. लोक आपले नाते सार्वजनिक करतात. परंतु त्याचसोबत वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही उघड होतात. या मुळे अनेकदा नात्यांमध्ये गैरसमज, तणाव यासारखे परिणाम दिसून येतात. त्यामुळे भविष्यात सोशल मीडियाचा विवेकपूर्ण वापर हा विवाह टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. भारतीय विवाह हे रितिरिवाज, विधी आणि भव्य समारंभासाठी ओळखले जातात. मात्र आता यामध्येही काटकसर, वेळेची बचत, आणि साधेपणाचा कल वाढतो आहे. ‘डेस्टिनेशन वेडिंग,’ ‘इको-फ्रेंडली लग्न’ आणि ‘इंटिमेट वेडिंग’ ही संकल्पना भविष्यात अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

विवाह आता केवळ सामाजिक देखावा नसून एक वैयक्तिक अनुभव म्हणून समोर येत आहे. त्यामुळे पूर्वीसारखी लग्नाची तयारी महिनाभर चालणार नाही. ठरल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत ‘स्विगी शादी’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारंपरिक कुंडली ऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ‘तिने तुझे इस्टाग्राम पोस्ट रात्री २:३० वाजता लाइक केले, म्हणजे ८७.४ टक्के जुळणं आहे.’ असा सल्ला दिला जाईल. ‘‘३२ वर्षे वयाच्या आत लग्न करा, सोन्यावर १० टक्के सूट आणि हिमाचलमध्ये हनिमूनसाठी कर्ज मोफत!’ अशा जाहिराती वाचायला मिळाल्या तर आश्‍चर्य वाटायला नको.

पुढील ३० वर्षांत भारतीय विवाह व्यवस्था अधिक वैयक्तिक, समतावादी, आणि तंत्रज्ञानाशी संलग्न स्वरूपात रूपांतरित होईल. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखत, ही संस्था बदलत्या काळानुसार अधिक लवचिक बनेल. व्यक्तींच्या भावनात्मक गरजा, स्वातंत्र्य, आणि परस्परसन्मान यांचा आदर राखून विवाह अधिक सुदृढ आणि स्थायिक होऊ शकतो. हे बदल केवळ व्यवस्थेत नसून समाजाच्या विचारांमध्येही खोलवर घडतील.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Solar Dryer: सौर ड्रायरचे प्रकार अन् क्षमता

Indian Politics: गोंधळलेले सरकार अन विरोधकही...

Maize Production: मका : समतोल धोरण हवे

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

SCROLL FOR NEXT