Manoj Jarange Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : गुलाल घेऊन मराठे मुंबईतून परतले

Maratha Reservation : दरम्यान, अधिसूननेनंतर मराठा आंदोलकांनी गुलाल उधळून जोरदार घोषणाबाजी केली, काहींनी नृत्य करत आंदोलनाचे यश साजरे केले.

Team Agrowon

Mumbai News : मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, या इशाऱ्यानिशी मुंबईत एकवटलेल्या मराठा समाजाने रक्तसंबंधातील नातेवाइकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूनेनंतर आंदोलन मागे घेतले. त्यानंतर मराठे गुलालाची उधळण करीत आपापल्या गावी परतले.

दरम्यान, अधिसूननेनंतर मराठा आंदोलकांनी गुलाल उधळून जोरदार घोषणाबाजी केली, काहींनी नृत्य करत आंदोलनाचे यश साजरे केले. वाशीतील बाजार समितीजवळील शिवाजी चौकात शनिवारी (ता. २७) झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘‘मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यास मी कटिबद्ध आहे,’’ असे सांगितले.

आंदोलकांनी गुरुवारी आणि शुक्रवारी नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, सानपाडा, जुईनगर आदी ठिकाणी मुक्काम ठोकला होता. शुक्रवारी झालेल्या सभेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षणासह नातेसंबंधातील ओबीसी प्रमाणपत्राच्या अध्यादेशासह अन्य मागण्या केल्या होत्या.

या सर्व मागण्या पूर्ण झाल्याची घोषणा शनिवारी सकाळी केल्यानंतर आझाद मैदानाकडे आंदोलक जाणार नाहीत, असे जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथून सुरू झालेले आंदोलन मुंबईच्या वेशीवर थोपविण्यात राज्य सरकारला यश आले.

दरम्यान, सरकारच्या अधिसूनचेवर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे समजते. ‘‘मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल,’’ याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

गेले दोन दिवस जरांगे पाटील आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात आरक्षणाच्या तरतुदींवर चर्चा सुरू होती. मात्र सगेसोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळावे, या मागणीवर जारांगे - पाटील ठाम होते. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या शिष्टमंडळाबरोबर मध्यरात्री तीन तास चर्चा केल्यानंतर सुधारित अधिसूचना काढण्यात आली.

सरकारने जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी सरकारकडून अंशत: मान्य करण्यात आली आहे. परंतु अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे सरकारच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज (ता. २८) सिंहगड या शासकीय बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक बोलविली आहे.

पहाटेपासून जल्लोष

सरकारकडून मागण्या मान्य झाल्याचे कळल्यानंतर नवी मुंबईत ठिकठिकाणी राहिलेल्या आंदोलकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर सभास्थळी हजारोंच्या जमावाने गुलाल उधळत आनंद साजरा केला.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अटी

कुणबी मराठा जातीची नोंदी असलेल्या पुराव्यांआधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील नातेवाईक.

पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, हे अर्जदाराने असे शपथपत्रावर पुरावा म्हणून उपलब्ध करून द्यावे लागेल.

गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास त्यांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

सगेसोयऱ्यांनी कुणबी जातप्रमाणपत्रासाठी अर्ज करताना कुणबी नोंदीच्या पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या -चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाइकाचे किंवा सगेसोयऱ्याचे वैधता प्रमाणपत्र.

छत्रपतींची शपथ पूर्ण केली : शिंदे

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. त्यानंतर जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

राज्य सरकारची सग्यासोयऱ्यांची व्याख्या

‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक. मराठा समाजात गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे.

मात्र सगेसोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तसेच लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा स्वजातीय आहेत हे पुराव्यांआधारे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी गृहचौकशी केली जाईल. स्वजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले असतील तर त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT