Raigad News : तापमानात वाढ, किनारी भागात शिरणारे उधाणाचे पाणी, त्याचप्रमाणे मत्स्य उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणारे रायगड जिल्ह्यातील कांदळवनांचे क्षेत्र वाढले आहे. काही वर्षांपासून कांदळवन विभाग, वन विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात १०,११०.२८ हेक्टर क्षेत्रात कांदळवनांबरोबरच जैवविविधतेत वाढ झाल्याची माहिती अलिबागमधील कांदळवन कक्षाकडून देण्यात आली.
वाढत्या औद्योगिकीकरणाचा जिल्ह्यातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात कांदळवनांची तोड झाल्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांना भरतीचा मोठा फटका बसला. हे रोखण्यासाठी सरकारने पुढाकार घेत, कांदळवन संवर्धनासाठी जनजागृती तसेच विविध योजना राबवण्यास सुरुवात केली.
दर दोन वर्षांनी कांदळवन क्षेत्राची मोजणी केली जाते. आतापर्यंत चार वेळा उपग्रह मोजणी झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त कांदळवन क्षेत्र रायगडमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या मोजणीत जिल्ह्यात १०,११०.२८ हेक्टरवर कांदळवनांचा विस्तार झाल्याची नोंद आहे.
कांदळवनांची लागवड करणे किचकट आणि मेहनतीचे काम आहे. यासाठी वन विभागाने आगरदंडा गावाशेजारी खारफुटीची नर्सरी तयार केली आहे. येथील तयार रोपांची अलिबाग तालुक्यातील साताड बंदर, पालव, नानवली यांसारख्या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.
कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे
रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण येथील एकूण १९५ कांदळवनांतील संवेदनशील ठिकाणी एकूण ६६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीसाठी ११९.८८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विनंतीनुसार, हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबण्यात येणार आहे.
निसर्ग पर्यटन योजना
सरकारतर्फे कांदळवन निसर्ग पर्यटन योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये कांदळवनांची सफर, कांदळवन नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती/पक्षी निरीक्षण, किनारा भ्रमंती आणि किनाऱ्यांवरील खडक, तळ्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण, ताऱ्यांचे निरीक्षण, पारंपरिक व आधुनिक मासेमारी, समुद्रातील जलचरांची माहिती, नौका स्वारीदरम्यान मत्स्यपालन प्रकल्प किंवा कांदळवन वृक्षारोपणाच्या स्थळांना भेट, आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, स्थानिक पाककृती आणि पारंपरिक जेवण आदी बाबींचा समावेश आहे.
काळींजे व दिवेआगर या गावांमधील स्थानिकांना विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यासाठी २,३०२.०९६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव ठेवले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.