Paddy Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : फळबागांसह भाजीपाला, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Heavy Rain Crop Damage : जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २६) झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका नारायणगाव, खोडद परिसरांतील फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे.

गणेश कोरे

Pune News : जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार (ता. २६) आणि सोमवार (ता. २७) या सलग दोन दिवसांत झालेल्या पाऊस आणि गारपिटीने शेतीसह, पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, भात आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने सुरू केले आहेत.

जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २६) झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका नारायणगाव, खोडद परिसरांतील फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे. याबरोबरच कांदा, झेंडू व इतर वेलवर्गीय भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले.

द्राक्ष बागेतील घडकुज व डावणी, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आधुनिक यंत्राच्या साह्याने फवारणी सुरू केली आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना केवळ फवारणीसाठी दिवसभरात सुमारे दीड कोटी रुपयांचा भुर्दंड बसला आहे. तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत.

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, लौकी, चांडोली बुद्रुक, चास, साकोरे, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, कळंब, नांदूर आदी गावांत शेतीमालाचे नुकसान झाले. ४० हून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील कुरवंडी, भावडी, थूगाव, कारेगाव या परिसरांत रविवारी (ता. २६) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे दीड महिन्यापूर्वी लागवड केलेले ५०० हेक्टर क्षेत्रातील कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे नुकसान झाले. ओतूर (ता. जुन्नर) व परिसरात पावसाचा तडाखा बसला. डिंगोरे येथे घरावर वीज कोसळली.

ओतूर, उदापूर, डिंगोरे, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, पिंपळगाव जोगा, कोळवाडी, वाटखळे, सितेवाडी, मढ, पारगाव, खूबी, करंजाळे, खिरेश्‍वर, सांगनोरे, कोपरे, मांडवे, मुथाळणे, चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, रोहोकडी येथे नुकत्याच लागवड केलेल्या कांद्यात पाणी साचून रोपे मरतुकीचा धोका निर्माण झाला आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील गावांमध्ये मोठे नुकसान झाले. होनेवाडी येथील शेतकरी अर्जुन बबन पवार यांच्या गाभण म्हशीवर वीज पडली. यामध्ये म्हशीचा मृत्यू झाला. वेल्हे तालुक्यात सोमवारी (ता.२७ ) पहाटे सर्वत्र जोरदार पाऊस झाला. शेतामध्ये कापून ठेवलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले.

अंबवणे, करंजावणे, वांगणी, कोळवडी, मार्गसनी, सोंडे माथना, सोंडे सरपाले, किल्ले राजगड परिसरात वाजेघर, मेट, पिलावरे, लव्ही, आवळी, दादवडी, लाशीरगाव, पाबे, दापोडे वेल्हे, अठरा गावे मावळ परिसर, गुंजवणी धरण, पानशेत परिसरात भाताचे पीक पाण्यामध्ये तरंगत आहे.

...अशी घ्या काळजी

‘‘द्राक्ष बागेतील घड, पाने ओली राहिल्यास व बागेत पाणी साचल्यास बुरशीची वाढ झपाट्याने होते. डावणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव व घडकुज टाळण्यासाठी पावसाची उघडीप होताच घड व वेलीतील पाणी कमी करण्यासाठी बागेच्या तारा हलवा, बुरशीनाशकाची फवारणी करा, बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिला.

एक एकरपेक्षा जास्त क्षेत्राचे भात पीक शेतातच कापून ठेवले होते. हे पीक आता पावसामुळे पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होईल. या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करावा.
- आनंद शिंदे, शेतकरी, रा. करंजावणे (ता. वेल्हे)
जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात, भाजीपाला पिके, द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. गावकामगार तलाठी यांना नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
- रवींद्र सबनीस, तहसीलदार, ता. जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT