Mumbai News : बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेला बंद न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर शनिवारी (ता.२४) राज्यभर मूक निदर्शने केली. मुंबईत भरपावसात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात मूक निदर्शने केली.
या निदर्शनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दादरमधील शिवसेना भवनासमोर निदर्शने केली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी जोरदार पावसातही घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत ‘कंसमामा’ असे संबोधले.
‘राज्यात एकीकडे बहिणींवर अत्याचार होत असताना हे कंसमामा राख्या बांधून घेत सुटले आहेत. आजच्या बंदला विरोध करणे म्हणजे नराधमांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. यांना ‘सदा’ आवडते लोकही विकृत आहेत. नराधमांविरोधात उभे राहण्याऐवजी ते पांघरूण घालत आहेत. संकटांचा सामना करण्याची हिंमत यांच्यात राहिली नाही त्यामुळे आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवून अडथळे निर्माण केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोर्टात तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. पण कोर्ट इतक्या तत्परतेने हलू शकते हे आम्ही ‘बंद’च्या निर्णयात पाहिले’, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
काँग्रेसची राज्यभर निदर्शने
मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर काँग्रेसने राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर पावसात ठाण्याच्या गांधी चौकातील आंदोलनात भाग घेतला.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांनी संविधान चौकात ‘मूक आंदोलन’ केले. विधान परिषदचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोल्हापुरात मूक आंदोलन केले.
आमदार जयश्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, जयंत आसगावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. अमरावती येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांनी आंदोलनात भाग घेऊन सरकारचा निषेध केला.
नाशिक येथील आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष अँड आकाश छाजेड खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सहभाग घेतला. मुंबईतील नागपाडा जंक्शन येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन, दादर येथे आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम, राजन भोसले, सचिव श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.