Akola News : या रब्बी हंगामात लागवड झालेल्या गव्हाची बहुतांश काढणी पूर्णत्वास आली आहे. यंदा उत्पादकतेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी एकरी दोन-तीन क्विंटलपासून तर १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तयार झालेल्या गव्हाचा दर्जाही अनेकांना चांगला आला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या रब्बी हंगामात गव्हाची लागवड पश्चिम विदर्भात वाढली होती. तरीही कमी पाणी, पिकावर यावर्षी आलेले विविध प्रकारचे कीडरोग, धुके अशा अनेक बाबींचा फटका गव्हाच्या पिकाला बसला. ओंबीच्या अवस्थेत अळीने उपद्रव केला. गव्हाचे हिरवे दाणे अळीने फस्त केले. काही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटलच्या आत उत्पादन आले आहे.
काही मोजक्याच शेतकऱ्यांनी १० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळविले आहे. दुसरीकडे यावर्षी गव्हाचा उत्पादन खर्च दरवर्षीपेक्षा दीडपटीने वाढला. कधी नव्हे ते गव्हाच्या पिकावर यावर्षी फवारण्या कराव्या लागल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कीडनाशक फवारले. काहींनी पिकाची आळवणीही दोन-तीन वेळा केली. चांगले बियाणे, खतमात्रा, पाणी व्यवस्थापन करूनही उत्पादन आलेले नाही.
कुठे पाच, तर कुठे ८, १० क्विंटल उत्पादन
अकोला जिल्ह्यात वाण धरण क्षेत्रात गव्हाचे उत्पादन एकरी १० क्विंटलच्या आतच आहे. अशीच स्थिती काटेपूर्णा प्रकल्प क्षेत्रातही आहे. बुलडाणा जिल्ह्यात कुठे पाच तर कुठे ८ ते १० क्विंटलदरम्यान उत्पादन आले. वाशीम जिल्ह्यातही सरासरी आठ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
रब्बीतील जिल्हानिहाय लागवड (हेक्टर)
जिल्हा-क्षेत्र-टक्केवारी
बुलडाणा-५७०६०-१०३
अकोला-२८०४१-१४६
वाशीम-३६४३१-१४१
कपाशीचे पीक उपटून तीन एकरांत जानेवारीत गव्हाची लागवड केली. सुरवातीला पीक चांगले होते. मात्र, नंतर एकच फुटवा निघाला. त्यावर ओंबीही बारीक लागली. अळीचा शिरकाव झाला. त्यामुळे तीन एकरांत ११ ते १२ पोते उत्पादन झाले. दरवर्षी याच शेतात १५ ते १८ क्विंटलपर्यंत उतारा मिळतो. यंदा एकरी १५ ते १६ हजार रुपये खर्च केला. लावलेला खर्चही निघाला नाही. दुसरीकडे भाव कमीच आहेत.- श्रीकृष्ण ढगे, शेतकरी, वरवट बकाल, जि. बुलडाणा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.