Nashik News : ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा घरगुती तर काहींनी कंपन्यांचे बियाणे खरेदी करून दुबार रोपवाटिका तयार केल्या.
मात्र घरगुती बियाण्यांच्या तुलनेत कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. तर काही ठिकाणी उशिराने बियाणे उगवत आहेत, त्यामुळे प्रस्तावित लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यंदा रब्बी कांदा बियाण्यांची उपलब्धता मागील वर्षीच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला खर्च करून रोपवाटिका तयार केल्या. सप्टेंबरअखेर पेरलेल्या रोपांची उगवणक्षमता चांगली होती. मात्र १४ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुबार रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली. मात्र दुसऱ्यांदा शेतकऱ्यांनी पदरमोड करून महागडे बियाणे घेतले.
तर काहींकडे शिल्लक घरगुती बियाण्यांचा वापर केला. या घरगुती बियाण्यांचा उतारा चांगला दिसून येत आहे, तर कंपन्यांचा उतारा उशिराने तर विरळ दिसून येत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यामुळे संभाव्य लागवडीसाठी रोपांची उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागवडीवर परिणाम होऊ शकतो, असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मोरेनगर (ता. सटाणा) येथील कांदा उत्पादक मधुकर मोरे यांनी संगितले, बियाणे शिल्लक नसल्याने कंपनी बियाणे टाकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नव्हता. कारण पावसामुळे घरगुती बियाणे टाकून पूर्ण रोपे खराब झाले. आता कंपनीचे बियाणे टाकून बियाणे बऱ्यापैकी उतरली. मात्र काही ठिकाणी आता १५ ते २० दिवसांनंतर बुरशींमुळे तसेच जमिनी ओल्या असल्यामुळे मर रोगाचे प्रमाण वाढले आहे.
यंदा कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल दिसून आला. एकीकडे नाशिक जिल्ह्यात बनावट कांदा बियाण्यांची रॅकेट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी बोगस कांदा बियाण्यांची विक्री झाली का? असाही संशय व्यक्त होत आहे.
घरगुती बियाण्यांचा उतार चांगला मिळाला. कंपनीचे बियाणेही सुरुवातीला चांगले होते, मात्र उशिरा घेतलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता काही ठिकाणी शून्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले.- शिवाजी पवार, कांदा उत्पादक शेतकरी, वाखारी, ता. देवळा
मागच्या वर्षी पाऊस नसल्यामुळे बियाण्यांचा खप झाला नव्हता. यंदा खूप मागणी असल्यामुळे व प्रत्येक कंपनीकडे जुने बियाणे असल्यामुळे काही कंपन्यांकडून भेसळ करण्याचा प्रयत्न झाला असावा.- कृषिभूषण सदुभाऊ शेळके, कांदा उत्पादक, मानोरी, ता. येवला
बियाणे कायद्याप्रमाणे ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे विक्री करता येते. तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी बियाणे उगवणक्षमता अहवाल मागितला पाहिजे किंवा अडचणी असतील तर कृषी विभागाकडे रीतसर तक्रार करायला हवी. यावर्षी दुबार पेरणीमुळे बियाण्यांचा तुटवडा होता. तर मागील वर्षी बियाणे उपलब्धता अधिक होती. रोपांमध्ये जमिनीतील बुरशीमुळे मर होण्याचे प्रमाण दिसून आले. तसेच जमिनीत पाणी साचल्याने किंवा जमिनीतील बुरशीमुळे उगवण कमी होते. तसेच शिफारस न केलेले तणनाशक पेरणी क्षेत्रावर वापरल्यास उगवणीवर परिणाम संभवतो.- डॉ. सतीष भोंडे, ज्येष्ठ कांदा शास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक-एनएचआरडीएफ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.