Fodder Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Production : कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती

Team Agrowon

डॉ. एस. पी. गायकवाड

Hydroponics Fodder Production : कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी रचनेमध्ये दोन्ही बाजूंस तीन फुटांचे बांबूचे तीन किंवा चार रॅक तयार करावेत.  या रॅकमध्ये सव्वा ते दीड फुटाचे अंतर ठेवावे. ज्यामुळे स्प्रिंकलरमधून पाणी सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात पोहोचण्यास मदत होते.

दोन रॅकमध्ये येणे- जाणे आणि ट्रे ठेवणे तसेच काढण्यासाठी ट्रेच्या आकारमानानुसार ३ ते ४ फूट जागा सोडावी. पाण्यासाठी स्प्रिंकलर आणि टायमरचा वापर करावा. ज्यांना हा खर्च परवडत नाही त्यांना पाठीवरील पंप  तसेच झारीचा वापर करून चाऱ्यावर पाण्याची फवारणी करावी.

पीव्हीसी पाइपचा वापर

यू पीव्हीसी पाइप (१ इंची, १० किलो दाब क्षमता) किंवा

प्लम्बिंग पीव्हीसी पाइप (१ इंची, ६ किलो दाब क्षमता) किंवा

प्लम्बिंग पीव्हीसी पाइप (अर्धा इंची, ६ किलो दाब क्षमता)

पीव्हीसी पाइप हायड्रोपोनिक चारा उत्पादन युनिट (७० ट्रे)

वस्तू नग

पीव्हीसी पाइप (१ इंची, ६ किलो दाब क्षमता) २०

पीव्हीसी टी (१ इंचासाठी) २००

पीव्हीसी कोपरे २५

स्प्रिंकलर ७०

हायड्रोपोनिक ट्रे (१.५ × २ फूट) ७०

तार गरजेनुसार

विद्युत पंप व फिटिंग (१ एचपी) १

विद्युत पंपासाठी टायमर १

शेडनेट ९०:१० ( मीटर) १२

उत्पादनाची पद्धत

गहू, मका, ओट या धान्याचा जास्त प्रमाणात वापर करावा. ज्वारी हे पीक हायड्रोपोनिक्स पद्धतीने वापरण्यास योग्य नाही, कारण याच्या कोवळ्या चाऱ्यात हायड्रोसाइनाइड हा  विषारी पदार्थ असतो. त्यामुळे जनावरास विषबाधा होण्याची शक्यता असते. मका, गहू, ओट पाण्यामध्ये १२ तास भिजवत ठेवावे. त्यानंतर वातावरणाचा अभ्यास करून २४ ते ३६ तास गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने बियाण्याला लहान मोड आलेले दिसतात.

हे अंकुरित धान्य त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये एका चौरस फुटाला ३५० ग्रॅम (वाळलेले धान्याचे वजन) प्रमाणे पसरावे. हे ट्रे एका मांडणीवर ठेवले जातात.

हे सर्व उत्पादन युनिट एका शेडनेटने अच्छादित केलेले असते. ट्रे कोणत्याही आकाराचे असू शकतात. त्यातून पाणी सर्व ठिकाणी पोहोचले पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे.

अंकुरित बियाणावर हवामानानुसार  ठरावीक कालावधीमध्ये पाण्याची फवारणी करावी. यासाठी  स्प्रिंकलर्स आणि टामयरचा वापर करावा. अशा पद्धतीने ८ ते ९ दिवसांत आपणास चांगला वाढ झालेला चारा तयार होतो.

हायड्रोपोनिक्स चारा मुळ्यासह जनावरास खाण्यास तयार झालेला असतो. यामध्ये एका किलो धान्यापासून सर्वसाधारणपणे ८ ते ९ किलो चारा तयार होतो.

एका २ फूट लांब आणि १.५ फूट रुंद ट्रेमधून ८ ते १० किलो चारा तयार होतो. इतर लागणारी अन्नघटकांची गरज सुका चारा व पशुखाद्यातून पूर्ण करावी. एक ट्रे एका जनावरास एका दिवसात देता येईल. अशा प्रकारे एका जनावरास आठवड्याला सात ट्रे लागतील म्हणजेच दहा जनावरांसाठी एकूण ७० ट्रे लागतील.

मक्याचे हाड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी एका किलोसाठी २.५ ते ३.५ रुपये , गव्हासाठी ३ ते ३.५० रुपये खर्च येतो.

हायड्रोपोनिक ट्रे

ट्रेच्या गुणवत्तेवर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाचे यश अवलंबून आहे. ट्रे योग्य आकाराचा असावा. हाताळणी योग्य प्रकारे करता यावी. निवडलेला ट्रे चाऱ्याचे वजन पेलणारा असावा. ट्रेच्या बाजू भक्कम असाव्यात कारण ट्रेचे पूर्ण वजन या बाजूंवर असते. या बाजू रेकवर टेकलेल्या असतात.

ट्रेमध्ये  बियाणे टाकत असताना ते काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असे न होता ते एकसारखे पसरता येणेसुद्धा सोपे होण्यासाठी  ट्रेमध्ये उंच ओळी असाव्यात. यामुळे आपणास बियाणे पसरण्याचा अंदाज येतो. या ओळी सर्वसाधारणपणे अर्ध्या ते एक सेंटीमीटर असाव्यात. यामुळे पाणीपुरवठा सर्व बाजूस एकसारखा होतो.

चारा तयार करताना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास चाऱ्याची चांगली वाढ होते. रोग नियंत्रण करता येते.  ट्रेच्या अशा ओळींच्या शेवटी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र ठेवलेली असतात. ही छिद्र शक्यतो ट्रेच्या दोन्ही बाजूस ठेवल्यास आपण ट्रे ची कोणतेही बाजू उताराकडे ठेवू शकतो.

चारा उत्पादन करताना स्वच्छता महत्त्वाची आहे. ट्रेचा भाग हा जास्त खाचखळगे असणारा नसावा.

बियाणे

मका, गहू, चवळी, ओट यांचा वापर करता येतो. आपल्या भागातील वातावरण व बियाणांची उपलब्धता यानुसार बियाणे निवडावे. 

थंड भागामध्ये गहू किंवा ओट यांचे उत्पादन चांगले येते. उष्ण भागामध्ये मक्याचे उत्पादन चांगले येते.

बियाणे निवडताना ते स्वच्छ, अंकुरित होणारे असावे. रोगाचा प्रादुर्भाव नसावा. बियाणे प्रक्रिया केलेले नसावे.

बऱ्याच वेळेस यंत्राने काढणी केलेल्या मक्याच्या बियाणांचा अंकुर व्यवस्थित राहात नाही त्यामुळे असे बियाणे हायड्रोपोनिक्स पद्धतीत उगवत नाही. उलट असे बियाणे पाण्याच्या वापरणे कुजते. चाऱ्यास वास येतो.  ट्रेमध्ये बुरशीची वाढ  होते. सुरवातीस थोडे बियाणे घेऊन त्याची उगवण क्षमता तपासून त्याचा वापर करावा.

पाणी नियोजन

चारा उत्पादनात पाणी हे पोषणासाठी तर लागतेच परंतु त्याचा वापर येथे तापमान, आद्रता व रोगनिवारण यासाठी केला जातो हेही महत्त्वाचे आहे. यामुळे कमीत कमी पाण्यात चारा तयार करावा.

बऱ्याच ठिकाणी हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीमध्ये वापरलेले पाणी पुन्हा-पुन्हा वापरण्यासाठी एका ठिकाणी संकलित करून ते फिल्टर केले जाते. त्यामुळे पाण्याची चांगली बचत होते. परंतु अशा पाण्याचा पुनर्वापर करताना जागरूक राहावे. स्प्रिंकलर वारंवार खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

रोग नियंत्रण

योग्य गुणवत्तेचे बियाणे, ट्रेची संरचना पाण्याचा योग्य वापर, आर्द्रता, तापमान, चाऱ्याची हाताळणी महत्त्वाची बाब आहे. अंकुरित क्षमता नसलेले बियाण्याची निवड करू नये.

तापमान नियंत्रण

तापमान नियंत्रणासाठी शेडनेट, पाण्याचा वापर, फॉगर्स आणि  सेंन्सरचा वापर करावा लागतो. ९० टक्के सावली व १० टक्के सूर्यप्रकाश नियंत्रित करणारे शेडनेट वापरावे. जर यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश व कमी सावली असणारे शेडनेट वापरले तर यामधील मोठ्या छिद्रातून दवबिंदू हवेबरोबर बाहेर जाण्याचे प्रमाण वाढेल,त्यामुळे आतील तापमान नियंत्रण होण्याचा कालावधी कमी होईल.

आर्द्रता

चांगल्या प्रमाणात चारा उत्पादन होण्यासाठी ७० टक्के आर्द्रता नियंत्रित करावी. फॉगर्सच्या मदतीने आवश्‍यक त्या प्रमाणात आर्द्रता नियंत्रणात  ठेवावी.

उत्पादनाचे फायदे

अवघ्या ५० चौरस मीटर जागेमध्ये सात दिवसात प्रती दिवस ६०० किलो पेक्षा जास्त पौष्टिक चारा तयार केला जातो की पारंपरिक पद्धतीने इतका चारा तयार करण्यास साधारणपणे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल. पारंपरिक पद्धतीत एक किलो चारा तयार करण्यासाठी सुमारे ८० लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. तर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये पाणी पुन्हा पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेत साधारणपणे १.५ लिटर आणि पाण्याचा पुन्हा वापर न करता एकदाच वापर करण्याच्या पद्धतीमध्ये साधारणपणे २ ते ३ लिटर  पाण्याचा वापर होतो. न वापरलेले पाणी आपण बागेसाठी सुद्धा वापरू शकतो.

दररोज ६०० किलो मका चारा तयार करण्यासाठी एक कामगार पुरेसा आहे. चारा तयार करण्यासाठी सर्व वातावरण पोषक असल्यास आपणास ६० ते ९० दिवस लागतात. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये चारा आपण गरजेप्रमाणे करतो, त्यामुळे त्यातील गुणवत्ता टिकून राहते. साधारणपणे ८ ते १० दिवसात हा चारा तयार होतो. दररोज आपण ताजा चारा जनावरास देऊ शकतो.

वर्षभर उत्पादन शक्य आहे. हा चारा पौष्टिक व लुसलुशीत असल्याने त्याची चव चांगली असते.  जनावरे हा चारा आवडीने खातात. दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावराची रोगप्रतिकार शक्ती, जनावराची त्वचा, गाभण राहण्याचे प्रमाण, जनावरांची चयापचयाची क्रिया सुधारते.

नेहमीच्या चाऱ्याला काहीसा पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर करू शकतो.  यामधील पाण्याचे प्रमाण हे ९० टक्के पेक्षा जास्त असते. त्यामुळे शरीरासाठी आवश्‍यक शुष्क घटकांची गरज फक्त हायड्रोपोनिक्स चारा भागवेल असे नाही, म्हणून या चाऱ्याबरोबर सुका चारा व खुराक देणे गरजेचे आहे.

जनावरांना ५ किलोपासून २५ किलोपर्यंत त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक्स  चारा देऊ शकतो. आपण दररोज १५ किलो हिरवा चारा जनावरांना देत असाल तर अशा वेळेस काही प्रमाणात हिरवा चारा तसेच १० ते २५ टक्के पशुखाद्य कमी करू शकतो.

डॉ. एस. पी. गायकवाड, ९८८१६६८०९९

(महाव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT