River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

प्रत्येक भारतीयांच्या मनात देशातील प्रमुख नदी विषयी महत्त्व आहे. हे भाषा, वेष इत्यादी बाबतीत वैविध्यपूर्ण असलेल्या खंडप्राय देशात कसे घडू शकले, ही एकात्मतेची भावना कशी निर्माण झाली, कुणी घडवून आणली, त्यासाठी असामान्य कल्पकता कुणी दाखवली, कोणी त्यासाठी कोणी जाणीवपूर्वक अविश्रांत प्रयत्न केले, याचा शोध घेणे आणि त्याची कृती करणे उचित आहे.

भारतासारख्या प्रचंड आकारमानाच्या देशातील प्रत्येक महत्त्वाच्या नदीच्या काठावर तिच्या उगमापासून संगमापर्यंत प्रवाह मार्गावर असंख्य तीर्थस्थळे आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी निश्‍चित केली. या ठिकाणी त्यांनी नदीला सुंदर घाट आणि त्यावर विशिष्ट देवतांची सुंदर मंदिरे बांधली. या स्थळांना धार्मिक स्थळाचे स्वरूप आणले. तीर्थस्थळाचे धार्मिक पावित्र्य त्यांनी वाढवले.

भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेच्या निमित्ताने सामान्य जनता देशातल्या भागात फिरू लागली. आर्य चाणक्य यांनी देशाचे दोन भागांत विभाजन करून त्यांना देव मातृक आणि नदी मातृक अशी नावे प्रदान केली आहेत. ज्या प्रदेशातील शेती केवळ पर्जन्यावर अवलंबून असते तो प्रदेश देवमातृक आणि नद्या व त्यांचे कालवे यांच्या आधारावर पिकणाऱ्या शेतीचा प्रदेश नदी मातृक असा असतो.

नद्यांचा वारसा

विंध्य पर्वताने भारताचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा या नद्या इतिहास आणि संस्कृतीच्या संरक्षक आहेत. नर्मदेच्या दोन्ही काठांवर आदिवासी साम्राज्य उदयाला आले, त्यांनी दुर्ग रचना केली, एक आरण्यक संस्कृती विकसित केली. गोदावरीच्या तीरावर सातवाहनांचे मोठे साम्राज्य उदयाला आले. मराठी संतांच्या भक्ती काव्याची गंगा, गोदावरीच्या कथांनी दुथडी भरून वाहिली.

कृष्णा नदी तर महाराष्ट्राची आराध्य देवता आहे. कावेरीच्या काठावर चोळ आणि पल्लव यांचे पराक्रम गाजले. द्रविड संस्कृती ही कावेरीची देणगी आहे. तुंगभद्रेच्या काठावर विजयनगरचे साम्राज्य आकाराला आले. वैदिक संस्कृतीच्या ज्वलंत अभिमानामुळे हे साम्राज्य इतिहासामध्ये अमर झाले.

हिमालयीन आणि द्वीपकल्पीय नद्या

सर्वसाधारणपणे नद्यांची हिमालयातून उगम पावणाऱ्या आणि द्वीपकल्पातून उगम पावणाऱ्या नद्या अशी वर्गवारी करण्यात येते. हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये जम्मू-काश्मीर, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, पंजाबच्या काही भाग बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल ही राज्य येतात. उर्वरित राज्ये ही द्वीप दीपकल्पीय नद्यांच्या भागात आहे असे स्पष्ट होते. एकूण ४९५ प्रथम आणि मुख्य नद्यांची खोरी यामध्ये येतात.

नदीचा उगम

नदीचे अनेक उगम स्रोत असतात. बहुतेक नद्यांची सुरुवात अनेक बारीक ओहोळ आणि प्रवाह एकत्र येऊन होते. काही ओहोळ हे बारमाही वाहते नसतात, काही काळ कोरडे असतात. त्यातला अमुकच हा नदीचा उगम असे काही आपल्याला म्हणता येत नाही, असे असताना सुद्धा महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या सर्व मोठ्या नद्या आणि काही लहान नद्यांच्या बाबतीत ठरावीक ठिकाण नदीचे उगमस्थान ओळखले जाते.

नदी समजून घ्या...

आपल्याला नदी दिनानिमित्त वास्तव ध्यानी घ्यावे लागणार आहे. नदीच्या कर्तृत्वाचा गौरव करत असताना आज यांच्यापैकी बहुतेक सर्वच नद्यांच्या परिसराला आलेली अवकळा पाहून वाईट वाटते. नदी कशी मरते किंवा जलस्रोत कसे लुप्त होतात, हे कोणत्याही नदीच्या काठी असणाऱ्या शहरात किंवा अगदी गावात फेरफटका मारल्यास सहज लक्षात येते. दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी मागणी ही सांडपाणीच निर्माण करते आहे हे वास्तव आहे. वाढणारे उद्योग, कारखाने, रासायनिक उद्योगांमधून होणारे प्रदूषण हे नदीला विषारी बनवत आहे.

जागतिक नदी दिनाचे महत्त्व

नद्या सर्व प्रकारच्या जीवनासाठी अपरिहार्य आहेत. पिण्याचे पाणी, पिकांना सिंचन आणि जैवविविधतेला आधार देतात. तथापि, प्रदूषण, औद्योगिक कचरा, जंगलतोड आणि पाण्याचा अतिरेक यामुळे जागतिक स्तरावर अनेक नद्यांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. जागतिक नदी दिन ही आव्हाने, गांभीर्य लक्षात घेऊन भावी पिढ्यांसाठी आपल्या नद्या अविरल आणि निर्मल करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज स्पष्ट करतो.

संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक नदी दिनाची सुरुवात २००५ पासून केलेली आहे. आपल्या जलस्रोतांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज तसेच जागरूकता निर्माण करण्यास मदत व्हावी यासाठी नदी दिनाची सुरुवात झाली. यामागे कॅनेडियन नदी संरक्षक मार्क अँजेलो यांची प्रेरणा आहे. त्यांना नदी संरक्षणाची आवड अनेक दशकांपूर्वी सुरू झाली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे या जागतिक उत्सवाची सुरुवात झाली. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी जागतिक दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो.

जागतिक नदी दिन २०२४ चे घोषवाक्य : जलप्रवाह स्वच्छ करूया

न द्यांचा होत असलेला ऱ्हास किमान काही अंशी थांबू शकेल ही इच्छा जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने व्यक्त करूयात. जागतिक नदी दिन हा केवळ नद्यांचा उत्सव नसून, नद्या या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, हे पुनः एकदा समजून घेऊन कृतिशील राहिले पाहिजे. जगभरातील लाखो लोक नद्या आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहीम, शैक्षणिक कार्यक्रम आणि संवर्धन उपक्रमांमध्ये भाग घेतात.

नद्या आणि त्यांच्या परिसंस्थेचे महत्त्व ओळखण्यासाठी जागतिक नदी दिन एक व्यासपीठ आहे. या अत्यावश्यक जलस्रोतांचे संरक्षण आणि जतन करताना उत्सव साजरा करण्याचे काही अर्थपूर्ण मार्ग आहेत. आजपासून वर्षभर आपण पुढील संकल्प करूयात...

  • नद्या, ओढे, नाल्यांतील पाणी प्रदूषित होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही.

  • रासायनिक अंश असलेले साबण मी वापरणार नाही.

  • माझी गाडी, वाहन मी कोरड्या किंवा ओल्या कपड्याने स्वच्छ करेन. नदीच्या किनारी मी गाडी धुणार नाही. रसायनाने गाडी धुणार नाही.

  • नद्यांना आणि पाण्याला माझ्या जीवनात अत्युच्च स्थान आहे, त्यामुळे मी ते प्रदूषित होणार नाही याची काळजी घेईन, तसेच ते वाया जाईल असे कृत्य करणार नाही.

  • प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करणार नाही, पाण्याच्या पुनर्वापरावर भर देईन.

  • मला माहिती आहे की नैसर्गिक सौंदर्य हेच खरे आहे, तेव्हा कृत्रिम रसायनाचा वापर मी करणार नाही.

  • शक्यतो सुती कपडे मी वापरेन.

  • सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी वापरेन, सूक्ष्म सिंचनाचा वापर करेन.

  • आजपासून वर्षभर आपण हे निश्चित करूयात, की मी कोणताही नाला, ओढ्यामध्ये रसायन, साबण किंवा इतर प्रदूषके टाकणार नाही.

  • गाड्या धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर आणि रसायन विरहित साधनांचा वापर करून मी माझ्या गाड्या स्वच्छ करेन. गाड्या स्वच्छ करताना त्याचे पाणी नाला, ओढा नद्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घेईन.

  • मी वृक्षतोड करणार नाही. किमान दहा तरी झाडे लावून मी ती जगवणार.

  • माझ्या परिसरातील ओढ्याचे नाल्याचे जलप्रवाहाचे मी रक्षण करेन.

  • भारतीय जलसंस्कृतीच्या मानकांनुसार मी नदी आणि पाण्याला माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले आहे. मी पाणी कधीही अस्वच्छ करणार नाही.

  • निर्माण झालेले स्वच्छ प्लास्टिक मी पुनर्वापरासाठी देईन.

  • विष्ठा, मैला, सांडपाणी स्वच्छ प्रवाहात जाणार नाही याची मी सर्वतोपरी काळजी घेईन आणि ते जात असल्यास मी जवळच्या शासकीय कार्यालयात त्याची लेखी कल्पना देईन.

  • सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या अन्नधान्याच्या वापरावर माझा भर राहील याची मी काळजी घेईन.

शैक्षणिक संस्थांतर्फे उत्सव

  • शैक्षणिक संस्थांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, संस्थाचालक, संस्थाप्रमुख यांनी विशेषतः एक लेखी सूचना काढून त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये जागतिक नदी दिन साजरा करण्याबाबत सूचना द्याव्यात.

नदीची सहल :

  • जवळच्या नदीच्या प्रवाहावर मुलांना नेऊन त्यांना तो प्रवाह दाखवून नदी संवर्धनाची शपथ घ्यावी.

  • शाळांची नदीकाठी सहल काढावी. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने काही ठिकाणी नद्या अजूनही चांगल्या प्रवाहित आहेत. तेव्हा योग्य ती काळजी घेऊन मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षकांनी नद्यांबद्दल नदीकाठी नेऊन माहिती द्यावी.

  • महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहकार्याने नद्यांचे घाट, ओढा, नाला, नदी परिसराची स्वच्छता करावी. ही केवळ एक दिवसाची कृती नसून संपूर्ण वर्षभर ही संकल्पना राबवायची आहे. आठवड्यातून किमान एक दिवस नदीसाठी द्यावा.

  • ‘माझा गाव- माझी नदी’ हा किंवा तत्सम विषय घेऊन मुलांची निबंध स्पर्धा घ्यावी आणि त्या निबंध स्पर्धांचे पारितोषिक त्यांना द्यावे. यासाठी काहीच शैक्षणिक संस्थांनी २ ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही निश्‍चित केल्याचे लक्षात येते.

  • प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात नदी संवाद आणि सुधार समिती स्थापन झाल्या आहेत किंवा स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे, अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन नदीवर जाऊन नदीची प्रार्थना करावी आणि प्रतिज्ञा घ्यावी, की मी नदीचा घाट स्वच्छ ठेवेन, सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. याबाबत काही उदाहरणे मार्गदर्शक ठरणारी आहेत.

कोपरगाव येथे अविनाश ढाकणे हा युवक गेल्या सात वर्षांपासून दर आठवड्याला गोदावरी नदीकाठी जाऊन तेथील प्लॅस्टिक, निर्माल्य इत्यादी कचरा स्वतः गोळा करतो. नदीच्या पात्राबाहेर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावतो. त्याचे हे नदीवरील निश्‍चित प्रेम आणि कृतिशीलता आपल्याला प्रेरणादायी ठरते.

नांदेड शहरात गोदावरी नदीकाठी तसेच इत्यादी ठिकाणी दर आठवड्याला काही स्थानिक लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये पर्यावरणपूरक गोष्टींची चर्चा होते. काही जैविक साधनांचा वापर करून नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्नही केला जातो.

पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थांचा ‘रिव्हर क्लब’ कार्यरत आहे. आठवड्याला एक दिवस ते नित्य नियमाने भेटतात. नदीबाबत जलस्रोतांच्या स्वच्छतेबाबत चर्चा करतात. पर्यावरण पूरक जीवनशैली कशी असावी याबाबत चर्चा करतात. केवळ चर्चा करून थांबत नाहीत तर ते अनुकरण देखील करतात.

पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील वाल्हेकर वाडी येथे एका दशकापासून नदी स्वच्छतेचा उपक्रम सुरू आहे.

डॉ. सुमंत पांडे

माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे ९७६४००६६८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT