Lakhmapur News : शिंदवड येथे वर्षभरापासून दोन बिबटे व दोन बछडे गावाच्या उत्तर बाजूस असलेल्या डोंगर परिसरात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. नाशिकच्या आंबट-गोड द्राक्षांनी परदेशात देखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे.
आता मानव वस्तीत राहणारा बिबट्यादेखील द्राक्ष खात असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याने (Bibtya) चक्क दोन ते तीन द्राक्ष घड खाल्ल्याचे दिसून आले आहे.
भाऊसाहेब मोरे यांच्या शेतात काळीची द्राक्ष काढणीसाठी तयार आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे बंधू अशोक मोरे बागेतून जवळच असलेल्या परशरामबाबा समाधीच्या पूजेसाठी जात असताना बागेतून ओरखडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडताच त्यांनी खाली बसून बघितले असता बागेत बिबट्या दूरवर दिसला.
बिबट्या आपल्या पंजाने बागेच्या वेलीवर ओरखडत होता व द्राक्ष खाली पाडत होता. या वेळी मोरे यांनी जवळच्या लोकांना आवाज देताच बिबट्याने धूम ठोकली. आता दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे.
बिबट्याने पाच-सहा दिवसांपूर्वी रत्नगड जवळ राहत असलेले कचरू पवार व सुनील गांगुर्डे यांच्या घराजवळून कुत्र्याला ठार केले होते.
शनिवारी मीराबाई गांगुर्डे यांना सकाळी साडेआठला बिबट्या घरासमोरून जात असताना बघितला, तसेच आठ दिवसांपूर्वी मेंढपाळ ढेपले रात्री कांद्याच्या शेतात मुक्कामी असताना बिबट्याने रात्री दीडच्या सुमारास शेळ्या-मेंढ्याच्या कळपात घुसून हल्ला केला.
मेढ्यांच्या आवाजाने ढेपले जागे झाले व कोकरू ठार करून बिबट्याने बोकड पकडल्याचे दिसून आले. ढेपले यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्या पळून गेला.
शेतकरी जीव मुठीत घेऊन पिकाला पाणी देतात, आता तर दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने भीतीचे वातावरण आहे. पिंजरे वाढविण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांकडून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.