Human Psychology  Agrowon
ॲग्रो विशेष

Human Psychology : विचारांचा अभ्यास आणि मनाचे गणित सोडवायला शिका

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी
Human Health : व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने प्रत्येकाची मानसिकता वेगळी, मनाचे गणित वेगळे. मात्र आपण सूरज आणि संतोषच्या उदाहरणात बघितलं तसं कोण कुठवर प्रवास करणार, प्रगती करणार की ठप्प होणार..हे ठरणार मनाच्या गणितावर! स्वगत आणि त्यामागचा दृष्टिकोन बदलला की परिणामही बदलतो. हे आहे आपले मनाचे समीकरण.

मागच्या लेखामध्ये आपण संतोष आणि सूरजची कहाणी वाचली. एकाच परिस्थितीत असलेल्या या दोन मित्रांनी त्यांच्या मानसिकतेनुसार वेगवेगळे निर्णय घेतले आणि दोन वर्षांनी अगदी वेगळे फळ त्यांच्या पदरी होते.
संतोष आणि सूरज रा दोन मनोवस्थांमधील फरक नेमकेपणाने सांगायचा झाला तर
संतोष म्हणतो - परिस्थिती बदलली तरच सगळे बदलेल. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी!’
सूरज म्हणतो - परिस्थिती बदलेल किंवा न बदलेल, मला बदलायला हवे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!’

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाची मानसिकता वेगळी, मनाचे गणित वेगळे. मात्र आपण सूरज आणि संतोषच्या उदाहरणात बघितलं तसं कोण कुठवर प्रवास करणार, प्रगती करणार की ठप्प होणार... हे ठरणार मनाच्या गणितावर! हे गणित आपण आजच्या लेखात समजून घेऊया.

‘गणित’ म्हटलं की तुमच्या मनात काय आलं?
कोणी म्हटलं असेल, “अरे बापरे, गणित!” तर दुसरा कोणी म्हणेल, “अरे वा! गणित मला आवडतं बुवा!”
खरं तर गणित विषय एकच; पण कोणाला भीती वाटली, तर कोणाला गंमत. असं का बरं होतं? त्याचं कारण आहे, दोन्ही व्यक्तींचा सेल्फ-टॉक म्हणजे स्वसंवाद आणि त्यामागचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.

पहिली प्रतिक्रिया देणाऱ्याच्या मनातील स्वगत असेल -“नको रे देवा. गणित किती अवघड असते! माझा पिच्छाच सोडत नाही हे गणित... ते आकडे, शून्याचा भोपळा, आणि पोटात गोळा. कशाला हवे आता गणित?” मग तो म्हणतो, “अरे बापरे, गणित!” तर दुसऱ्याचा स्वसंवाद आहे, “गणित छान विषय आहे. सोपा आहे. एकदा सूत्रं कळली की. माझ्या एकदम आवडीचा विषय...” तो म्हणेल “अरे वा वा! गणित म्हणजे मस्तच की!”
म्हणजे आपल्याला असं दिसतंय की स्वगत आणि त्यामागचा दृष्टिकोन बदलला की परिणामही बदलतो. हे आहे आपले मनाचे समीकरण.

शाळेत असताना क्ष, य (x, y) वापरून आपण गणितं सोडवायचो. मनाच्या गणितात मात्र आपण A, B आणि C वापरणार आहोत. यापैकी A आणि C काय दर्शवतात?
- A (Activating Event)
इव्हेंट (Event) म्हणजे घटना, ॲक्टिव्हेटिंग (Activating) म्हणजे भावनिक दृष्टीने उत्तेजित करणारी घटना.
- C (Consequence)
कॉनसीक्वेन्स (Consequence) म्हणजे परिणाम.

संतोष म्हणतो, ‘‘कर्जमाफी मिळाली नाही, अनुदानही मिळालं नाही. म्हणून रान विकायला लागले.’’
म्हणजे-
- कर्ज माफ न होणे, अनुदान न मिळणे हा झाला A – भावनिकदृष्ट्या उत्तेजित करणारी घटना.
- त्याचा परिणाम C काय? तर मला रान विकावे लागले!

रान का विकायला लागले? तर कर्जमाफी नाही म्हणून. परिस्थितीत बदल व्हायचा तर घटना (कर्ज न मिळणे) बदलायला हवी. जोवर कर्जमाफी मिळत नाही, अनुदान मिळत नाही (म्हणजेच A किंवा घटना बदलत नाही) तोपर्यंत संतोषचा निर्णय आणि परिस्थिती अशीच राहणार.
A मुळे C घडले आहे, A बदलला तरच C बदलेल. याला आपण म्हणतो AC ट्रॅकवरील विचार. (आकृती १)

AC ट्रॅकवर होणारा विचार हा ऑटोमॅटिक, आपोआप मनात येणारा, आपल्या हार्डवेअरचा भाग. असा AC ट्रॅकचा विचार जेव्हा होतो, तेव्हा जे परिणाम होतात ती असते आपली Reaction किंवा प्रतिक्रिया. ह्यातील C म्हणजे परिणाम हे ३ प्रकारचे आहेत -
- मनाला जाणवणारी भावना
- व्यक्तीकडून घडणारे वर्तन
- व्यक्तीला शरीरपातळीवर जाणवणारे बदल किंवा संवेदना.

संतोषला जाणवणारे परिणाम आहेत -
- निराशा, हताशा, चिंता अशा भावना.
- रया जाणे, वर्तनात धरबंध नाही, असे वागण्यातील बदल.
- शरीरावर होणारे परिणाम म्हणजे आम्लपित्त, डोकेदुखी, झोपेवर परिणाम, पुढे जाऊन साखरेची किंवा रक्तदाबाची बीमारी.

सूरजच्या बाबतीत काय वेगळे होते? त्याच परिस्थितीत त्याचे विचार आणि कृती वेगळी घडली, याचे कारण म्हणजे त्याचा दृष्टिकोन किंवा बिलीफ (B) संतोषपेक्षा वेगळा होता!

काय असतात हे बिलीफ किंवा दृष्टिकोन?
आपल्या मनात सतत आणि वारंवार सुरू असणाऱ्या स्वसंवादात काही सूत्रे तयार होत असतात. या सूत्रांनाच आपण बिलीफ (Belief) असे म्हणतो.
उदाहरणार्थ, एखाद्याच्या स्वगतामध्ये सूत्र असते – “माझे कुठलेच काम धड होत नाही.” कोणाला वाटत असतं, “माझं म्हणणं माझ्या जवळच्या व्यक्तींना पटायला हवं आणि त्यांनी अजिबात विरोध करता कामा नये.” ही सूत्रे म्हणजेच माझ्या मनातल्या धारणा किंवा belief. (आकृती २)

प्रत्येकाच्या मनात अशी काही सूत्रे अगदी घट्ट रुजलेली असतात. मनात येणारे स्वगत किंवा विचार या सूत्रांना अनुसरून येत असतात. स्वगताचे भान आणि जाण कशी वाढवायची हे आपण पाहिले आहे. हे भान वाढलं की आपल्या विचारांमध्ये कुठली सूत्रे आहेत, याची आपली समज वाढू लागेल.

मनाच्या समीकरणात आपल्याला वाटतं तसं A मुळे C घडत नसून, आपल्या विचारांची सूत्रेदेखील भूमिका बजावतात. सूरजने वेगळ्या धारणेतून येणारे विचार आणि कृती ठेवली म्हणून त्याला वेगळे परिणाम मिळाले.

आपले B म्हणजेच धारणा समजल्या की A जरी अवघड, त्रासदायक असेल, तरी उपयुक्त B वापरून आपण अधिक चांगला C (परिणाम) मिळवू शकतो.
आपल्या धारणांविषयीची जाणीव आणि त्याचा वापर म्हणजे A-B-C ट्रॅक. ABC ट्रॅकवर असताना दिला जातो तो प्रतिसाद (response).

सूरजने आपल्या B म्हणजेच विचारातील धारणा कशा ओळखल्या आणि वापरल्या ते आपण बघूया.
त्याने स्वगताचे म्हणजेच विचारांचे निरीक्षण आणि परीक्षण केले. त्या स्वगतातील नेमकी सूत्रे कोणती ती ओळखली. काय असतील ही सूत्रे?
- कर्जमाफी किंवा अनुदान यावर विसंबून न राहता मला काही वेगळे प्रयोग करून बघायला हवे.
- हे प्रयोग फसतील किंवा जमतील; ती जोखीम मला स्वीकारावी लागेल.
- माझ्या या प्रयोगात मला यश मिळालं तर मला नक्की समाधान होईल. पण ते नाही मिळालं तरी मी स्वतःवर यशस्वी/अयशस्वी असा कायमस्वरूपी शिक्का लावून घेणार नाही.
- एखाद्या प्रयोगात अपयश आलं तर मी शेतकरी म्हणून अयशस्वी किंवा कुचकामी आहे असे लेबल मी लाऊन घेणार नाही.
म्हणूनच सूरज स्वतःला ‘कर्ता – करत राहणारा’ असं बघतो.

सूरज आहे त्याच परिस्थितीत वरील धारणा गाठीशी बांधून विचार करतो तेव्हा त्यातील C म्हणजे परिणाम कसा दिसतो?
- भावनाः हळहळ किंवा काळजी वाटेल. पण अतीतीव्र चिंता किंवा निराशा नसेल.
- वागण्यात काय दिसणार? परिस्थितीतून मार्ग काढण्याची धडपड, प्रयत्न.
- शरीरावर होणारे परिणाम म्हणजे अस्वस्थता, थोडी चुळबुळ. पण कुठल्याही तीव्र त्रासाची लक्षणे त्याला जाणवणार नाहीत.

कर्ता शेतकरी बनायचं असेल तर आपण आपल्या परिस्थितीला / घटनेला (A) परिणामांसाठी (C) जबाबदार न धरता, आपल्या विचार आणि धारणांवर (B) काम करायला हवे. AC ट्रॅक नव्हे, तर ABC ट्रॅकचे मनाचे समीकरण आपण शिकायला हवे!

कर्तेपणाची कुठली लक्षणे दिसतील आपल्याला अशा ABC ट्रॅकने जाणाऱ्या व्यक्तीमध्ये?
- कर्ता स्वतःच्या विचारांची, भावनेची आणि वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घेतो.
- भूतकाळ, परिस्थिती, व्यक्ती आणि घटना यांना आपल्या विचार-भावना-वर्तन याबद्दल अथवा वर्तमानाबद्दल जबाबदार धरत नाही.
- पुढे जाण्यासाठी बाह्यपरिस्थिती, नशीब यावर अवलंबून राहत नाही.
- स्वतःमधील कमतरता, त्रुटी यातच अडकून न पडता, त्यामधील काय बदलता येणे शक्य आहे यावर भर देतो.

विचारांचा अभ्यास आणि मनाचे गणित सोडवायला का शिकायचे तर ABC ट्रॅकचे मनाचे समीकरण पक्के व्हावे म्हणून!
-------------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=AKGKOI-ecOw&t=14s

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT