डॉ. आदिनाथ ताकटे
बागायती गहू पिकाची उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही भागांत १५ डिसेंबरनंतरही गहू पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर उशिरा पेरणी केल्यास पुढील प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादनात घट येते.
बागायती गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करण्याची शिफारस आहे. मात्र विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना शिफारशीत वेळेत पेरणी करणे शक्य होत नाही. या वर्षी जून महिन्यात मॉन्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलै महिन्यात उशिराने झाल्या. परिणामी, खरीप हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन, कापूस पिकांसह अन्य पिकांच्या काढणीस विलंब झाल्याने गहू लागवडीस उशीर होत आहे.
गहू पिकाचे एकूण उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते. बागायती गहू पिकाची उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही भागांत १५ डिसेंबरनंतरही गहू पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर उशिरा पेरणी केल्यास पुढील प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादनात घट येते.
लागवड नियोजन
बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४), निफाड ३४, एनआयएडब्ल्यू-३४ किंवा एकेएडब्ल्यू-४६२७ या सरबत्ती जातींची लागवड करावी.
बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
बागायती गहू पिकाची उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करावी.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणांस ३ ग्रॅमची थायरम प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाणे प्रक्रिया करावी.
पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी पद्धतीने करावी. आंतरमशागत सोईची होते.
बियाणे मातीआड होऊन व्यवस्थित झाकले जाण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा. जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी पहिली खुरपणी करावी.
खत व्यवस्थापन
रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्यांच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
पेरणी करतेवेळी नत्राची अर्धी मात्रा तर संपूर्ण स्फुरद व पालाश (९०:६०:४० नत्र:स्फुरद:पालाश किलो प्रति हेक्टरी) म्हणजेच ९८ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅशची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. उर्वरित नत्राचा हप्ता म्हणजेच ९८ किलो युरिया पहिली खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.
पाणी व्यवस्थापन
जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. सिंचनासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.
बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.
तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसा दरम्यान द्यावे.
जर एकच पाणी देणे शक्य असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. दोन पाणी देण्याइतके पाणी उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल, तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.