Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land Acquisition : दूरदृष्टीचा अभाव

Story of Agriculture : हंबीरराव नावाचा अतिशय प्रयोगशील व कष्टाळू शेतकरी होता. १९५० ते १९६० या काळात जिल्ह्यातील शेतीविषयक सर्व पुरस्कार त्याला मिळत असत.

शेखर गायकवाड

Land Dispute : हंबीरराव नावाचा अतिशय प्रयोगशील व कष्टाळू शेतकरी होता. १९५० ते १९६० या काळात जिल्ह्यातील शेतीविषयक सर्व पुरस्कार त्याला मिळत असत. सर्वाधिक उत्पादन, सर्वांत जास्त वजनाचा केळीचा घड, सर्वाधिक भाताचे उत्पादन, हेक्टरी गव्हाचे सर्वाधिक उत्पादन अशा अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना त्या काळात मिळाले.

अतिशय चांगले चालले असताना १९६३ च्या आसपास जमीन नांगरताना एक घटना घडली. त्या काळात खोलगट नांगरट करण्याची एक मोहीमच सुरू झाली होती. जास्त खोलगट नांगरट झाली, तर जास्त उत्पादन येते व माती खालीवर व्हायला मदत होते, याची सर्व शेतीतज्ज्ञ चर्चा करत असत. हंबीररावने त्या वर्षी जमीन सपाट करण्यास देखील सुरुवात केली होती.

जमिनीतील सर्व चढ-उतार काढून टाकून लोखंडी फळीने जमीन सपाट करायला सुरुवात केली. उंचवटा असलेल्या भागांमध्ये पाणी चांगले बसायचे नाही म्हणून तो उंचवटा कमी करण्याचा हंबीररावने प्रयत्न केला. अशा पद्धतीने जमिनीतल्या कोपऱ्यामध्ये उंचवटा कमी करत असताना आणि खोल नांगरट करताना अचानक नांगरटीच्या मध्ये फार जुनी एक दगडी अर्धवट तुटलेली मूर्ती त्याला सापडली.

सर्व कुटुंबात चर्चा सुरू झाली. सर्व गावकरी ती मूर्ती बघायला धावले. आणि हंबीरराव किती पुण्यवान माणूस आहे, त्याच्या जमिनीत देव सापडले असे लोक म्हणू लागले. काही लोकांनी जुन्या माणसांशी चर्चा केली. कोणीतरी अशी सूचना केली, की याच ठिकाणी तशीच दिसणारी मूर्ती नव्याने तयार करून एक छोटेखानी मंदिर बांधावे. सगळ्या गावकऱ्यांपुढे हंबीररावसुद्धा वेगळा विचार करू शकला नाही. दिवाळीच्या पाडव्यापर्यंत या ठिकाणी एक छोटेखानी मंदिर बांधण्यात आले.

जमिनीतील पाच फूट बाय दहा फूट एवढी जागा देवळाला गेली. त्यामुळे हंबीररावला सुरुवातीला वाईट वाटले नाही. जवळपास पंधरा-वीस वर्षे अशीच परिस्थिती राहिली. कधीतरी गावातले लोक येत आणि देवाचे दर्शन घेत. एक दोन माणसं दररोज येत असली, तरी त्याला सार्वजनिक देवळाचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते. १९८० च्या दशकात हंबीररावचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी गावातल्या काही लोकांनी दरवर्षी तिथीप्रमाणे त्या मंदिरासमोर यात्रा भरवायची टुम काढली.

हंबीररावचा थोरला मुलगा माधव आता ही जमीन कसत होता. काळा बरोबर हंबीररावचा दरारा संपुष्टात आला होता. लोकशाही हळूहळू रुजत होती आणि आपली शेती प्रामाणिकपणे करणारा माधव गावकऱ्यांच्या दबावापुढे झुकत होता. गावाला विरोध करायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. पण गावाच्या आड लपून कोणीतरी गपचूप राजकारण खेळत होते. बघता बघता पहिल्या वर्षी यात्रेला ५०० पेक्षा जास्त माणसे हजर राहिली.

त्या रानातले सगळे पीक लोकांनी तुडवले होते. हळूहळू यात्रेच्या ठिकाणी दुकाने आणि खेळण्याचे स्टॉल लागू लागले. बघता बघता पाळणे, खजिना, पालखी इत्यादी यात्रेतल्या अनेक गोष्टी या शेतात सुरू झाल्या. माधव तर अक्षरशः आपण कशाला देऊळ बांधले, असा विचार करू लागला होता. शेवटी अनेक लोकांचा सल्ला घेऊन त्याने दिवाणी कोर्टातून मनाई हुकूम घेण्याचा विचार केला.

दरम्यानच्या काळात कुठून तरी एक माणूस मला दृष्टांत झाला आहे असे सांगून मंदिरात येऊन थांबू लागला. आता मंदिराचा मठ तयार होऊ लागला होता. पाच ते सहा वर्षे मनस्ताप सहन करून शेवटी हे मंदिर खासगी जागेमध्ये आहे, त्याचे स्वरूप सार्वजनिक नाही. त्यामुळे या जमिनीत जाण्यासाठी कायमस्वरूपी मनाई दिवाणी कोर्टाने माधवच्या बाजूने दिली. त्यामुळे खासगी माणसाचे नुकसान करून यात्रा भरवण्याचा अनेक लोकांचा मनसुबा धुळीला  मिळाला होता.

वार्षिक यात्रा येण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदरच न्यायालयाने कायमस्वरूपी मनाई दिल्यामुळे आता या वर्षी काय होणार याची गंमत अनेक लोक पाहत होते. प्रचंड पोलिस बंदोबस्तामध्ये मनाई हुकमाची अंमलबजावणी करताना अचानक आणखी एक गोष्ट झाली. त्या मंदिरात येऊन राहणारा पुजारी आदल्या रात्री गायब झाला.

त्या पुजाऱ्याऐवजी आता अचानक एक बाई तिथे मुक्कामाला आली. तिला सगळे गावकरी गुरुबहीण म्हणत होते. कुणाच्याच ओळखीची नसलेली ही बाई सगळ्या गावाची गुरुबहीण कधी झाली, हेच माधवला कळेनासे झाले. एक तुटलेल्या मूर्ती सापडलेल्या घटनेपासून गेल्या ३० वर्षांचा सगळा प्रवास माधवला हेच सांगत होता, की वडिलांनी भोळसटपणाने केलेल्या एका छोट्या कृत्यामुळे कोर्टामध्ये हजारो रुपये त्याचे गेले होते आणि प्रचंड मनस्ताप झाला होता.

एवढे करून सगळे गावकरी त्याच्या विरोधात बोलत होते. एकेकाळी सगळ्या गावांमध्ये आदर्श असणारा हंबीरराव नावाचा शेतकरी आणि कष्ट करून जगणारा माधवराव हे आता गावकऱ्यांना परके वाटत होते. माधवराव मात्र मनातल्या मनात वडिलांच्या दूरदृष्टीच्या अभावाला आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT