Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : ‘खरीप वाया गेला; आता रब्बीचे कसे होईल?’

Team Agrowon

Nashik News : जुलै महिन्यानंतर पावसाने जवळपास दोन महिने खंड दिला. त्यानंतर सप्टेंबरच्या मध्यात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र हा पाऊस अद्याप समाधानकारक नसल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ९३३.८ मिमी आहे. मात्र प्रत्यक्षात ६४२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण ६८.८ टक्के आहे. ऑक्टोबरमध्ये अत्यल्प पाऊस असून कडक ऊन पडू पडल्याने रब्बी हंगामाचे वेध लागले असताना पेरण्यांची चिंता लागून आहे. ‘खरीपच वाया गेला; आता रब्बीचे कसे होईल?’ अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

चालूवर्षी जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी असल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र अनेक भागांत पाऊस जेमतेम असल्याने संभाव्य रब्बी पेरण्यांवर परिणाम होणार आहे. पाणीसाठा नसल्याने शेतकरी यंदा पीक बदलाच्या अंगाने विचार करत आहेत.

त्यामुळे काही ठिकाणी गहू पेरण्या कमी-अधिक राहतील. तर कमी पाण्यावर येणारे हरभरा, ज्वारी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. तर यंदा चारा व उत्पन्नाच्या अनुषंगाने रब्बी हंगामात मका लागवडीला पसंदी देत आहेत. कृषी विभागाने प्रस्तावित क्षेत्र जाहीर केले आहे, मात्र पीक बदल होऊन यंदा पेरण्यांचा टक्का घटणार असल्याचा अंदाज आहे.

दरवर्षी सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होतो; मात्र यावर्षी भूजल पातळी घटल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे आगामी काळात पेरण्याची हिंमत शेतकरी करत नाहीत. काही शेतकरी थोड्याफार ओलीवर तसेच विहिरीतील पाण्यावर रब्बीचे नियोजन करत आहेत.

बाजरी, सोयाबीन सोंगणी झाली असून शिवार खाली करत आहेत. तर भुईमूग काढणी केली जात आहे. अंतिम टप्प्यातील पावसामुळे छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये तुर्तास पाणीसाठा आहे. मात्र जानेवारीतच पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

यंदा धरणसाठ्यात १५ टक्के तूट


जिल्ह्यात मोठे ७ व मध्यम १७ अशा एकूण २४ धरण प्रकल्पांत ८५ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो १०० टक्के होता. त्यामुळे यंदा १५ टक्के तूट आहे. १३ धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र पूर्व भागात पाण्याचे संकट कायम आहे. धरणातील पाणीसाठा लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत.

त्यामध्ये पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी व चारा या प्रमुख्य महत्त्वाच्या बाबी असून भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन येत्या ऑगस्ट २०२४ पर्यंत पुरेल या दृष्टीने पाण्याचे नियोजन करणे निकडीचे आहे, असे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र असे असताना जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे आवर्तन नाही तर जिथे तूर्त गरज नाही, अशा ठिकाणी आवर्तन सुरू असल्याने आताच शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील चित्र अधिक बिकट झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

पेरण्यांची स्थिती अशी  
पीक २०२२-२३ पेरणी .२०२३-२४ प्रस्तावित पेरणी (हेक्टर)
ज्वारी २,२७१ ४,२१३
गहू ५८,७९३ ६४,६७६
हरभरा ३४,१९६ ३१,१९९
मका ७,३९२ १३,३६१

रब्बीच्या तोंडावर चित्र असे
  खरीप वाया गेल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणी तयारी
  जमिनीतील वाफसा पाहून हरभरा पेरण्या सुरू
  पूर्व भागात पाण्याची टंचाई असल्याने कामे अस्थिर
  शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढून रब्बी मका लागवडीची लगबग
  खतांची उपलब्धता धीम्यागतीने

यंदाच्या पेरण्या कराव्या की नाही असा प्रश्न आहे. पाणी पुरेल की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे कमी पाण्यावर येणारे ज्वारी हरभऱ्यासारखे पीक घेण्याकडे कल आहे. कांदा लागवडी कमी झाल्या आहेत. यंदा सर्व गणिते बिघडली आहेत.
- अमोल गागरे, शेतकरी, वागदर्डी, ता. चांदवड
सध्या पावसाने सर्व चित्र अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर सोयाबीन काढून लगेच मका करण्याकडे कल आहे. पुढे उत्पादन आले तर नाहीतर चारा मिळाला पाहिजे, असे नियोजन आहे.
- किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT