Chhatrapati Sambhajinagar : ‘‘महाराष्ट्रात अनेक नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी याच राज्यात. असे असतानाही शहरांना, जनतेला पाणी देऊ शकत नाही का? जनता फक्त शेती आणि पिण्यासाठी पाणी मागतेय सोन्याच्या विटा मागत नाही,’’ असा घणाघात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरातील जबिंदा मैदानावर सोमवारी (ता. २४) सायंकाळी आयोजित सभा व पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी राव बोलत होते.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे सुपुत्र संतोष माने, अभय पाटील चिकटगावकर, बाळासाहेब सानप यांच्यासह जवळपास २०१ जणांनी या वेळी बीआरएस पक्षात प्रवेश केला.
श्री. राव म्हणाले, ‘‘ महाराष्ट्रात रोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतात. पंतप्रधान किंवा राज्यातील नेत्यांना काहीच देणे घेणे नाही. वाघासारखे शेतकरी मात्र, मरत आहेत. पण सत्ताधारी लोक आफ्रिकेचे चित्ते आणि नामिबियाचे वाघ आपल्याला दाखवत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे काहीच देणेघेणे नाही.’’
‘...तर शेतकऱ्यांना मुबलक पाणी’
‘‘देशात ४१ कोटी एकर शेती आहे. त्यासाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी आहे. पण जनतेपर्यंत पोहचविण्याची मानसिकता राजकारण्यांची नाही. देशात सिंचन क्षमता वाढवायची असेल तर धरणांची संख्या वाढवावी लागेल.
पाणी आपण निर्माण करू शकत नाही, ते देव देतो इतर देश त्याचा वापर, नियोजन सुक्ष्मपणे करीत आहेत. आपण लक्षात घेत नाहीत. इथे आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना मुबलक पाणी देऊ. वाहून जाणारे पाणी समुद्रात जाऊ दिले जाणार नाही, शेतात आणू,’’ अशी घोषणा राव यांनी केली.
‘शेतकऱ्यांनाच नेते बनवू’
श्री. राव म्हणाले, ‘‘तेलंगणात आम्ही निवृत्त मुख्य सचिवांना सोबत घेऊन विकास केला आहे. इथे का होत नाही? महाराष्ट्रात हा उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करीत आहोत. तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत सदस्य, आमदार, खासदार व्हा. मोठ्या नेत्यांची आम्हाला गरज नाही. तुमच्यातील नेते तयार करण्याचे काम आम्ही करणार आहोत.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.