Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Scheme : ऑनलाइन नोंदणीमध्ये जालना जिल्हा राज्यात अव्वल

Team Agrowon

Jalna News : राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. महावितरणच्या या वेबसाइटला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चौदा दिवसांत राज्यातून १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे. या नोंदणीत जालना जिल्हा सर्वांत पुढे असून, जिल्ह्यातून ५२ हजार ६७ अर्ज दाखल झाले आहेत.

शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा. यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली. तिचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसांत राज्यातील १ लाख २२ हजार ४२१ शेतकऱ्यांनी वेबसाइटवर अर्ज दाखल केले आहे.

यात वेबसाइटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ हजार ६७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात.

शेतकऱ्यांना सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषिपंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते.

सौरऊर्जा निर्मिती पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहत नाही. तसेच त्याला बिलही येत नाही.

सिंचनासाठी केवळ दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

येथे नोंदणी करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे ऑनलाइन नोंदणी करा : https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php

मराठवाड्यातील आलेले अर्ज

जालना ५२०६७

बीड २४,५२६

परभणी १५,०४३

छत्रपती संभाजीनगर ६,८८८

हिंगोली ५,०७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT