mohan hirabai hiralal Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : बहुमताची नव्हे, तर सर्वसहमतीची लोकशाही हवी : मोहन हिराबाई हिरालाल

Agriculture issues : मुळात शेती ही उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेली कृती आहे. निसर्गाने शेती नाही तर जंगल तयार केले. माणसाने जंगल कापून शेती कसण्यासाठी पुढाकार घेतला. हे निसर्गविरोधी कृत्य आहे. यातून पर्यावरणाचा ऱ्हास झाला. अनेक दूरगामी दुष्परिणाम झाले. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे दिसून येते. निसर्गाच्या विरोधात कोणतेही कृत्य केले तरी त्याचे दूरगामी परिणाम भोगावेच लागतात, अशी रोखठोक भूमिका गांधीवादी विचारवंत मोहन हिराबाई हिरालाल मांडतात.

Vinod Ingole

तुम्ही आडनाव लावत नाही. नावात वडिलांच्या आधी आईचं नाव लावता. त्यामागचं कारण काय?

- मी १९७८ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालो होतो. त्या माध्यमातून संपूर्ण देशभरात फिरता आलं. त्या वेळी आडनावावरून जातीची ओळख होते हे लक्षात आलं होतं. आपलं आडनाव कळू नये याकरिता नावात बदल करण्याचा निर्णय घेतला. पुरुषप्रधान आणि जातिव्यवस्थेवर आधारित विषम समाजव्यवस्थेला असलेला विरोध, समतेला असलेला पाठिंबा व्यक्त करण्याचा हा प्रयत्न होता. १९७८ मध्येच यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नावात वडिलांबरोबर आईचं नाव जोडल्यानं तिला खूप आनंद झाला. वडिलांचं नाव मिरवणाऱ्या अपत्यावर आईचाही तेवढाच हक्क असतो. आपण स्त्री-पुरुष समानता मानत असू, तर वडिलांच्या बरोबरीनं आईचं नावंही लावावं, नावाच्या माध्यमातून आईला स्वतंत्र ओळख मिळवून द्यावी आणि इतकी वर्षे तिला मागंच राहावं लागलं म्हणून आता वडिलांच्या आधी तिचं नाव लावायचं, या विचारानं मी हा निर्णय घेतला होता. व्यक्तीची ओळख त्याच्या गुणवत्तेवरून, चारित्र्यावरून व्हावी. त्यामुळेच माणसामाणसांत भेद करणारी, उच्च-नीच मानणारी ही व्यवस्था मान्य नसेल तर ती मुळापासून उखडणे आवश्यक आहे. हा विचार आईचं नाव लावण्यामागं होता.

तुम्ही ग्रामस्वराज्याच्या कामाशी कसे जोडले गेलात?

- माझ्यावर गांधी विचारांचा प्रभाव आहे. पूर्वी म्हटले जायचे की ईश्‍वर सत्य आहे; परंतु गांधींनी हा विचारच पालटला. त्यांनी सत्य हेच ईश्‍वर असल्याचा सिद्धांत दिला. जेपींच्या चळवळीशी जोडला गेल्यानंतर मी गांधी विचारानुसार काम करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्वराज्याच्या कामात झोकून दिले. स्वराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीला निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे. गावाचा निर्णय ग्रामसभेत सर्वसहमतीने घ्यावा, असे ठरविणारे पहिले गाव लेखा-मेंढा ठरले. या गावात ग्रामसभेला एका घरातील एक महिला, पुरुष असलेच पाहिजे, असेही ठरविण्यात आले. एखाद्या कुटुंबातील कोणी गैरहजर असेल, तर तो उपस्थित होईस्तोवर ग्रामसभा होतच नाही. या गावातील जमिनीची मालकी कोण्या एका व्यक्‍तीच्या नावावर नाही तर संपूर्ण गावाची आहे. विनोबा भावे यांच्या निधनानंतर ३५ वर्षांनी ग्रामदान करणारे देशातील हे पहिले गाव ठरले. अशा प्रकारची गाव व्यवस्था उभी राहावी, असे मला वाटते.

ग्रामदानात प्रशासकीय अडचणी कोणत्या?

ग्रामदानी गावांच्या गावातील मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवणे व ती यादी त्यांनी गावाला देणे, रेकॉर्ड बदलून जमीन ग्रामसभेच्या नावावर करणे आणि हा दस्त गावाला देणे अपेक्षित असते. ग्रामदानी गाव गटग्रामपंचायतीत असेल तर तिथून ते वगळून ग्रामदानी गावाला स्वतंत्र ग्रामपंचातीचा दर्जा देणे अपेक्षित असते. महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ प्रमाणे ही तीन कामे झाली पाहिजेत. परंतु गेल्या नऊ वर्षांपासून लेखा-मेंढा गावाला या तरतुदीपासून वंचित ठेवले जात आहे. लेखा-मेढा गावाने ग्रामदान केले. त्यानंतर राज्यात अनेक वेळा सत्ताबदल झाला. परंतु पक्ष आणि सरकार बदलल्यानंतरही निर्णय झाला नाही. ग्रामसभेने या विषयावर सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु साधे पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविण्यात आले नाही. त्यामुळेच अखेरीस लेखा-मेंढा गावाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामदान मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्याला सहा आठवड्यांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्यास सांगितले. परंतु राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात वेळकाढूपणा केला जात आहे. एकंदर सरकार लेखा-मेंढा गावातील ग्रामदान मानण्यास तयार नसल्याचे दिसून येते.

किती गावांनी ग्रामदान संकल्पनेवर काम केले?

- राज्यात ग्रामदानी गावाची संख्या १९ होती. लेखा-मेंढाने याबाबत निर्णय घेतल्यानंतर ते विसावे गाव ठरले. यापूर्वीची १९ ग्रामदानी गावे ही विनोबा भावे यांच्या हयातीत झाली आहेत.

लोकशाहीत बहुमताने निर्णय होतात; पण आपण सर्वसहमतीचा आग्रह धरता. त्याबद्दल आपली भूमिका काय?

- बहुमताने निर्णय घेतला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे आपण अनुभवतो आहोत. बहुमत ही संकल्पनाच एक प्रकारे हिंसेवर आधारित आहे. अल्पमताच्या विरोधात (वैचारिक) हिंसा केल्याशिवाय बहुमत सिद्ध होणे शक्‍य नाही. अहिंसक समाजाची घडण व्हायची असेल तर त्यांचा पाया हिंसा कसा असू शकतो? निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांची मते ऐकून घेतली पाहिजेत. एकच व्यक्‍ती विरोधात असली तरी त्याचा विचार ऐकावा. कारण त्याचा विचार चांगला असेल तर गावाचे संभाव्य नुकसान टळेल. त्याची बाजू चुकीची असेल तर त्याला सर्वांनी समजावून सांगितल्यास त्यालाही आपली चूक कळण्यास मदत होईल. त्यामुळे बहुमताऐवजी सर्वसहमती या संकल्पनेला मान्यता मिळण्याची गरज आहे.

सध्या समाजात सर्वत्र अस्वस्थता दिसतेय, त्याबद्दल काय सांगाल?

- व्यक्‍ती म्हणून प्रत्येकाचा सन्मान होण्याची गरज आहे. सध्याची जी परिस्थिती आहे ती व्यक्‍तिस्वातंत्र्याकडे जात आहे. त्याचे दुष्परिणामही समाज भोगत आहो. व्यक्‍तींमध्ये एकटेपणा वाढला असून संवाद हरवला आहे. त्यातून हिंसादेखील वाढल्याची उदाहरणे आहेत. एकटेपणातून त्यांच्यातील हिंसा बाहेर पडते आणि त्यातून मोठे नुकसान होते. समाजात अशा व्यक्‍तीमुळे भीती वाढते. समाजाच्या सुरक्षिततेचे आव्हान त्यामुळे निर्माण झाले आहे. प्रत्येक व्यक्‍तीला समान आदर दिला पाहिजे.

वैयक्तिक मालकी हक्काबाबत आपले मत काय?

- कम्युनिस्ट विचारात वैयक्‍तिक मालकीऐवजी राज्याची मालकी असावी, असा विचार मांडण्यात आला. विषमतेवर आधारित व्यवस्थेत वैयक्‍तिक मालकी हा मोठा दोष ठरतो. त्यामुळे कम्युनिस्टांचा सार्वनिजक मालकीसाठी आग्रह असतो. परंतु ज्या ज्या देशांत कम्युनिस्ट राजवटी आल्या, तिथे देखील या आग्रहातून काहीच साध्य झाले नाही.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यावर कसे नियंत्रण आणता येईल?

- मुळात शेती ही उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेली कृती आहे. निसर्गाने शेती नाही तर जंगल तयार केले. माणसाने नंतर जंगल कापून शेती विकसित केली. अशा निसर्गविरोधी कामाचा दुष्परिणाम भोगावा लागतोच. शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या गरजांची पूर्तता होताना दिसत नाही. शेतीवर उपजीविका करणे अशक्य झाल्यामुळे शेती कसणाऱ्या पट्ट्यात आत्महत्या होतात. कर्जाच्या सापळ्यातही शेतकरी अडकतो. आत्महत्यांमागे हे एक कारण आहेच. जंगल भागातील शेतकऱ्यांच्या गरजा जंगल पूर्ण करते. त्यामुळे या भागात आत्महत्या होत नाहीत. माणसाने सध्या वैयक्‍तिक मालकीची व्यवस्था तयार केली. ती नसेल तर सामूहिक मालकीची संकल्पना राबविली पाहिजे. या व्यवस्थेत काही वाद उद्‍भवले तर ते सोडविण्याची व्यवस्था देखील हेच लोक तयार करतील.

सध्याच्या शासन व्यवस्थेविषयी आपली भूमिका काय?

- व्यवस्थेने प्रत्येकाला मानसिक गुलाम केले आहे. यातूनच त्याला वाटते, की आपण निवडलेले सरकार ही व्यवस्था आपल्या समस्या दूर करेल. त्याच भ्रमात तो राहतो. परंतु अखेरपर्यंत त्याच्या समस्यांचे निवारण होत नाही; म्हणून तो हतबलतेने आत्महत्येचा पर्याय निवडतो. जंगलात पक्ष्यांना आमिष दाखवून त्यांना सापळ्यात अडकवले जाते. पक्षी त्या सापळ्यात अलगद अडकतो. तीच व्यवस्था माणसांसाठी निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याला आवश्‍यक ते आमिष लावलेले असते आणि या सापळ्यात माणूस अडकतो.

-

संपर्क ः मोहन हिराबाई हिरालाल

७७४४०३६५९६

-

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT