Independence Day 2023 : देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१५) जनतेला संबोधित केलं. मोदी यांनी देशातील जनतेची डोकेदुखी ठरत असलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच खत अनुदानावर भाष्य केलं.
शेतकऱ्यांना युरिया स्वस्तात मिळावा, म्हणून देशाचं सरकार युरियावर १० लाख कोटी रुपयांचं अनुदान देत आहे. मुद्रा योजनेनं तरुणांना त्यांच्या व्यवसायासाठी २० लाख कोटी रुपये दिले आहेत. ८ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे, असं मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोनामुळे संकटे निर्माण झाली आहेत. जग महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. आपणही जगभरातून माल आयात करतो, महागाईने आयात करावी लागते हे आपले दुर्दैव. भारताने महागाई नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आम्हाला यशही मिळाले आहे. परंतु जगापेक्षा चांगली परिस्थिती आपली आहे, असा विचार करून आपण बसू शकत नाही. देशाला महागाईपासून मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत."
देशासमोरील आव्हाने आणि संधी यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "स्वप्ने अनेक आहेत. धोरणे स्पष्ट आहेत. नियतीसमोर प्रश्नचिन्ह नाही, पण काही सत्ये स्वीकारावी लागतात. त्यावरच्या उपयांचा शोध घेण्यासाठी मी तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरे करेल तेव्हा जगात विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा." असं आवाहन मोदी यांनी जनतेला केलं.
तसेच पुढील ५ वर्षांत भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, ही मोदींची हमी आहे," असं हमी मोदी यांनी दिली.
ओबीसीसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा
लाल किल्यावरून जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, "ओबीसी समाजासाठी देशात विश्वकर्मा योजना लागू करण्यात येणार आहे. पारंपारिक कौशल्य अवगत असलेल्या ओबीसी समाजातील व्यक्तींना पुढील महिन्यात सरकार १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या वाटप करणार आहे. तसेच विश्वकर्मा योजना सुरू करेल." अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
दरम्यान, पंतप्रधानांनी मणिपूरमधील हिंसाचार, महिला सक्षमीकरण, भ्रष्टाचार, २०२४ च्या निवडणुकांच्या, जनऔषधी केंद्र, महागाई, अमृत सरोवर, वीज पुरवठा, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, देशातील नैसर्गिक आपत्ती, अर्थव्यवस्था आदी विषयांवर संबोधन केलं. तसेच २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांनंतरही जनतेचं प्रेम मोदी सरकारलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.