Watershed Project Management : पाणलोट प्रकल्पांचे मूल्यमापन ही एक शास्त्रशुद्ध पद्धती आहे. पाणलोटामध्ये कार्ये करणाऱ्या प्रणालींची चाचपणी करून त्या प्रक्रियांमध्ये योग्य रीतीने कार्य न करणाऱ्या प्रक्रियांचा वेध घेता येतो. या चाचपणी किंवा सर्व्हेक्षणामध्ये भौतिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरांमध्ये झालेल्या दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही परिणामांचा समावेश असतो. त्याची तुलना प्रकल्प सुरू करताना ठेवलेल्या मूळ उद्देशांशी करता येते. कामकाजामध्ये राहत असलेल्या त्रुटी जाणून भविष्यातील नियोजनात आवश्यक ते बदल करता येतात.
संनियंत्रण या प्रक्रियेमध्ये पाणलोट प्रकल्पांमध्ये प्रति दिवस घडत असलेल्या घडामोडींचे निरीक्षण करून नोंदी ठेवल्या जातात. संनियंत्रणामुळे प्रकल्पाची कालनिहाय प्रगतीसोबत त्यामुळे घडत असलेल्या सामाजिक, आर्थिक परिणामांची तपासणी करता येते. अंमलबजावणी टप्प्यातील राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमांची सातत्याने तपासणी करण्यात येते.
लाभार्थींच्या दृष्टिकोनातून प्रकल्पांची मांडणी करून त्यांच्या वापराच्या बाबीदेखील नियंत्रित केल्या जातात. संनियंत्रण आणि मूल्यमापन या प्रक्रियांमुळे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. योग्य नियोजन आणि नवीन उपचारपद्धती विकसित करता येतात.
संनियंत्रण आणि मूल्यमापनातील महत्त्वाच्या प्रक्रिया
पाणलोटाचा कार्यक्रम आखण्यापासून पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यांवर अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांची पाणलोट व्यवस्थापनाशी सांगड घालत या उपक्रमासाठी आर्थिक तजवीज आवश्यक असते. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करता येते. पाणलोट व्यवस्थापनामध्ये प्रकल्पांतून बाहेर पडल्यानंतरचा संभाव्य कृती आराखडा व त्याचे नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे. मूल्यमापनाच्या प्रक्रियेदरम्यान, मूल्यमापनाची क्षमता असणारी अनेक निर्देशांक उपलब्ध आहेत.
त्यापैकी दर्शके निवडणे महत्त्वाचे ठरते. पाणलोटामध्ये घडलेले वेगवेगळे बदल अभ्यासण्यासाठी योग्य क्षमता असलेल्या निदर्शकांचा निश्चित संच तयार केला पाहिजे. त्या निर्दर्शकांच्या वापराशी निगडित असणारे मूल्यदेखील तपासणे गरजेचे आहे. कारण काही वेळा पाणलोटामुळे झालेले बदल स्पष्टपणे दिसून येत नाहीत.
त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये भौतिक आणि सामाजिक प्रक्रियेचा अभ्यास आवश्यक असतो. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय वातावरणामुळे परिस्थिती बदलून वेगळीच माहिती पुढे येते. त्यातून वेगळेच निष्कर्ष निघण्याची शक्यता निर्माण होते. या निदर्शकाच्या अनुषंगाने सर्वेक्षण महत्त्वाचे ठरते.
प्रथमदर्शनी सर्वेक्षण
भौतिक प्रगतीची दफ्तरी बनविणे आणि साध्य केलेल्या गोष्टी लिहिणे.
प्रकल्प घटकांच्या तुलनात्मक चाचणीसाठी विकास प्रणाली तयार करणे.
प्रकल्प कितपत यशस्वी झाला, या बाबत नियमितपणे चाचपणी व अभ्यास करणे.
साधारणपणे काय मोजले जाते?
भौतिक दर्शके
अ) जमिनीची धूप आणि गाळ वाहून जाणे
जमिनीची धूप होऊन माती वाहून जाणे ही मोठी समस्या आहे. वाहून जाणाऱ्या मातीचे मोजमापातून मृद्संधारणाची कामे कितपत यशस्वी झाले समजू शकते. मात्र ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. पावसाळी हंगामामधील पाण्याच्या अपधावाबरोबर ओढ्यामध्ये अथवा नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. या गाळाच्या प्रमाणानुसार पाणलोटातील जमिनीच्या वरील थराचा ऱ्हास लक्षात येऊ शकतो. तो जितका कमी असेल, तितके उपचारीत कार्यक्रम यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते.
ब) साठवण तलावातील गाळाची समस्या
या निदर्शकाद्वारे साठवण तलाव अथवा तळ्यातील पावसाच्या पाण्याबरोबर येणाऱ्या गाळाचे मोजमाप करता येते. त्यातून निर्माण माहितीतूनच जल व मृदा संधारणाची गरज समजून येते. त्यावरून येत्या पावसाळ्यापर्यंत सुधारित मृद्संधारणाची कामे हाती घेणे महत्त्वाचे ठरते.
जलशास्त्रीय दर्शके
अ) अपधावाची खोली
अपधावाची खोली मोजण्यासाठी योग्य अशी ठिकाणे निश्चित केली जातात. त्या ठिकाणी नियमित घेतलेल्या नोंदीतून अपधावाचे प्रमाण समजून येते. ही पद्धत अतिशय साधी, सोपी आहे. मोठ्या पावसानंतर छोट्या छोट्या ओघळीतून एकदम मोठा प्रवाह तयार होतो. हे सर्व पाणी अडविण्यासाठी पाणलोटांचे कोणते उपचार करायचे, याची निश्चिती होते. पुढे कामे पूर्ण झाल्यानंतर त्याच ओघळी किंवा प्रवाहांचे मोजमाप केले जाते. प्रवाह कमी किती झाला, हा एक महत्त्वाचा निदर्शक ठरू शकतो.
ब) नाल्यातील प्रवाहाचा कालावधी
ओढ्यामध्ये पावसाळ्यानंतरही किती काळ गाळविरहित पाणी वाहते, यावरून पाणलोटाच्या प्रकल्पाचे यश मोजता येते. शाश्वत कालावधीसाठी मोठ्या ओढ्यामध्ये अथवा नाल्यामध्ये प्रवाह दिसून आल्यास पाणलोट प्रकल्प यशस्वी झाला असे मानायला हरकत नाही. याशिवाय जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा दरदेखील तपासता येतो.
पाणी उपलब्धतेचे दर्शक
अ) भूपृष्ठावरील पाणीसाठा
या निदर्शकाच्या आधारे जलसाठ्याची क्षमता असणारे विविध उपचार उदा. तळी, तलाव, शेततळी, माती नाला बांध इ. मधील पाणीसाठवण क्षमता मोजता येते.
ब) भूपृष्ठाखालील पाणीसाठा
जमिनीवरील पाणी वाहून जाण्याचा कमी झालेला दर, मोठ्या प्रमाणात पाणी मुरण्याची क्षमता आणि वाढलेल्या भूपृष्ठाखालील साठा इ. निदर्शक ही यशस्वी पाणलोट व्यवस्थापन सांगतात. पाणीपातळी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सेन्सरद्वारे वाढलेल्या पाणीपातळीचे मोजमाप योग्य त्या ठिकाणी करता येते. एकसारखी व वेगाने पाणी पातळी कमी न होणे, हे पाणलोट विकासाच्या यशाचे द्योतक आहे. या दर्शकामध्ये पाणलोटातील नैसर्गिक आच्छादनाची सद्यःस्थितीही कळते.
भूमी विकास दर्शक
भूमी विकासाच्या वेगवेगळ्या अभियांत्रिकी उपचाराद्वारे जमिनीची सुधारणा अथवा विकास केला जातो. सर्वसाधारणपणे जमीन एक समान पातळीत करणे, नैसर्गिक आच्छादनाद्वारे संरक्षित करणे, इ. द्वारे जमिनीच्या धूपेवर नियंत्रण ठेवले जाते
कृषिविषयक दर्शके
अ) वाढीव उत्पादन
पाणलोट विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर पिकांच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ ही पाणलोट उपचाराचे चांगले द्योतक आहे.
ब) पीक पद्धतीतील फेररचना/फेरबदल
संसाधनांच्या उपलब्धतेमध्ये झालेली वाढ, वाढलेली जल उपलब्धता यामुळे पिकांच्या रचनेमध्ये बदल होतात. पूर्वी पावसावर आधारित एक पीक घेणारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामही घेता येतो. त्यापेक्षाही अधिक पाणी उपलब्ध झालेले असल्यास अनेक शेतकरी कोरडवाहू पिकांकडून नगदी पिकांकडे वळतात. हा पिकांमधील बदल हा एक पाणलोटाचा चांगला निदर्शक आहे.
मातीशी निगडित दर्शके
पाणलोट प्रकल्प राबविल्यानंतर सेंद्रिय कार्बन आणि इतर महत्त्वाच्या पोषणद्रव्यांचे जमिनीत वाढलेल्या प्रमाणांची चाचपणी करणे शक्य होते.
जैवविविधता दर्शके
पाणलोट व्यवस्थापनाशी निगडित उपक्रमांमध्ये जैवविविधतेशी निगडित निदर्शक उदा. वनस्पती अथवा प्राण्यांतील प्रजातीतील विविधता व संख्येमध्ये वाढ मोजली जाते. या आधारे पाणलोटातील परिस्थितीचा अभ्यास करता येतो. अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा स्वरूपातील फलितांमधून पाणलोट विकास प्रकल्पांचे परिणाम दिसून येतात.
यामध्ये सर्वसाधारण जनजागृती, शिक्षण, आर्थिक वृद्धी आणि पायाभूत सोयीसुविधा इत्यादी महत्त्वाचे सामाजिक-आर्थिक बदल हे संपत्तीचा ताबा दरडोई पाणलोटातील वाढलेले उत्पन्न शाश्वत ग्राहकता, घर मालकीचे प्रकार, साक्षरता इ. निदर्शकांचा वापर हा पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पांच्या परिणाम अभ्यासासाठी होतो.
संपत्तीचा वापर आणि देखभालदुरुस्ती
पाणलोट प्रकल्पांचे सातत्याने, शाश्वत आणि अधिकाधिक फायदे मिळण्याच्या दृष्टिकोनातून पाणलोट उपचारांचे उदा. सिमेंट बंधारे, माती नाला बांध इ. देखभाल दुरुस्ती महत्त्वाची ठरते. देखभाल दुरुस्ती या निदर्शकांच्या आधारे ही पद्धती आपणास दिसून येईल. वापर आणि देखभाल दुरुस्ती हा प्रक्रियेचा भाग आहे. यात उपचारांवर व त्यानंतरच्या दुरुस्तीवर खर्ची पडलेला निधीदेखील विचारात घेतला जातो.
ग्राहक शाश्वतता व मालकीत्त्व
या निदर्शकामध्ये सर्वसाधारण आर्थिक चलन प्राप्तीची पातळी आणि राहणीमानाचा दर्जा लक्षात येतो. अशाश्वत संसाधनांचा वापराच्या मर्यादा ओळखणे कठीण असते. त्या तुलनेत वैयक्तिक अर्थार्जन हे प्रति व्यक्ती मोजता येते. दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या विविध सोयीसुविधाही स्पष्ट असतात.
त्यांचे मापन आर्थिक समानतेच्या मूल्यावर केले जाते. या दर्शकाचे मोजमाप सहभागी मूल्यावलोकनाच्या आधारे अथवा घरनिहाय सर्व्हेक्षणातून घेतलेल्या माहितीतून करता येते. पाणलोटामध्ये लोकांसाठी उपलब्ध झालेल्या सोयीसुविधा आणि आर्थिक सधनता ही ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाच्या पद्धतीचा सराव असणाऱ्या कुशल किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासता येते.
या निदर्शकांची अंमलबजावणी ही फारशी खर्चिक नाही. ती कमी कालावधीमध्ये पूर्ण करता येते. माहिती व गटचर्चांच्या माध्यमातून तपासता येते. या माध्यमातून मिळणारी माहिती विश्वासार्ह असते. मात्र या निदर्शकास फार प्रतिसाद मिळेल असे ही नाही. याशिवाय शेती उत्पन्नामधून मिळालेल्या सोयीसुविधांचा पाठपुरावादेखील करणे कठीण असते. या निदर्शकामध्ये संपत्तीमध्ये खालच्या स्तरावर झालेला बदल मोजता येत नाही.
शाश्वतता
या निदर्शकामध्ये पाणलोटाच्या उपक्रमामधील शाश्वतता तपासली जाते. यामध्ये पाणलोटातील संपत्तीची शाश्वतता ही केवळ अंमलबजावणी आणि देखभाल दुरुस्ती यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. शाश्वत फायदे मिळत राहण्यासाठी बाहेरील लोकांकडून, शासनाकडून अथवा अन्य यंत्रणा देखभाल - दुरुस्ती करतील, या आशेवर बसल्यास मिळणारे फायदे दीर्घकाळ टिकत नाहीत.
देखभाल दुरुस्ती बाहेरील निधीची अपेक्षा न करता लाभार्थीनी स्वत: केल्यास प्रकल्पोत्तर फायदे मिळत राहतात. हा दर्शक काही प्रमाणात विश्वासार्ह असून, त्याची विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रकल्पांमधील साधनसंपत्तीची सखोल माहिती घेणे गरजेचे असते. त्यासाठी विशेष अशा उपकरणाची गरज भासत नाही.
निर्देशांकाच्या मूल्यमापनाची वैशिष्ट्ये
यांत्रिकी किंमत ः निर्देर्शाशांकाच्या गुणवैशिष्ट्यांनुसार यांत्रिक किंमत कमी जास्त असू शकतो. उदा. निरीक्षण आणि तोंडी मुलाखतीसाठी यंत्रांची आवश्यकता भासत नाही. मात्र वाहून जाणाऱ्या गाळाचे मोजमाप करण्यासाठी यांत्रिक पद्धतीची गरज भासते.
कुशल मनुष्यबळ ः विविध सर्व्हेक्षण व निर्देशांकासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. यंत्रानुसार तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करणे, मानधन तत्त्वावर नेमावे लागते. उदा. सुशिक्षित शेतकरी पर्जन्ययंत्रावरील पर्जन्याच्या नोंदी घेऊ शकतो. मात्र त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर एखाद्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
वेळेचे नियोजन ः काही निदर्शकांना साध्य करण्यासाठी विशिष्ट यंत्रे अथवा प्रशिक्षणाची गरज भासते. उदा. अकुशल कामगार उपलब्ध साधनांद्वारे विहिरीतील पाणीपातळी मोजू शकतो. मात्र दर आठवड्याला पाणीपातळी मोजावी लागत असल्यास त्याच्या वेळेचे नियोजन व मूल्य ठरवले पाहिजे.
क्षेत्र भेटी ः एखाद्या क्षेत्रातील संसाधन निश्चितीसाठी वारंवार निरीक्षणे करावी लागतात. त्यासाठी क्षेत्रभेटी द्याव्या लागतात. त्यासाठीचा प्रवास खर्च आणि वेळ हा मूल्यमापनात दाखवला पाहिजे.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१,
(संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१,
(प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.