डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Various Indices for Evaluating the Success of Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासाच्या यशस्वितेचे मूल्यमापन करण्याविषयी विविध निर्देशांक आपण पाहत आहोत. त्यात प्राथमिक स्वरूपात जैव-भौतिक घटक उदा. मातीची धूप, नैसर्गिक आच्छादन, भूजल पातळी इ. यांचा विचार केला जातो.
मात्र प्रकल्प राबविलेल्या गावांमधील सामाजिक एकोपा, समानता, उभारलेल्या नैसर्गिक परिसंस्थांचा सामूहिक न्याय्य वापर इ. घटकही महत्त्वाचे ठरतात. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांची संख्यात्मक प्रगती तपासताना त्यातील लोक सहभागाचेही मूल्यमापन केले पाहिजे. कारण पाणलोट क्षेत्र प्रकल्पांची यशस्विता त्या गावातील लोकांच्या सहभागावर अवलंबून राहते. या उद्देशाने लोह सहभागाचा निर्देशांक तयार केला आहे.
पाणलोट प्रकल्पांतील लोकांचा सहभाग आणि लाभार्थी यांचा नेमकेपणाने अभ्यास करता येतो. प्रकल्प राबविणारी संस्था पाणलोट प्रकल्पांचे काम सुरू करताना पाणलोट समितीची रचना करतात. प्रकल्प पूर्ततेनंतर व्यवस्थापनाची जबाबदारी समितीवर सोपवून
प्रकल्पातून बाहेर पडतात. यानंतर निर्माण केलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक गावकऱ्याची (लाभार्थ्याची) असते.
या लेखामध्ये आपण दोन निर्देशांकाची माहिती घेणार आहोत.
१) लोक सहभागीय पाणलोट विकास निर्देशांक (Participatory Watershed Development Index, PWDI)- व या निर्देशांकास उपयोगी ठरणारा
२) लोक सहभागामुळे क्षेत्रामध्ये झालेला विस्मयकारक बदलाचा निर्देशांक यांचा (Participatory Paradigm Development Index, PPDI)- समावेश होतो.
याबाबतच्या निर्देशांकाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. त्यानुसार आपल्याला प्रकल्पाचे बदल लक्षात येतील.
निर्देशांक क्रमांक १
१०
∑ मोजलेली संख्या
i = १
१०
∑ सर्वाधिक मोजलेली संख्या
i = १
यातील i = ith पाणलोट क्षेत्राचा विकास करताना लोक सहभागातील महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे (लोकसहभाग, व्यवहारातील पारदर्शकता, पाणलोट क्षेत्र विकास आराखडा तयार करणे, पाणलोट क्षेत्रामधील लाभार्थ्यांची संस्थात्मक रचना, पाणलोट विषयक बैठका, जमाखर्च तपशील, संनियंत्रण व बहिर्गमन धोरण, सामूहिक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण, पाणलोट विकास समिती आणि समानता)
उपरोक्त नमूद घटकांवर आधारित गुणांकन केल्यानंतर पाणलोट क्षेत्रामध्ये झालेले विस्मयकारक बदल हे खालील सूत्राप्रमाणे अभ्यासता येतात. याबाबतचे सूत्र पुढील प्रमाणे.
निर्देशांक क्रमांक २
लोक सहभागामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला विस्मयकारक बदलाचा निर्देशांक
१०
∑ मोजलेली संख्या
i = १
१०
∑ सर्वाधिक मोजलेली संख्या
i = १
उपरोक्त नमूद लोक सहभागीय पाणलोट क्षेत्र विकास निर्देशांक व प्रकल्प पश्चात पाणलोट क्षेत्रातील विस्मयकारक बदलांचा निर्देशांक या दोन्ही निर्देशांकाची किंमत ० ते १०० या दरम्यान कितीही येऊ शकते. जेवढी जास्त किंमत, तेवढा जास्त लोक सहभाग. त्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन असा अर्थ निघतो.
उपरोक्त नमूद निर्देशांक समजून घेण्याबाबत आपण आदर्श गाव हिवरे बाजार या गावाची यशोगाथा सूत्रातील नमूद निकषांच्या आधारे तपासून पाहण्यापूर्वी गावाची एकूण पार्श्वभूमी माहीत असणे गरजेचे ठरते.
हिवरेबाजार गावाची पूर्वस्थिती
हिवरेबाजार (ता. जि. नगर) हे गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते. येथील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३५० ते ४०० मिलिमीटर इतकी आहे. १९८९ मध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यास सुरुवात करताना गावामध्ये डोंगर माथ्यावरती ७० हेक्टर क्षेत्रावर वनांची लागवड करण्यात आली. यासाठी येथील पोपटराव पवार यांचे नेतृत्व व त्यांना ग्रामस्थांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. पाणलोटाच्या कामांना ग्रामस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ग्रामस्थांसह सर्वप्रथम राळेगणसिद्धी या आदर्श गावाचा अभ्यास दौरा केला.
त्यानंतर ग्रामसभेमध्ये गावातील भौगोलिक व सामाजिक समस्यांबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पाणलोट कार्यक्रमाची आवश्यकता आणि लोकसहभागाची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली. गावामध्ये सातत्याने पडणारे दुष्काळ, पारंपरिक शेती, जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप व त्यामुळे घसरलेली शेती उत्पादकता, चाऱ्याच्या अभाव, अत्यल्प पशुधन या साऱ्या समस्या होत्या.
यातून निर्माण होणारी बेरोजगारी, स्थलांतर, वाढती गुन्हेगारी यामुळे गावकऱ्यांची मानसिकताही नकारात्मक झालेली होती. १९८९ पासून हिवरेबाजार ग्रामस्थांच्या मदतीने पोपटराव पवार यांनी नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासातून गावाचा शाश्वत विकास साधला. १९८९ ते २००९ असे सलग वीस वर्ष सरपंचपदही लाभल्यामुळे कामांमध्ये सातत्यता राहिली.
भौगोलिक पार्श्वभूमी
गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९७७ हेक्टर असून त्यापैकी ७९५.२३ हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. सद्यःस्थितीत योग्य पर्जन्य लाभल्यास गावात उन्हाळ्यातही पीक घेतले जाते. गावामध्ये ७० हेक्टर क्षेत्रावरती वनक्षेत्र आहे, तर गायरान सात हेक्टर क्षेत्रावर आहे.
गावठाण पाच हेक्टर क्षेत्रामध्ये पसरले आहे. गावातील विहिरींची संख्या ४१२ इतकी आहे. भूजलाचे संवर्धन करण्यासाठी गावांमध्ये बोअरवेल खोदण्यावर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्राचा सरासरी उतारा ३ ते २५ टक्के यादरम्यान आहे. पाणलोट प्रकल्प यशस्वी होण्यासाठी गावाने ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊन खालील सप्तसूत्रीचा अवलंब केला आहे.
उघड्यावर शौचास बंदी (निर्मलग्राम, एकूण ४१० शौचालये)
श्रमदान (कोणत्याही कामात शंभर टक्के लोकांचा सहभाग)
चराईबंदी (यामुळे ५००० ते ६००० मेट्रिक टन चारा उपलब्ध होतो.)
कुऱ्हाड बंदी (वृक्ष तोडीवर बंदी, ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही जातीचे झाड तोडले जात नाही.)
दारूबंदी
कुटुंबनियोजन
बोअरवेल खोदण्यावर पूर्ण बंदी
संस्थात्मक रचना
पाणलोट क्षेत्र विकासासाठी ग्रामपंचायतीने यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्था या संस्थेची निर्मिती केली. गावामध्ये सद्यःस्थितीत ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, मुंबादेवी दूध उत्पादक संस्था, महिला बचत गट, ग्रामविकास तरुण मंडळ, भजनी मंडळ, ग्रामवन समिती, वीज वितरण समिती, ग्रामस्वच्छता समिती (या समितीच्या आधिपत्याखाली स्वच्छता समिती, शौचालय समिती, नळ पाणीपुरवठा समिती ही महिलांद्वारे चालविली जाते, घनकचरा समिती, बायोगॅस समिती, ग्राम शिक्षण समिती इत्यादी उपसमित्या कार्यरत आहेत.),
तंटामुक्त समिती व पाण्याच्या ताळेबंदासाठी हिवरेबाजार शाळेतील इयत्ता आठवी, नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांद्वारे पाणीपातळी दर महिन्याच्या १ आणि १६ या तारखांना मोजली जाते. गावातील या संस्थात्मक रचनेमुळे प्रत्येक नागरिक हा ग्रामपंचायतीची जोडला गेला आहे. या संस्थात्मक रचनेमुळे प्रत्येक नागरिक हा जबाबदार आहे. पुढील भागामध्ये या दोन निर्देशांकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत.
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)
डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.