Pune News : ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता. मात्र आता या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.४) सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तोडगा काढला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. मुळ वेतनातील वाढ एप्रिल २०२० पासून करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यासह पगारात वाढ करण्यात यावी अशा मागण्या एसटी कर्माचाऱ्यांनी संपावर जाताना सरकारकडे केल्या होत्या. तर मुळ वेतनात किमान ५ हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. याच मागण्यांसह संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकूण घेत सविस्तर चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेताना मधला मार्ग काढला. तर ही वाढ एप्रिल २०२० पासून लागू असेल. याचबरोबर आगारांमध्ये वाहक-चालकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या जातील असेही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी कर्मचारी संघटनांना दिले आहे. तसेच राज्यातील २ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कारणांमुळे झालेली निलंबनाची कारवाई देखील मागे घेतली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहे.
अशी असेल मूळ वेतनात वाढ
ज्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात नोव्हेंबर २०२१ मध्ये ज्यांना ५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ होईल. ज्यांच्या पगारात ४ हजारांची वाढ झाली होती. त्यांना अडीच हजारांची वाढ होईल. तर ज्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली होती त्यांच्या पगारात आता 4 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
एस.टी. डेपोत सोयीसुविधांसाठी १९३ कोटी : सामंत
दरम्यान, एस.टी. कर्मचार्यांना विशेषतः महिला कर्मचार्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार कार्य करत असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच एस.टी. डेपोत एस.टी. कर्मचार्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९३ कोटी निधी मंजूर करण्याचे आदेश दिल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. तर हा निधी एमआयडीसीच्या निधीतून मंजूर करण्याचे आदेश दिल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
एसटीचे २२ कोटींचे नुकसान
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बुधवारी राज्यभरातील जवळपास ९६ आगार बंद होते. संपामुळे एसटीच्या ४०,०६९ पैकी २७,४७० फेऱ्या रद्द झाल्या. एसटीचा बुधवारी २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर मंगळवारी १६ ते १५ कोटींचे नुकसान एसटीला सोसावे लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.