Climate Change  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : वातावरण बदलाच्या लढ्यात ‘देवभूमी’ बनतेय ‘वीरभूमी’

वातावरण बदलाच्या लढ्यात ‘‘तू लढ आम्ही पाठीमागे आहोत’’ असे म्हणून शेतकऱ्यांना पुढे ढकलतानाच मागच्या मागे पळ काढणारे अनेक आहेत, तसेच ‘‘आपण दोघे हात हातात घेऊन एकत्र लढूया’’ असे म्हणणारेही आहेत. वातावरण बदलाच्या संदर्भात ‘देवभूमी’ आणि ‘वीरभूमी’ या आपल्या दोन्ही नावांना जागणारे म्हणून हिमाचल प्रदेश महत्त्वाचे आहे. हिमाचलमध्ये असे एकमेकांमध्ये गुंफलेले हात आपणास अधिक पहावयास मिळतात. हे आशादायी चित्र आहे.

डॉ. नागेश टेकाळे

उत्तुंग पश्‍चिम हिमालयाच्या (Himalaya) छायेमध्ये येणारे एक सुंदर छोटे राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. त्याच्या नावामध्येच हिमालयाचा आशीर्वाद आहे. वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये (Climate Changing Condition) अन्य हिमालयीन राज्यांचे हाल सुरू असताना हिमाचल प्रदेशामध्ये काही किरकोळ घटना वगळता सध्यातरी सुरक्षित वाटतो. त्यास मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक (Natural Tree) आणि मानव निर्मित वृक्ष संख्या. कांग्रा, मंडी आणि सिमला अशा तीन मुख्य विभागांमध्ये १२ जिल्हे आहेत. या राज्याच्या सीमा जम्मू- काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाना, उत्तराखंड या पाच राज्यांशी जोडलेल्या आहेत. एका लहानशा चिंचोळ्या पट्टीमधून उत्तर प्रदेशही जोडले जाते. या राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा चिनी सत्तेखालील तिबेटला खेटून आहे. स्थलांतराचा विचार केला असता हिमाचल प्रदेशमधून वातावरण बदलाच्या भीतीखाली अन्य राज्यात स्थलांतराची अजून तरी मोठी घटना आढळत नाही.

मानव विकास निर्देशांकात आघाडीवर

हिमाचल प्रदेशला देवभूमी तसेच वीरभूमी असेही म्हणतात. पर्वत रांगांनी व्यापलेल्या या राज्यातील समृद्ध दऱ्या व त्यामधून खळाळणाऱ्या विलोभनीय नद्यांमुळे वर्षभर पर्यटकांचा ओघ असतो. जेमतेम ७३ लाखांपर्यंत लोकसंख्या. त्यातही ९० टक्के लोक ग्रामीण भागात राहणारे त्यातील बहुसंख्य शेती व्यवसायाशी निगडित आहेत. पारंपरिक शेतीसोबतच फळबाग, जल ऊर्जानिर्मिती आणि पर्यटन अशा मुख्य आर्थिक स्रोतांमुळे राज्यामधील जनतेचे दरडोई उत्पन्न २ लाख रुपयापर्यंत पोहोचते. हिमाचल प्रदेशचा मानव विकास निर्देशांक ०.७२ एवढा आहे.

मानवी विकास निर्देशांक हा यूएनडीपी (UNDP) तर्फे दोन वर्षांमधून एकदा काढला जातो. त्यासाठी त्या प्रदेशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान शिक्षण व दरडोई उत्पन्न यांचा विचार होतो. तो नेहमी ० ते १ च्या दरम्यान असतो. शून्य म्हणजे विकास झालेला नाही, तर १ म्हणजे पूर्ण मानवी विकास होय. त्याचा उपयोग देशांचे विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा वर्गीकरणासाठी होतो. त्या मानकावर देशातील केरळ हे राज्य ०.७७ निर्देशांकासह पुढे आहे. म्हणजेच हिमाचल प्रदेशातील लोकांचे आरोग्य, राहणीमानाचा दर्जा आणि शिक्षणाच्या संधी उत्तम आहे. असे असले तरी भविष्यातील वातावरण बदलाच्या प्रभावाचे परिणाम लक्षात घेऊन आतापासूनच काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात.

फळांची टोकरी...

हिमाचलमध्ये हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. तोच शुभ्र बर्फ इंदू, गंगा, चिनाब, रावी, सतलज, बियास, यमुना या नद्यांना बारमाही पाणीपुरवठा करत असतो. हिमाचलमधील पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तिन्ही ऋतू समृद्ध आहेत. येथील उन्हाळी तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअसच्या वर सहसा जात नाही. शाश्‍वत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणामध्ये नेहमीच केरळ आणि सिक्कीम राज्यांच्या स्पर्धेत असते. उघड्यावर शौचास पूर्ण बंदी असलेले सिक्कीम हे पहिले, तर हिमाचल हे दुसरे राज्य आहे.

हिमाचल राज्यात चूल पेटविण्यासही बंदी आहे म्हणून यास देशातील पहिले धूर विरहित राज्य असेही संबोधले जाते. राज्यात फळबागेखालील क्षेत्रही लक्षणीय असून, त्यातील तब्बल १ लाख २० हजार हेक्टरवर (म्हणजेच ४९ टक्के) सफरचंद बागा आहेत. सफरचंदाचे हेक्टरी ८ ते १० टन उत्पादन, एकूण ७.५ लख टन इतके उत्पादन घेतले जाते. वातावरण बदलाचा अजून तरी मोठा प्रभाव यावर दिसत नाही. हिमाचलमधील सफरचंद भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. फळवाल्याकडे एक वेळ तुम्हाला स्थानिक फळ मिळणार नाही, पण हिमाचलचे सफरचंद हमखास मिळणार. या फळाचे सर्वाधिक उत्पादन सिमला, कुलू आणि मंडी भागांत मिळते. सफरचंदासह या राज्यात ॲप्रिकॉट, चेरी, पिअर, प्लम, स्ट्रॉबेरीज यांचेही उत्पादन घेतले जाते. त्यामुळे हिमाचलला आपल्या देशाची ‘फळाची टोकरी’ असेही म्हणतात.

प्रदूषणरहित हरित पट्टे...

हिमाचल प्रदेशचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील यशस्वी ‘नरेगा’ योजना आणि त्यात स्त्रियांचा सर्वांत जास्त सहभाग. वातावरण बदलास सामोरे जावयाचे असेल, तर जमिनीचा प्रत्येक भाग हिरवा असणे गरजेचे आहे. हिमाचलमध्ये नेमका यावरच भर दिला आहे. शासनाच्या मदतीने मोकळ्या जागांवर मुद्दाम गवत लावून शेकडो चराऊ कुरणे विकसित केली आहेत. परिणामी, दुभती जनावरे भरपूर असूनही पशुपालनातून होणारे मिथेन उत्सर्जन जवळपास शून्य आहे. गवताच्या हरित पट्ट्याबरोबरच झेंडू, शेवंती, लिली, गुलाब, ट्यूलिप, कार्नेशन अशी फुले मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. अनेक शेतकऱ्यांनी मुख्य शेतीसोबतच फुलशेतीचीही घडी बसवली आहे. अन्नधान्य पिकामध्ये मका, गहू, भात आणि गहू, मका, बटाटा अशी पद्धती रुजली आहे. धान्य पिकाबरोबर डाळवर्गीय पिके, तेल बिया घेतल्या जातात. जिथे नदीचे पाणी उपलब्ध आहे, तिथे भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

कांग्रा खोऱ्यामध्ये शेकडो वर्षे जुनी कुहल (Kuhl) ही सिंचन प्रणाली आजही पहावयास मिळते. ही लोकसहभागातून निर्माण झालेली पाणीवाटप पद्धती असून, गावामधील प्रत्येक शेतकऱ्यास समान वाटा मिळतो. एखाद्यास पाणी नको असेल, तर तो त्याच्या वाट्याचे पाणी इतरांना देऊ शकतो. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेली ही जगामधील एकमेव पाणीवाटप पद्धती आहे. सध्या जलविद्युत निर्मितीमुळे या पद्धतीवर थोडा परिणाम जाणवत आहे, हे निश्‍चित. या ऐतिहासिक पाणी वाटपाबरोबरच कांग्रा व्हॅली ही चहासाठीसुद्धा जगप्रसिद्ध आहे. हजारो पर्यटक येथील चहाच्या मळ्यात उत्कृष्ट चहाच्या आस्वादासाठी येतात. या दोनशे वर्षे जुन्या चहा मळ्यांना अजून तरी वातावरण बदलाचा फारसा धक्का बसलेला नाही.

शासनाच्या तत्पर भूमिकेमुळे निश्‍चिंतता

हे सारे वातावरण हिमाचल प्रदेशाच्या देवभूमी या वर्णनाला साजेसे वाटेल. मात्र वातावरण बदलाचा प्रभाव वेगवेगळ्या माध्यमांतून जाणवू लागला आहे. वातावरण बदलामुळे वाढणारा हिमवर्षाव, कोसळणाऱ्या दरडी आणि शहराकडे वाढू लागलेले स्थलांतर यातून दिसू लागला आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी शासनाने या वीरभूमीतील युवकांनाच योद्ध्याच्या भूमिकेत आणले आहे. कोणताही शेतकरी उद्ध्वस्त होऊन शेती सोडणार नाही, याकडे शासनाचे लक्ष असते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सफरचंदाच्या बागांमध्ये फळांचा जमिनीवर खच पडतो. ही खाली पडलेली शेकडो टन सफरचंदेही शासन काही तासांतच अधिक भाव देत प्रक्रियेसाठी खरेदी करते. गाडी प्रक्रिया केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्याचे पैसेही शेतकऱ्याच्या खाती जमा होतात. त्यामुळे शेतकरी निश्‍चिंत होतात. फळबागेच्या संरक्षणाचीही जबाबदारी सरकार घेते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT