Parbhani Shakti Jowar
Parbhani Shakti Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Shakti Jowar: ही ज्वारी आरोग्यासाठी उपयुक्त का आहे?

Team Agrowon

गेल्या काही वर्षांत लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आहारातून शरीराला आवश्यक पोषणद्रव्य मिळत नसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे लोकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून ज्वारीसारख्या धान्यपिकांमधील पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. अशा वाणांना बायोफॉर्टीफाईड (Biofortified) म्हणजे जैवसंपृक्त वाण म्हटले जाते. बाहेरून गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय ठरतात.

ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. शेतकरी कुटुंबांच्या रोजच्या आहारात ज्वारी असतेच. गरीब लोकांचं अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. शहरी आणि उच्चभ्रू लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढलीय. आरोग्यासाठी ज्वारीचं महत्त्व पटल्यामुळे अनेकांचा ज्वारीकडे ओढा वाढला आहे. शिल्पा शेट्टी सारखी अभिनेत्री ज्वारीचं प्रमोशन करू लागली आहे.

या ज्वारीचं पोषणमूल्य, पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ज्वारीचे नवीन जैवसंपृक्त वाण विकसित केले आहे. परभणी शक्ती (PVK 1009) असे या वाणाचे नाव आहे. या वाणामध्ये ज्वारीच्या इतर जातींपेक्षा जस्त, लोह आणि इतर जीवनसत्त्व, सूक्ष्म पोषणघटकांचे प्रमाण अधिक आहे.

ज्वारीच्या परभणी शक्ती (PVK 1009) या वाणास भारतीय कृषी संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती हे ज्वारीचे देशातील पहिले जैवसंपृक्त वाण आहे. या वाणाची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करता येते. हे वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.


परभणी शक्ती वाणाची वैशिष्ट्ये
- परभणी शक्ती वाणाच्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये प्रति किलो ४२ मि. ग्रॅम लोह असून २५ मि. ग्रॅम जस्ताचे प्रमाण आहे.
- हे वाण संकरित वाणासारखेच दिसते. उंची एकसारखी म्हणजे १७० ते १८० सेंमी असून एकाच वेळी पक्व होते.
- पीक ११० ते ११५ दिवसात परिपक्व होते.
- या वाणाचा कडबा अधिक पौष्टिक आहे. त्यामुळे जनावरांना चांगल्या प्रतीचा कडबा सहज उपलब्ध होतो.
- उंची कमी असल्यामुळे काढणी सहजपणे करता येते.
- काळी काजळी (ग्रेन मोल्ड) रोगास हे वाण सहनशील आहे.
- खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करता येते.
- दाणे पांढरेशुभ्र असून भाकरी चवीला गोड, चविष्ट आणि टिकाऊ बनते.

नवे वाण का विकसित करावे लागले ?


- पीव्हीके ८०९, पीव्हीके ८०१ आणि पीव्हीके ४०० या तुल्यबळ वाणांसोबत (चेक) परभणी शक्ती वाणाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या वाणांपेक्षा परभणी शक्ती (पीव्हीके १००९) हे वाण सरस आढळून आले आहे.
- महाराष्ट्रातील गरीब लोक विशेषतः शेतकरी वर्गातील लोकांच्या आहारातील ज्वारी हे मह्त्वाचे अन्नधान्य आहे. या पिकाचे पोषणमूल्य वाढवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

- ज्वारीचे इतर जातीचे वाण हे खूप उंच वाढतात त्यामुळे पिकाची कापणी करताना खूप अडचणी येतात. काढणीच्या वेळेस वादळी वारे किंवा पावसामुळे उभे पीक जास्त उंचीमुळे सहज आडवे होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. हे वाण विकसित करताना पिकाची उंची कमी ठेवता येईल का, या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. परभणी शक्ती हे वाण उंचीला कमी असल्यामुळे काढणी करणे सोपे झाले. इतर वाणाची काढणी ताटे कापणी आणि कणसे वेगळे करणे अशा दोन टप्प्यात करावी लागते. परंतु परभणी शक्ती हे वाण कमी उंचीचे असल्यामुळे कंबाईन हार्व्हेस्टरने एकदाच ज्वारीची काढणी करता येते. त्यामुळे मजुरीचा खर्चात बचत होते.


- हे वाण वर्षाच्या तीनही हंगामात घेता येऊ शकते. कडब्याचे उत्पादन परभणी सुपर मोती या वाणांपेक्षा कमी असले तरी कडबा अधिक पौष्टिक असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

- वाढीच्या शेवटच्या टप्प्यात ज्वारीच्या इतर जातीच्या कणसांमध्ये दमट हवामानामुळे काळी काजळी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परभणी शक्ती हे वाण काळी काजळी या रोगास सहनशील आहे.

संशोधनातील आव्हाने
कोणतेही वाण विकसीत केल्यानंतर त्या वाणाची गुणवत्ता तपासणी केली जाते. महाराष्ट्रात गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या वाणाची गुणवत्ता चाचणी हैदराबाद येथील इक्रिसॅट (ICRISAT) संस्थेत करण्यात आली. त्यात खूप वेळ गेल्यामुळे संशोधनात अडथळा आला. त्यामुळे अशा सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT