Dharashiv News : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पन्नास लाख वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व ६२२ ग्रामपंचायती व दहा नगरपालिका क्षेत्रात गुरुवारी (ता. १९) या एकाच दिवशी लोकसहभागातून पंधरा लाखांहून अधिक वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
यातूनच उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विविध समित्या व पथकांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, त्यांनी रोपण कालावधीत नेमून दिलेली कामे विहित वेळेत पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
तालुकास्तरीय (शहरी भाग वगळून) सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी, परंडा यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे काम पाहणार आहेत. तर नगरपालिका व नगरपंचायतस्तरीय नोडल अधिकारी म्हणून संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्यधिकारी काम पाहणार आहेत.
वृक्षारोपणासाठी वन विभाग मार्गदर्शन करणार असून वृक्षारोपणासाठी साहित्याचा पुरवठा करणाऱ्या पथकातही वन विभागाचे अधिकारी आहेत. वृक्षलागवडीची ठिकाणे निश्चित करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची मदत घेऊन माहिती Epicollect- ५ या सर्व्हेक्षण ॲपमध्ये माहिती भरण्यात येणार आहे. वृक्षलागवडीनंतर झाडांना पाणी देण्यासाठी सिंचन व्यवस्थापन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यात शाळा तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
विद्यार्थ्यांचे साप्ताहिक गट तयार करून त्यांच्यावर रोपांना पाणी देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर दहा विद्यार्थी व दोन शिक्षक याप्रमाणे चार आठवड्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून त्यांच्यावर पाणी देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीसाठी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यासाठीही पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे पुजार यांनी सांगितले. उपक्रमासाठी प्रभात फेऱ्यांचे आयोजन करणे, विविध स्पर्धा आयोजित करणे, रोपवन स्थळांच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची व्यवस्था करणे, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून वृक्षलागवड मोहिमेची प्रसिद्धी करणे स्वयंसेवकांना टी-शर्ट व कॅप उपलब्ध करून देणे आदी कामांसाठीही पथके तैनात करण्यात आली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.