Satara Rain : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोमवारी (ता. १९) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दुष्काळी माण, फलटण, खटाव, खंडाळा तालुक्यांतील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. माण तालुक्यातील भुईवर करण्यात आलेल्या कांदाचाळीत पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पावसामुळे टंचाई कमी होण्यास मदत होऊन मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
सातारा शहर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. काशीळ, अतित, कोपर्डे, नागठाणे, बोरगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसाने माण तालुक्याला झोडपून काढले. भुई ऐरणीतील कांदा या पावसाने बुडवला. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली.
दुपारी दहिवडी, बिदाल, कुळकजाई, मलवडी, महिमानगडसह बहुतांश माणमध्ये पावसाने हजेरी लावली. तासभरापेक्षा जास्त काळ हा पाऊस कोसळत होता. अनेकांनी पुढे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने आपापल्या शेतात उन्हाळी कांदा ऐरणीत, भुई ऐरणीत साठवलेला आहे. मलवडी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा हा साठवलेला कांदा पाण्यात बुडाला.
ताल, बांध फोडून शेतातील पाणी बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला, तसेच शेतात पाणी साठल्याने सुद्धा अनेक ताली फुटल्या. खटाव तालुक्यातील पुसेगावसह तालुक्याच्या उत्तर भागाला दुपारनंतर जोरदार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. जोरदार मॉन्सूनपूर्व पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे.
दुपारी चारनंतर तालुक्याच्या उत्तर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. खटाव, पुसेगाव भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. निढळ, बुध, ललगुण, मोळ, डिस्कळ परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. ओढे, नाल्यांना पाणी वाहिले. अनेक ठिकाणी शेतांच्या ताली फुटून नुकसान झाले. मायणी परिसरातील कलेढोण, विखळे, गारळेवाडी, पाचवड, मुळीकवाडी, चितळी, मराठानगरला पहाटे पाचपासून पावसाने जोरदार बंटिंग केली.
पहाटेपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सखल भागात पाणी साचले. नाल्यांतून पाणी वाहिले, तर शेतांचे बांध पाण्याने भरले. दुपारी दोनच्या दरम्यान पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले. फलटण तालुक्यात वारुगड, सीतामाई डोंगर, ताथवडा आणि उपळवे परिसरात सोमवारी सायंकाळी पावसास सुरुवात झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.