Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : सामुदायिक प्रयत्नांतून हाडोळी झाले स्मार्ट ग्राम

Smart Village Hadoli : नांदेड जिल्ह्यातील हाडोळी गावाने सामुदायिक प्रयत्नांमधून ‘स्मार्ट ग्राम’ होण्याचा किताब मिळवला आहे. ग्रामस्वच्छतेचे विविध उपक्रम, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य सोयीसुविधांसह गावाने विकास व प्रगती साधली आहे.

Team Agrowon

कृष्णा जोमेगावकर

Hadoli Village : नांदेड जिल्ह्यातील हाडोळी गावाने सामुदायिक प्रयत्नांमधून ‘स्मार्ट ग्राम’ होण्याचा किताब मिळवला आहे. ग्रामस्वच्छतेचे विविध उपक्रम, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य सोयीसुविधांसह गावाने विकास व प्रगती साधली आहे.

नांदेड शहरापासून ७० किलोमीटरवर डोंगराळ भागात वसलेलं हाडोळी (ता. भोकर) हे छोटसं गाव राज्याच्या नकाशावर आले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १३६७ आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या हाडोळीचे ग्रामस्थ त्यात प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ग्रामविकासाबाबतही ते अधिक जागरूक आहेत. सन १९९९ पासून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा वसा गावाने घेतला. त्याकाळी हागणदारीमुक्त झाल्याबद्दल पन्नास हजारांचे बक्षीस गावाला प्राप्त झाले.

ग्रामस्वच्छतेवर भर

राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी भाग घेतला. घनकचरा व्यवस्थापनासह शंभर टक्के शौचालये बांधून त्यांचा वापर होऊ लागला. आज गावात दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालये
आहेत. त्यासाठी भरपूर पाण्याची सोय आहे. महिलांसाठीही स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आहे.
सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा झाली. त्यातून २००६ मध्ये जिल्ह्यातील पहिला निर्मलग्राम पुरस्कार पटकाविला. तत्कालीन राष्ट्रपती कै. एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे तत्कालीन सरपंच लक्ष्मण तोटावाड, उपसरपंच दिगंबर लालोंडे यांनी तो स्वीकारला.

जलसंधारणाची कामे

सन २०१५ मध्ये सरपंच मेघाजी गायकवाड व उपसरपंच रामराव कोलुरे यांनी गावाचा कारभार हाती घेतला. या वेळी गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या कामात सहभाग नोंदवला. शिवारफेरीच्या माध्यमातून शिवारात करण्यात येणाऱ्या उपचारांची निश्‍चिती केली. संपूर्ण श्रमदानाच्या माध्यमातून सलग समतल चर (सीसीटी), नाला खोली व सरळीकरण, खोल चर (डीप सीसीटी) आदी कामे झाली. मातीनाला व सिमेंट नाला बांध यांची दुरुस्ती झाली. ‘वॉटर कप’ स्पर्धेत चार हजार दोनशे घनमीटर मातीकाम होणे निर्धारित होते. परंतु प्रत्यक्षात हे काम चार हजार आठशे घनमीटरपर्यंत झाले. भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली. दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची समस्या कमी झाली. सन २०१८ मध्ये वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरीय पहिला पुरस्कार गावाला मिळाला.

‘वॉटर बजेट’ची संकल्पना

गावाच्या पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) फलक स्वरूपात मांडण्यात आला आहे. यात पडलेला पाऊस, अडवलेले पाणी, त्याचे विभाजन, भूजल पातळीत झालेली वाढही दिसून येते. या उपक्रमामुळे पाण्याच्या वापराविषयची जागृती वाढण्यास व जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण होण्यास मदत झाली आहे.

‘स्मार्ट’ गावाचा संकल्प

स्वच्छता व जलसंधारणाचे महत्त्व पटलेल्या ग्रामस्थांनी आपले गाव
अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा चंग

बांधला. सन २०२१ मध्ये सरपंच झालेल्या अनिता माधवराव अमृतवाड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यास उपसरपंच अनसूयाबाई रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा किनेवाड,
विजयालक्ष्मी कृष्णुरे, संगीता भालेराव, अशोक दुधारे, ग्रामसेविका ए. एस. लिंगापूरे, माजी उपसरपंच माधवराव अमृतवाड यांनी साथ दिली. जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून
१९ नोव्हेंबर २०२१ पासून शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्मार्ट ग्राम अभियानात गावाने भाग घेतला. दर रविवारी सकाळी ग्रामस्थ श्रमदान करतात. यात प्लॅस्टिक कचरा संकलित करून
पुढील व्यवस्थापन होते. जिल्ह्यात ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळविणारी ग्रामपंचायत म्हणून हाडोळीची ओळख झाली आहे. यासाठी निर्धारित केलेल्या ३२ विषयांची पूर्तता करण्यात आली आहे.
विविध कामांसाठी सुमारे शंभर युवकांची फळी तयार करण्यात आली आहे. त्यांचे प्रत्येकी दहा गट करून त्यातील एकाला गटप्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाते. त्यामुळे सोपविलेले काम वेळेत व कार्यक्षमतेने पूर्ण होण्यास मदत होते. गावाला जिल्हाधिकारी कार्यालय, त्या अंतर्गत विभाग, कृषी विभाग आदींचे मोलाचे सहकार्य होते.


गावातील उपक्रम (इन्फो १)

-खुल्या व्यायामशाळेची सुविधा
-ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व परिसरात २२ सीसीटीव्ही कॅमेरे.
-गावातील प्रत्येक घरावर मुलींच्या नावाची पाटी.
-एकीचे प्रतीक म्हणून संपूर्ण गावाला समान रंग.
-सुमारे पंधराशे वृक्षांची लागवड. त्यात नारळ, आंबा, लिंबू, बदाम, चिंच, नारळ,
जांभूळ, संत्रा, रामफळ आदींचा समावेश.
-ज्येष्ठ नागरिकांसाठी विसावा उद्यान.
-जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल
-बंदिस्त नाली बांधकाम.
-नियमित कर भरणाऱ्यांना मोफत दळण सुविधा.
-ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी ‘डस्ट बिन्स’.
-पाण्याची बचत करण्यासाठी मीटरद्वारे पुरवठा.
-पावसाचे पाणी साठविण्याचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) काम.
-स्मशानभूमी सुशोभीकरण. गावातील मुख्य रस्त्यांवर सुंदर कमानी
-महिला व पुरुषांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन व्यसनमुक्ती, कुऱ्हाड व प्लॅस्टिक बंदी उपक्रम.
-गावातील पाणी गावातच पुरविण्यासाठी १३८ ठिकाणी शोषखड्डे. ज्या ठिकाणी नाली बांधकाम शक्य नाही अशा ठिकाणीच हा वापर.
-गावातील काडी-कचरा, पाला-पाचोळा प्लॅस्टिक बॅगेत संकलित करून त्यापासून गांडूळ खत निर्मिती.
त्याचा वापर गावातील फळझाडे, फुलबागेसाठी होतो. काही जणांकडून वैयक्तिक स्तरावर खताचे उत्पादन.

मिळालेले अन्य ठळक सन्मान

-जिल्हा परिषद विभागांतर्गत स्वच्छता अभियान
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मराठवाडा विभागात पहिला पुरस्कार जाहीर.
- स्मार्ट व्हिलेज अंतर्गत जिल्ह्यात प्रथम पारितोषिक.

संपर्क ः माधवराव अमृतवाड, ८३०८०७९९७९
(माजी उपसरपंच)
------------------------


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Millets : नवधान्यांची समृद्धी

Digital Agriculture : डिजिटल युगातील प्रगतीचा शेतकऱ्यांना फायदा

Cyclone Dana : ओडिशात 'डाना'ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; १.७५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

SCROLL FOR NEXT