Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी सरकारकडे नाहीत पैसे

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची रक्कम तिप्पट केली असली, तरी ही रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे सध्या पैसाच नाही. राज्याची आर्थिक स्थिती पाहता सध्या कृषी विभागाने दोन वर्षांच्या पुरस्कार वाटपासाठी केलेल्या सात कोटींची मागणी मान्य करता येणार नसल्याचा शेरा नियोजन विभागाने फाइलवर मारला आहे.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे २०९ पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात.

गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले, मात्र त्यांचे वाटप करण्यात आलेले नाहीत. याआधी कृषिरत्न पुरस्कारासाठी ७५ हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी ५० हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी ३० हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते. यंदापासून या पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ करण्यात आली आहे.

नाशिक येथे २०२१ मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही रक्कम वाढविण्याची घोषणा केली होती. आता या पुरस्कार वितरणाची गेली दोन वर्षे शेतकरी वाट पाहत आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी हा पुरस्कार सोहळा करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. दोन वर्षांचे पुरस्कार देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली सात कोटी रुपयांची रक्कम मिळावी, अशी मागणी वित्त व नियोजन विभागाकडे केली होती. मात्र राज्याची सध्या आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने ही मागणी मान्य करता येणार नाही असा धक्कादायक शेरा नियोजन विभागाने मारला असून, ती फाइल वित्त विभागाकडे पाठविली आहे.

एकीकडे राज्य सरकार भरमसाट योजनांवर वारेमाप पैसा खर्च करत असताना शेतकऱ्यांच्या योजनांना पद्धतशीर कात्री लावली जात आहे. २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पाच हजार कोटी रुपये आर्थिक तरतूद नसल्याने देता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाचा तीन टक्के निधी कपात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी हात का आखडता?

दोन वर्षांचे पुरस्कार देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हा सोहळा मुंबईत होणार होता. नियमाप्रमाणे या सोहळ्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना कुटुंबीयांसह निमंत्रित केले जाते. त्यांना प्रवास भत्ता, एक दिवस राहण्याची सोय, निवासव्यवस्था ते कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास, शेतकऱ्याच्या पत्नीला साडी, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाते.

या सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे राज्यपालांसोबत स्नेहभोजन आयोजित केले जाते. यासाठी येणारा खर्च जास्त असल्याने वित्त व नियोजन विभागाचा अभिप्राय घेतला जातो. मात्र या सोहळ्यासाठी येणाऱ्या खर्चाला हात आखडता घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT