Girl Violence
Girl Violence  Agrowon
ॲग्रो विशेष

Girl Violence : मुलींचा श्‍वास कोंडला जात आहे?

टीम ॲग्रोवन

रामदास वाघ

९४०३४३५२१०

भारतीय संस्कृती (Indian Culture) ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. तिला ऋषिमुनींचा, साधुसंतांचा, थोर पुरुषांचा, शहिदांचा, महात्म्यांचा, चारित्र्यसंपन्न स्री-पुरुषांचा वारसा आहे. समर्पण, साधना, मानवता, परोपकार, चारित्र्य, शौर्य, औदार्य, क्षमाशीलता, बंधुता, समता, आपुलकी, त्याग अशा महान मूल्यांनी ती समृद्ध आहे. सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम ही तिची आभूषणे आहेत. आपल्या संस्कृतीत महिलांकडे (Women) देवी-देवतांच्या रूपात पाहिले जाते. प्रत्येक कथेत म्हणा किंवा कार्यक्रमात महिला अग्रभागी असतात.

गृहिणीला आपण गृहलक्ष्मी म्हणतो, कारण ती कुटुंबाचे वैभव असते. एकविसाव्या शतकातील स्री फक्त कुटुंबापर्यंतच मर्यादित न राहता देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी संघर्ष करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचा मुक्तसंचार सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने भारताची जागतिक पातळीवर प्रतिमा अधोरेखित झाली. ती माणसाच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे काम करते. ती माणसाला माणूसपणाची जाणीव करून देते. महात्मा गांधी किंवा महात्मा जोतिबा फुले महामानव झाले, कारण त्यांच्या आयुष्यात कस्तुरबा आणि सावित्रीबाईंच्या संघर्षाची, त्याग व समर्पणाची मोठी शक्ती होती.

स्रीशिवाय मानवी जीवन ओसाड वाळवंटासारखे आहे. त्याग आणि संयमाच्या पायावर ती पुरुषांच्या जीवनात तेजाची पेरणी करीत असते. आपल्या अपत्यांमध्ये ती मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करीत नाही. त्यांच्या पुढ्यात ती सारखे माप टाकते. मुलींवर अन्याय होऊ नये, म्हणून ती ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा मंत्र तनमनधनाने जपते. लेक म्हणजे तिला काळजाचा तुकडा वाटतो. ती तिला तळहातावरील फुलाप्रमाणे जपते.

पण समाज या लेकींना फुलाप्रमाणे जपतो का? लेक ही कोणाची नात असते, कोणाची बहीण असते, कोणाची पुतणी किंवा भाची असते. नात्यांच्या गोतावळ्यातील ती एक नाजूक कळी असते. निष्पाप आणि निरागस. भारतीय संस्कृतीत किती महत्त्व आहे नात्यांच्या पवित्र संस्कारांना! या निष्पाप नाजूक कळ्या उमलण्याच्या अगोदरच कोमेजून गेल्या तर समाजाच्या नैतिक मूल्यांचा समतोल दोलायमान होणार नाही का? आजच्या घडीला वर्तमान स्थितीत आपण समाजाचे जे चित्र पाहतो, ते किती भयंकर आहे ! चिमुरड्या मुलींवर खाऊ किंवा चॉकलेटच्या आमिषाने होणारे बलात्कार मन सुन्न करणारे आहेत.

निष्पाप, निरागस अशा कळ्यांना कुस्करण्याचा अधिकार या पशूंना कोणी दिला? पाशवी कृत्य करून आणखी तिचा गळा घोटतात. तिच्या शरीराचे तुकडे करतात. अहो, हे तर राक्षसांचेही बाप निघाले ! घरात एकटी, दुकटी पोरगी किंवा तरुणी अथवा मध्यम वयस्क महिला असली, तर ती मुक्तपणे श्‍वाससुद्धा घेऊ शकत नाही. तिच्या मानेवर कसल्या तरी अनामिक भीतीची टांगती तलवार सदैव लोंबकळत असते.

शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या तरुणींवर अपवित्र नजरांचा भडीमार सदैव होत असतो. काही बेछूट तरुण अश्‍लील शब्दांचे वार करीत असतात. काही तर एकतर्फी प्रेम करतात. प्रतिसाद मिळत नाही म्हणून चाकू हल्ला करतात. अॅसिड फेकून जखमी करतात. काहींची पेट्रोल-डिझेल टाकून हत्या करतात. महाविद्यालयीन तरुणींना लिफ्ट देऊन व अज्ञातस्थळी नेऊन कित्येक दिवस तिचे शोषण करतात. कित्येक दिवस अमानुष कृत्य करून शेवटी तिचा गळा घोटतात. नाहीतर देहाचे छिन्नविछिन्न तुकडे करतात.

थोर पुरुषांच्या महान देशात चिमुरड्या पोरींचा, तरुणींचा, मध्यम वयस्क स्त्रियांचा अशाप्रकारे कोंडमारा होत असेल तर आपल्या उच्च संस्कृतीचा ऱ्हास कोण थांबवेल? आपल्या देशाला चारित्र्यसंपन्न महान पुरुषांची परंपरा आहे. अमेरिकेमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेत हिंदू धर्माचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित करताना स्वामी विवेकानंदांना एक तरुणी भेटली, ती म्हणाली, ‘मला तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा.’ स्वामीजी म्हणाले, ‘माते,

मलाच तुझा पुत्र समज.’ किती उदात्त विचार होते स्वामीजींचे! अशा थोर पुरुषांच्या देशात जन्मणारे आपण कधी नतमस्तक होणार आहोत. चिमुरड्या पोरींसमोर, तरुणींसमोर आणि मध्यम वयस्क महिलांसमोर?

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT