Himalayan Tribes Agrowon
ॲग्रो विशेष

Gaddi Community: गद्दींचं जीवन: हिमाचलच्या डोंगरांवरील एका परंपरेचा संघर्ष

Traditional Livestock Culture: गद्दी समाज, एक प्राचीन पशुपालक आणि शेतकरी समुदाय, हिमाचल प्रदेशाच्या कांगडा आणि चांबा जिल्ह्यांत आपला अस्तित्व टिकवून आहे. पर्वत रांगा आणि हिमाचली प्रदेशातील त्यांच्या स्थानिक ज्ञानावर आधारित जीवनशैली आता एक मोठ्या बदलाशी जुळवून घेत आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यटनामुळे त्यांच्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

Team Agrowon

सुनील तांबे

Himachal Pradesh Pastoralists : संध्याकाळी शिट्या, कुत्र्यांचं भुंकणं ऐकू आलं म्हणून सोपान शेतं पार करत वर गेलो. शेळ्या-मेंढ्यांच्या बेंएएं बेंएंए चा गजर ऐकू आला. डोंगरातील एका आडवाटेवरून शेळ्या-मेंढ्यांचा एक कळप उतरत होता. लोकरीचा ढग खाली येतोय असं भासलं. हे गद्दी आहेत, हिवाळा सुरू झाला की ते गावी परततात.

ऑक्टोबर अखेरपर्यंत ते धौलाधार पर्वतरांगेवरील कुरणांमध्ये आपली जित्राबं चारत होते. तिथे बर्फवृष्टी सुरू झाल्यावर गावाकडे परततात, चरणदास म्हणाले. धौलाधारची पर्वतरांग समोर होती. तिच्या अलीकडे कांगडा जिल्हा तर पलीकडे चांबा. हा प्रदेश गद्दींचा आहे. गद्दी ही एक जात नाही. राजपूत, खत्री, राणा, ठाकूर अशा अनेक जातींचा समूह आहे. चरणदास त्यांच्यापैकीच एक.

२०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मी धर्मशाला इथे पोहोचलो. धर्मशाला हे शहर कांगडा जिल्ह्यात आहे. तिथे नेतड नावाच्या एका बारक्या गावापासून हाकेच्या अंतरावर बालू होमस्टेमध्ये मी होतो. अभिषेक मधुकर हा माझा मित्र बालू होमस्टे चालवतो. हे मातीचं घर १८८५ मध्ये परशराम थापा यांनी बांधलं होतं. रॉयल ब्रिटिश आर्मीतील गुरखा रेजिमेंटमध्ये ते होते. गुरखा रेजिमेंटचं मुख्यालय अबोटाबादहून धर्मशाला इथे हलविण्यात आलं.

ब्रिटिश लष्कराने दिलेल्या जमिनीवर त्यांनी घर बांधलं. नेतड या गावात अनेक नेपाळी आहेत. तिथे गद्दी, नेपाळी, पंजाबी आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये लोक व्यवहार करतात. परशराम थापांचे वंशज शिकले आणि नोकरी-धंद्यासाठी देश-विदेशात गेले. काही कुटुंबीय धर्मशालामध्येच राहतात. पण नव्या आधुनिक घरांमध्ये. अभिषेकने या जुन्या मातीच्या घराचं रूपांतर होमस्टेमध्ये केलं.

नेतड आणि आसपासच्या गावांमध्ये गद्दी लोक राहतात. गद्दी पशुपालक आणि शेतकरी आहेत. चांबा आणि कांगडा जिल्ह्यात गद्दींची गावं आहेत. त्यांची लोकसंख्या सुमारे एक लाख असावी. हिमाचल प्रदेशात चांबा आणि कांगडा जिल्ह्यांत त्यांची गावं आहेत. धौलाधार पर्वतरांगेच्या अलीकडे कांगडा तर पलीकडे चांबा जिल्हा आहे. धार म्हणजे डोंगर रांग किंवा इंग्रजी भाषेत रेंज. पर्वतांची एकच रांग नसते.

एकामागे एक अनेक रांगा असतात. त्यांना हिमाचली भाषेत म्हणतात धार. हिवाळ्यामध्ये या पर्वतरांगेची शिखरं बर्फाने झाकलेली असतात म्हणून तिचं नाव धौलाधार. कांगडा जिल्हा सुरु होतो पठाणकोटपासून. पठाणकोट पंजाबच्या मैदानात आहे. तिथून नूरपूरमार्गे धर्मशाला आणि त्याहीपेक्षा उंचावर मॅक्लोडगंज. आणि सर्वात उंच धौलाधार रांग. मैदानी प्रदेश, शिवालिक टेकड्या, छोटा हिमालय (धौलाधार) असा कांगडा जिल्ह्याचा भूगोल आहे.

प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या वनस्पती आहेत. बाभूळ, अडुळसा, टणटणी वा घाणेरी, सिनाथा या झुडपांनी शिवालिक टेकड्या झाकलेल्या असतात. आंबा, लिची यांच्या बागा तिथे आहेत. शिवालिक टेकड्या आणि हिमालय यांच्यामध्ये कांगडा व्हॅली आहे. इथे पाइन वा चीडचे वृक्ष, बेंट घांस, दाढी घांस, नाशपती, आलुबुखार. मॅक्लोडगंजला म्हणजे हिमालयाची सुरुवात होते तिथे देवदार, रोडोडेन्ड्रॉन वा बुरांशचं जंगल.

एप्रिल महिन्यात म्हणजे ऐन वसंतात मी मॅक्लोडगंजला होतो. तिथे रोडोडेन्ड्रॉनला बहर आला होता. ग्रीक भाषेत रोडो म्हणजे लाल, डेन्ड्रॉन म्हणजे झाड. हिमाचल प्रदेशात या झाडाला म्हणतात बुरांश. या फुलांची चटणी, जॅम, सरबत आणि वाइनही बनवतात. बालू होमस्टेच्या अंगणात आणि परसात नाशपती आणि आलुबुखारची फळं लागली होती. जून आणि जुलै महिन्यांत ही फळं पिकू लागली.

थोडं खाली गेलं की गग्गल. तिथे धर्मशालाचा विमानतळ आहे. तिथे लिची आणि आंब्याच्या बागा होत्या. पंजाबच्या सीमेवर नूरपूर. तिथे जुलै महिन्यात आंब्याचा हंगाम होता. पठाणकोट ते धर्मशाला महामार्गावर जागोजागी आंब्याचे स्टॉल लागले होते. कांगडा जिल्ह्यात सफरचंदाच्या बागा नाहीत. तिथला पाऊस सफरचंदाला मानवत नाही.

ऑक्टोबरअखेर गावी परतलेले गद्दी डोंगर उतारावरील सोपान शेतांमध्ये आपल्या जित्राबांना बसवतात. धानाची कापणी झाल्यानंतरची धसकटं आणि तण, गवत आणि काही मोठ्या वृक्षांची पानं हा चारा असतो जित्राबांचा. त्यांच्या मलमूत्राने शेतांना खत मिळतं. डिसेंबर अखेर सोपान शेतांमध्ये गव्हाची पेरणी करतात. आता जनावरं शेतात नाही तर नदीच्या वा ओढ्याच्या काठाने चारायला नेतात.

अनेक गद्दी जनावरांना घेऊन पंजाबच्या मैदानात जातात. कांगडा जिल्ह्यात गव्हाची कापणी मे महिन्यात होते. त्या सुमारास गद्दी आपली जित्राबं घेऊन गावी परततात. हा मोठा सण असतो. धानाची लावणी केल्यावर गद्दी आपली जित्राबं घेऊन धौलाधारच्या शिखरांकडे कूच करतात. ऑक्टोबरपर्यंत तिथे त्यांचा मुक्काम असतो. तिथे गद्दी पुरुष आपआपल्या कळपासोबत राहतात. उघड्या आकाशाखाली. घोंगडी पांघरून निजतात. सोबत मक्याचं वा गव्हाचं पीठ, मीठ, मिरच्यांची चटणी असा शिधा बांधून घेतलेला असतो. प्रत्येक कळपाचं क्षेत्र राखीव असतं. शेकडो वर्षांच्या परंपरेने निश्‍चित केलेलं. तंटा उद्‍भवला तर एकत्र बसून निवाडा करतात.

जित्राबांना चारण्याचं काम पुरुषांचं. त्याशिवाय नांगरणीही पुरुष करतात. शेतातली ढेकळं फोडणं, धानाची लावणी, लोकरीपासून धागा काढणं, घोंगड्या विणणं ही कामं बायकांची. प्रत्येक कुटुंबातील जित्राबांची संख्या ठरलेली असते. एका मेंढीमागे १ रुपया तर एका शेळीमागे सव्वा रुपया फी वन विभागाला द्यावी लागते.

गद्दी कुत्रे केसाळ आणि थोराड असतात. शिकार करताना बिबट्या गळ्याला दात लावतो म्हणून या कुत्र्यांच्या गळ्याला लोखंडी काट्यांचा पट्टा बांधतात. प्रत्येक कुटुंबाच्या कळपांचे स्थलांतराचे मार्ग वन विभागाने निश्‍चित केले आहेत. गाडीरस्ते टाळून जाणारे हे मार्ग दुर्गम असतात. गेल्या वर्षी फी भरल्याची पावती हा जनावर चारण्याचा परवाना. बापाने तो मुलाकडे सोपवायचा. पिढ्यान पिढ्या हा क्रम चालत राहतो.

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिल्याने पर्यटन उद्योगाने बाळसं धरलं आहे. फोर लेन हायवे, बोगदे, पूल, धरणं यांनी हिमालय पोखरला जातोय. गद्दींच्या चराऊ जमिनींवर हॉटेल, रिझॉर्ट, इमारती उभ्या राहत आहेत. गद्दींच्या लोकरीला आणि लोकरीच्या कपड्यांना बाजारपेठ नाही. गद्दींमध्ये साक्षरतेचं प्रमाण ३० टक्के आहे. स्थलांतर करताना त्यांच्या शेळ्या वा मेंढ्या चोरीला जातात.

त्यामुळे पशुपालनावर गुजराण होणं अशक्य बनलं आहे. केवळ तीस टक्के गद्दी आता पशुपालन करतात. उरलेले शेती, रोजंदारी, टॅक्सी ड्रायव्हर अशी कामं करतात. केवळ मांसासाठी शेळ्या-मेंढ्या पाळणं परवडत नाही. कारण पशुखाद्य विकत घेऊन त्यांना पोसावं लागतं. कांगडा जिल्ह्याच्या सरकारी वेबसाइटवरील माहितीनुसार जिल्ह्यातील ९० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. पायाभूत सुविधांचा विकास जिल्ह्याबाहेरील भांडवलदारांच्या हितासाठी चालला आहे, असा त्याचा अर्थ होतो. गद्दी जात्यात आहेत बाकीचे सुपात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hapus Mango Price: हापूसला पाच ते सात हजार रुपये दर

Student International Visit: ‘झेडपी’चे विद्यार्थी देणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट

Ai in Orange Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर संत्रा बागांचे व्यवस्थापन

Ethanol Blending: इथेनॉल ब्लेंडिंग वाढविण्याचे सरकारला आवाहन

Sugar Industry: ‘साखर’प्रश्‍नी समितीचा उतारा

SCROLL FOR NEXT