Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur Vegetable Market : फळे, भाजीपाल्यांसाठी नागपूरची कळमना बाजारपेठ

Nagpur Fruit Market : नागपूर- कळमना ही बाजार समिती फळे व भाजीपाला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे विदर्भाच्या तुलनेत अन्य जिल्हे व परराज्यांमधून या शेतीमालाची मोठी आवक सुरू असते.

Team Agrowon

विनोद इंगोले
Nagpur Fruit And Vegetable Market : नागपूर- कळमना ही बाजार समिती फळे व भाजीपाला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे विदर्भाच्या तुलनेत अन्य जिल्हे व परराज्यांमधून या शेतीमालाची मोठी आवक सुरू असते. सध्या श्रावणाचा हंगाम असल्याने विविध भाजीपाला- फळांना मागणी असल्याचे दिसते आहे.

आशिया खंडातील मोठ्या बाजार समित्यांपैकी नागपूर जिल्ह्यातील कळमना बाजार समिती ओळखली जाते. नागपूरपासून सुमारे १७ किलोमीटरवर ती वसली आहे. विदर्भातून येथे फळे- भाजीपाला कमी प्रमाणात येतो. त्यामुळे बहुतांश आवक राज्यातील अन्य भागांवर अवलंबून असते. बाजार समितीचे क्षेत्र सुमारे ११४ एकर असून, चार एकर जागा नव्याने घेतली आहे.

अडत्यांची संख्या ३०० ते ३५० आहे. सध्या श्रावण हंगाम सुरू असल्याने ग्राहकांकडून विविध फळे-भाज्यांना चांगली मागणी आहे. आवकेत तेच प्रतिबिंब पाहण्यास मिळत आहे. श्रावणातील पूजांना प्रसादासाठी कोहळ्याला मागणी असते.

हा कोहळा बीड जिल्ह्यातून येत आहे. सध्या मोसंबीचा हंगाम सुरू झाला आहे. जालना, औरंगाबाद, नागपूर, अमरावती भागांतून त्याची आवक आहे. दर १८ ते २२ रुपये प्रति किलो आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सिलिगुडी, काठमांडू या भागांतूनही मोसंबीचा पुरवठा होतो.

फळांचा पुरवठा

कर्नाटक (बंगळूर), आंध्र प्रदेशातून नारळाची चार ते पाच गाड्यांची आवक आहे. ३२ ते ३५ रुपये प्रति नग दर आहे. त्याची आवक बाराही महिने असल्याचे दि नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले. अननसाची बहुतांशी आवक केरळ भागातून असून, ३० ते ६० रुपये प्रति नग असा घाऊक दर आहे.

नागपूरची ‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख आहे. मात्र जिल्ह्यात या फळपिकाखाली केवळ २५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. मंत्र्याचे सर्वाधिक ७० हजार हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. व्यापारी आनंद डोंगरे यांच्या माहितीनुसार आंबिया बहरातील मंत्र्याची आवक सप्टेंबरअखेर होते. ही फळे जानेवारी मध्यापर्यंत उपलब्ध होतात.

यंदा सफरचंद तेजीत

सफरचंदाचे दर सध्या १५०० ते ४००० रुपये प्रति पेटी असे आहेत. २० ते ३० किलो प्रति बॉक्‍सची क्षमता राहते. जून ते सप्टेंबर असा चार महिने हिमाचलमधील सफरचंदांचा पुरवठा होतो. मात्र पावसामुळे भूस्खलन होऊन वाहतूक बंद आहे. परिणामी, सफरचंद महाग व उठाव कमी आहे.
हिमाचलनंतर काश्मीर भागातील सफरचंदाची आवक होते. ही फळे फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होतात. खुल्या पद्धतीचे लिलाव येथे होतात. ही प्रक्रिया पारदर्शी राहते.

भाजीपाला

सिंचनाच्या सुविधांचा अभाव व अन्य कारणांमुळे विदर्भात भाजीपाला उत्पादकांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळेच येथील बाजारात ७५ ते ८० टक्‍के भाजीपाला राज्याच्या अन्य भागांतून येतो. नागपूर, तसेच औरंगाबाद भागातून फ्लॉवरची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. दक्षिणेकडील कोलार, भागेपल्ली, मदनपल्ली, अनंतपूर, कोलार या भागांतून टोमॅटो बाजारात येतो.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड होत असून, त्याचे क्षेत्र १५०० हेक्‍टर पर्यंत आहे. बुलडाणा, जळगाव या भागांतून हिरवी वांगी, तर कोबीची आवक बेळगावातून होत आहे. राजस्थानातून गाजर, कोलकाता परिसरांतून पडवळ, भोपळा, करटुले यांची आवक होते.

या बाजारातून शंभर ते १५० किलोमीटरच्या परिघातील शहरे, गावांमध्येही फळे व भाजीपाला यांचा पुरवठा होतो. चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट, वडसा अशा गावांचा त्यात समावेश आहे. शुक्रवारी बाजार बंद राहतो.

बाजारातील सुविधा

येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शिदोरीगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. कळमना पोलिस ठाणे असून, बाजार समितीचे सुरक्षारक्षक, तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचेही देखरेख राहते. रस्ते, सांडपाण्यातील नाले याबाबत मात्र दुरवस्था आहे. याबाबत वारंवार व्यापारी संघटनेच्या वतीने बाजार प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

परंतु अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वीजपुरवठा बाजार समितीला थेट केला जातो. त्यातून ‘सबमीटर’च्या माध्यमातून व्यापाऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. या ठिकाणी जादा दराने वीज आकारणी होते अशीही व्यापाऱ्यांची तक्रार आहे.

परिसरात एका व्यापाऱ्याचे एकमेव शीतगृह आहे. मिरची, गूळ आदी माल येथे ठेवले जातात. बाजार समिती प्रशासनाने नाशीवंत मालाची होणारी आवक पाहता स्वतःचे शीतगृह उभारावे अशी मागणी होत आहे.

सुविधा उपलब्ध करणार

बाजार समितीचे सचिव एन. पी. यगलेवाड म्हणाले, की ७० ते ८० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून, बाजार समितीमधील अंतर्गत रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. भाजीपाला आणि फळांची बाजारपेठ नियमनमुक्‍त झाल्यामुळे थेट बागेतून सौदे होतात.

परिणामी, बाजार समितीत अपेक्षित संत्रा, मोसंबीची आवक होत नाही. धान्य प्रतवारी यंत्रणेबाबत आम्ही सकारात्मक आहोत. बाजार समितीत फळ बाजाराची वार्षिक उलाढाल ३९६ कोटी रुपयांची, तर भाजीपाल्याची उलाढाल २०० कोटी रुपयांची आहे.

विनोद ऊर्फ बालू भैसे, ९८२३०८११३३
(अध्यक्ष, भाजीपाला मार्केट युवा अडतिया असोसिएशन)

आनंद डोंगरे, ९४२२१०५५१३
(अध्यक्ष, दि नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशन)

एन. पी. यगलेवाड, ९८२२३६३९९०
(सचिव, कळमना बाजार समिती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT