Food Agrowon
ॲग्रो विशेष

Importance of Food : अन्न म्हणजे फक्त ‘पोट भरण’ नव्हे

नीलिमा जोरवर

Human Diet Management : निसर्गापेक्षा मोठा गुरू नाही, ‘माणूस’ नावाचा आनंदाचा ठेवा दुसरा नाही. नवीन वर्षात या दोन्हीही गोष्टींचा सहवास परिपूर्ण मिळो, अशी अपेक्षा ठेवून नववर्षासाठी सज्ज होऊया. कामानिमित्त ‘अन्नाद्वारे आरोग्य’ याच्याशी अनेकदा संबंध येतो. आहारपद्धती व बदललेली जीवनशैली यांचे विविध स्तरावर आवलोकन करता येऊ शकते.

गावापासून ते शहरापर्यंत, मातीपासून पिकांपर्यंत, घरच्या जेवणापासून ते बाहेरच्या फास्टफूडपर्यंत, आई-आज्जीच्या पारंपरिक पाककलेपासून ते पिझ्झा-चाऊमीनपर्यंत सर्व प्रकारच्या आहाराचा समावेश होताना दिसत आहे. कधी फॅशन म्हणून तर कधी जाहिरात बघून वेगवेगळे अन्नपदार्थ आपल्या आहारात आले आहेत.

यात अन्न सेवन करण्याचा मूळ उद्देश कुठेतरी हरवला जात आहे. परिणामी, बिघडलेले आरोग्य आपणास पाहावयास मिळते. अगदी काही वर्षांपूर्वी आपले आजी-आजोबाच्या वेळी हे आजार नव्हते; मग आताच हे का व कसे आले असावेत? याचे उत्तर शोधताना त्यास अनेक कंगोरे आहेत, असे लक्षात येते.

निरोगी राहण्यासाठी आहार, विहार व विचार या तिन्हीही गोष्टींचा संबंध आहे. आनंदी व सकारात्मक विचार हे मन उल्हसित ठेवतात, त्यासोबतच व्यायामाचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. बैठ्या कामात असणाऱ्या लोकांसाठी तर व्यायाम हा अतिमहत्त्वाचा भाग आहे.

आहार हा चतुरस्र असावा, ऋतुमानानुसार आहार असावा, आपल्या परिसरानुसार आहार असावा. उदाहरणार्थ, आदिवासी लोक डोंगरात राहतात तर त्यांचे अन्न हे डोंगरातील जंगलांतून मोठ्या प्रमाणात येते, त्यातून त्यांची विशिष्ट खाद्यसंस्कृती निर्माण झाली आहे.

आर्थिक ऐपतीनुसार देखील आहारात बदल दिसून येतो. गरिबांचा आहार वेगळा, तर श्रीमंतांचा आहार वेगळा होतो. ग्लोबल झालेल्या आजच्या काळात वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थांचा प्रभाव नवीन पिढीवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.


आजकाल जुनी पिके जाऊन त्याची जागा नवीन पिकांनी घेतली आहे. त्याबरोबर त्या त्या भागातील ग्रामीण खाद्यसंस्कृती संपत चालली आहे. त्यामुळे विशिष्ट वेळी बनवायचे पदार्थ, त्याचे ज्ञान नष्ट होत चालले आहे.

हे पदार्थ बनवण्याचे ज्ञान संपले तर तो पदार्थ औषध म्हणून असलेले त्याचे मूल्य संपते व परिणामी बाजारात असणाऱ्या औषधांवर अवलंबून राहावे लागते. उदाहरणार्थ, कोणत्याही धान्याची बनवली जाणारी पेज, कन्हेरी, आंबील हे पदार्थ आजारपणात मोठे गुणकारी असतात. ग्रामीण भागातील जुने लोक आजही त्याचा वापर करताना दिसतात.

पण इतर लोकांना हे माहितच नाही. त्यामुळे या सदरातील लेखनातून आपण योग्य आहार, अन्नपदार्थ, त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत, काही आवश्यक पारंपरिक पाककृती समजून घेणार आहोत. हे आहारभान आपल्याला मधुमेह, थायरॉइड, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास काही प्रमाणात मदत नक्कीच करू शकेल, याची खात्री आहे.

आज ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सर्वच ठिकाणी जीवनशैलीमुळे उद्‍भवलेले आजार (लाइफस्टाइल डिसिजेस) दिसून येत आहेत. याचा सबंध कुठेतरी बदललेल्या खानपानाच्या सवयीत असू शकतो का? अयोग्य आहारपद्धत म्हणजे शरीरातील पचनक्रिया बिघडविण्यास जशी मदत करतात तसेच शरीरास मिळणाऱ्या पोषणावर देखील त्याचा परिणाम होतो. वाढलेले कुपोषण हे कमी अन्न मिळणाऱ्या लोकांमध्येच असते असे नाही.

अपोषित अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सतत सेवन करणाऱ्यांमध्येही ते दिसते. रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असणे हे स्त्री-पुरुष दोघांमध्येही वाढलेली समस्या आहे. पोषणकमतरता निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. मुळातच आपल्या आहारात येणारे पदार्थ जेथे पिकवले जाते ती शेतीपद्धती बदलली आहे, हेही वास्तव आहे. बियाणे, मातीपासून ते वातावरणापर्यंत सर्वच बदलले आहे.

बियाण्यांमध्ये उत्पादनवाढीसाठी संकरित बियाण्यांचा वापर वाढला आहे. मातीचा कस कमी झाल्यामुळे झाडांना वाढीसाठी वरून पोषण पुरवले जात आहे. वातावरण सातत्याने बदलत आहे, त्याचा परिणाम म्हणून पिकांवर कीड-रोगाचे प्रमाण वाढले आहे आणि ओघानेच त्यांना आटोक्यात आणण्यासाठी कीडनाशकांचा वापरही. असे बाधित अन्न आपल्या आहारावर काय परिणाम करू शकतात, यावर चर्चा होत नाही. अन्ननिर्मितीची प्रक्रिया कुठेतरी पोषणमूल्यांवर परिणाम करते आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

जसा कुपोषणाचा प्रश्‍न मोठा आहे त्याचप्रमाणे अतिपोषणाची समस्या देखील वाढत आहे. यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
योग्य आहार कोणता? तो कसा घ्यावा? हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्न कच्चे खावे की शिजवून? स्वतंत्र खावे की मिश्र स्वरूपात? शिजवण्यासाठी चूल वापरावी की कुकर? कडधान्ये मोड आणून खावीत की भिजवून? तांदूळ सालासह खावा की पांढराशुभ्र?

भरडधान्ये भिजवून शिजवावी की तशीच? आंबवलेले पदार्थ आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम करतात? देशी बियाणे आणि संकरित बियाणे यात नेमका फरक काय? त्याचा अन्नावर काय परिणाम होतो? गहू हा आरोग्यास हितावह आहे की ज्वारी? अशा अनेक प्रश्‍नांचे चर्चा-चर्वण समाजमाध्यमांवर (व्हॉट्सॲप/इंस्टाग्राम) होत असते. अनेकदा मिळालेल्या माहितीची चिकित्सा न करता विश्‍वास ठेवला जातो आणि समज-गैरसमज वाढत जातात.

कोणता आहार घ्यावा? कसा घ्यावा? किती खावे? कसे खावे? कधी खावे? इत्यादी गोष्टी समजून घेण्यासाठी आज विविध आहारपद्धती समोर येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात गोंधळ तयार होत असतो. त्याचा फायदा बाजार घेण्यास तयार असतोच. जिमसाठी, महिलांच्या आरोग्यासाठी, लठ्ठपण कमी करणारे, रुग्णांसाठी, बेबीफूड असे विशेष आहारपदार्थ बाजार तयार करत असतो. बरेचदा बाजारात उपलब्ध असलेले हे महागडे पर्याय निवडले जाण्याची शक्यता असते. बरेचदा अमुक-तमुक डाएट अवलंबले जाते. हे डाएट प्लान खिशाला परवडणारे असतात का? हा प्रश्‍न तर आहेच. पण त्याचे बरे-वाईट परिणामही शरीरावर होत असतात. त्याचा विचार देखील व्हायला हवा.

आपले अन्न हे आपल्या शरीरचे इंधन असते, हे लक्षात घ्यायला हवे. अन्नामुळे आपले शरीर, मन व बुद्धी यावर परिणाम होत असतो. निरोगी राहण्यासाठी मन, बुद्धी व शरीर तिन्ही सुदृढ असणे अत्यावश्यक आहे. यासाठी इथे एक कथा आठवते. श्‍वेत्केतू हा उद्दालक ऋषींचा मुलगा. वयाच्या १६ वर्षांपर्यंत गुरुगृही राहून विद्याप्राप्त करून आल्यावर कुणा मोठ्यांविषयी आदर बाळगेनासा झाला.

त्याला त्याच्या पुस्तकी विद्येचा अहंकार झाला होत. ही गोष्ट उद्दालक ऋषींनी ओळखली व त्यास आज्ञा केली, की पुढील १५ दिवस त्याने कोणतेही अन्न खाऊ नये. फक्त पाण्यावर राहावे. श्‍वेत्केतूने वडिलांची आज्ञा पालन करत पुढचे १५ दिवस फक्त पाण्यावर काढले. १६ व्या दिवशी उद्दालक ऋषींनी श्‍वेतकेतुला बोलावले.

तो आता अतिशय कृश झाला होता, डोळे खोल गेले होते. वडिलांनी त्यास आता वेदांच्या ऋचा म्हणण्यास सांगितले. त्याने तोंड उघडले पण त्यास काहीही आठवत नव्हते. त्याची बुद्धी बंद पडल्यासारखीच झाली होती. त्याला वाटले मी इतकी वर्षे केलेल्या अभ्यासाचा काय उपयोग झाला? त्यावर उद्दालक ऋषींनी त्याला समजावले, की फक्त पुस्तकी ज्ञान जगण्यासाठी महत्त्वाचे नसते. आपले शरीर, बुद्धी चांगली राहण्यासाठी अन्न महत्त्वाचे असते; त्यामुळे पुस्तकी विद्येचा अहंकार बाळगता कामा नये.

या गोष्टीतल्या श्‍वेतकेतू प्रमाणे आजकाल आपली अवस्था झाली आहे. सतत पुढे पुढे जाण्यासाठी एका अलिखित रेसमध्ये आजचा समाज सामील झाला आहे. प्रत्येकाला पुढे जायचे आहे, पैसे कमवायचे आहेत, करियर करायचे आहे. यातून प्रचंड धावपळ, ताण-तणाव निर्माण होत आहेत.

शेतकरी असो की आयटी सेक्टर, सर्वच या रेसचा भाग आहेत. परिणामी ‘आहार’ या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. अन्न हे फक्त ‘पोट भरण’ झाले आहे. हे बदलायचे असेल तर अन्नसाक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. नेमके कुठे काय बिघडत आहे, हे समजले तर काय योग्य असू शकते, हे समजण्यास मदत होईल आणि आपण पुन्हा एकदा निरोगी जीवनाकडे वाटचाल करू.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत. ९४२३७८५४३६)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT