Jalgoan News : खानदेशात खतपुरवठा रखडत सुरू आहे. त्यात १०ः२६ः२६चा तुटवडा कायम असून, केळी उत्पादक व अन्य बागायतदारांना खतांबाबत अडचणी येत आहेत. खतांचा पुरवठा खानदेशात खरिपात हव्या त्या वेळी हवा तसा नव्हता. पोटॅश अनेक कंपन्यांनी पाठविलेच नाही. फक्त एका कंपनीवर पोटॅशचा पुरवठा करण्याची मदार होती.
रब्बीत जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख टन खतपुरवठा अपेक्षित होता. रब्बी हंगामाचा अधिकृत कालावधी संपला आहे. हा खतपुरवठा ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत होणे अपेक्षित होते. परंतु ७५ टक्केही खतपुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत झालेला नाही. धुळे व नंदुरबारातही खतपुरवठा हवा तसा नाही. युरियाचा रब्बीत सुमारे ७१ हजार टन पुरवठा अपेक्षित होता. परंतु एवढा पुरवठाच हंगाम पूर्ण झाला तरीदेखील झालेला नाही.
धुळे व नंदुरबारातही १०ः२६ः२६ व युरियाचा तुटवडा आहे. तेथेही मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत ७० टक्केही खतपुरवठा झालेला नाही. खतांची मागणी सध्या केळी व भाजीपाला लागवड करणाऱ्या भागात आहे. खानदेशात सातपुडालगत जलसाठे बऱ्यापैकी आहेत. या भागात केळी, पपई व अन्य भाजीपाला पिकांची शेती आहे.
कलिंगड, खरबूज लागवडही या भागात केली जात आहे. यामुळे या भागात १०ः२६ः२६ सह डीएपी, पोटॅशची मागणी आहे. १०ः२६ः२६ हे खत पुरेसे नसल्याने शेतकरी अन्य विद्राव्य व सरळ, मिश्र खतांचा उपयोग करीत आहेत. यात अनेकदा अधिकचा खर्चही येत आहे.
१०ः२६ः२६चा तुटवडा असल्याने विक्रेते, खत वितरक लिकिंग करीत आहेत. मोठ्या, ओळखीतल्या शेतकऱ्यांनाच १०ः२६ः२६ हे खत दिले जात आहे. पाच - सहा गोण्यांसोबत अन्नद्रव्य किंवा अन्य खतांची एक ते दीड हजार रुपयांची खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, धरणगाव, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार या सर्वच भागांत १०ः२६ः२६ या खतावर लिकिंग केली जात आहे. लिकिंगमुळे शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च वाढत आहे. पर्यायाने उत्पादन खर्चही फुगत आहे.
रब्बीतही तुटवडा कायम
१०ः२६ः२६चा तुटवडा खरिपातही अधिक होता. रब्बीतही तो कायम आहे. खतांसंबंधीचे काम जिल्हा परिषदेतील कृषी विभागाकडे आहे. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज आहे. लोकनियुक्त सदस्य, पदाधिकारी नसल्याने यंत्रणांवरही वचक नाही, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे खते कंपन्यांकडून येतात, त्यात यंत्रणा, कृषी विभाग काय करू शकतो, अशी हतबलता अधिकारी व्यक्त करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.