Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : दमदार पाऊसमानामुळे ‘रब्बी’वर बळीराजाचा भर

Team Agrowon

Pune News : राज्यातील सर्व जलाशयांमध्ये यंदा पुरेसा असलेला साठा, परतीच्या मॉन्सूनमुळे पोषक बनलेली मृदा आर्द्रता, यामुळे यंदा रब्बी हंगाम अधिक जोमात राहील असे चित्र आहे. शेतकऱ्यांनीही रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले असून, यंदा राज्यात सहा लाख हेक्टरने रब्बी पेरा वाढण्याचे संकेत आणि तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागानुसार, राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५४ लाख हेक्टर इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीचा पेरा यंदा १६ लाख हेक्टरवरुन १८ लाख हेक्टर, तर गहू १०.४७ लाख हेक्टरवरून १२ लाख हेक्टरपर्यंत, तसेच प्रमुख पीक असलेला हरभरा २६.८८ लाख हेक्टरवरुन यंदा ३० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मकादेखील ३.५७ लाख हेक्टरवरून पाच लाख हेक्टरपर्यंत नेण्यास पोषक स्थिती आहे.

रब्बीत तेलबिया पिकांना फारसा वाव नसतो. मात्र यंदा करडईचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४४ हजार हेक्टरवरून एक लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे प्रयत्न होतील. तसेच २१ हजार हेक्टरवर जवसचा पेरा होण्याकरिता नियोजन केले गेले आहे.

सोलापूर जिल्हा रब्बीसाठी ओळखला जातो. जिल्ह्यात यंदा उजनीसह मध्यम ८ आणि लघू ५१ प्रकल्पांतही पुरेसा पाणीसाठा आहे. तर सरासरी ४४५ मिलिमीटरपेक्षा अधिक ५०६ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याने यंदा ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी वाढेलच, शिवाय कांदा, उसाचे क्षेत्र वाढीचे चिन्हे आहेत.

सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसावर रब्बी पेरा होणार आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार ६०० हेक्टर आहे, मात्र यंदा ते २ लाख ९ हजार हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. ज्वारी, गहू, हरभरा यासह अन्य बियाणे आणि खते यांची मागणी कृषी विभागाने केली आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापीर आणि तासगाव ही प्रमुख रब्बी हंगामाची तालुके आहेत.

सातारा जिल्ह्यात दमदार पावसाने प्रमुख धरणासह लहान-मोठे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहे. रब्बीत यंदा सर्वाधिक कांदा, रब्बी ज्वारी तसेच दुष्काळी तालुक्यात उसाच्या क्षेत्रात वाढीचा अंदाज आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा ही दुष्काळी रब्बीची प्रमुख तालुके आहेत.

पुणे जिल्ह्यात यंदाच्या चांगल्या पाऊसमानामुळे रब्बीत बळीराजा ज्वारी, गहू पिकांवर भर देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र असून, यंदा यात ५० हजार हेक्टरवर वाढ होऊन दोन लाख ८० हजार ५९५ हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात ज्वारीची सुमारे सव्वा लाख हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. यासह गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असेल.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात सरासरी १९ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीखाली असते. यंदा चांगला पाऊस झाल्याने जमिनीत वाफसास्थिती आहे. रब्बीत सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे ११ हजार ८५४ हेक्टर आहे. त्‍या खालोखाल हरभऱ्याचे ४३७३ हेक्टर, गव्हाचे १६००, तर मक्याचे क्षेत्र १२९३ हेक्टर क्षेत्र आहे.

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक जलसाठा आहे. चांगल्या पाऊसमानामुळे रब्बीत गहू, हरभरा, मका, ज्वारीचा पेरा सर्वाधिक असेल. गेल्या वर्षीच्या ८४,३५८ हेक्टरच्या तुलनेत यंदा १ लाख ११ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरा प्रस्तावित आहे.

नगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने रब्बीत पेरा चांगला राहील. जिल्ह्यात गहू, कांदा, हरभरा, ज्वारीला प्राधान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. एकूण रब्बीचे ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यंदा ४ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या क्षेत्रात कांद्याचा समावेश नाही.

जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. परिणामी, यंदा रब्बीचा पेरा १०० ते ११० टक्के होईल, असे चित्र आहे. हरभरा, मकापाठोपाठ तृणधान्यांची पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असे. खानदेशात अंदाजे रब्बीची चार लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. हरभरा पेरणीस जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागातील शेतकरी पसंती देतात. हरभऱ्याची पेरणी यंदा १५ ते २० हजार हेक्टरने वाढून अडीच लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. जायकवाडीसह इतर धरणांतही मुबलक पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामासह फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असेल. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांत शेतकऱ्यांचा ज्वारी, गहू, मिरची लागवडीचे नियोजन आहे. याशिवाय ऊस, टरबूज, पपई, केळीचे नियोजन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे सिंचन प्रकल्पांसह भूगर्भातील पाणीपातळीतही वाढ झाल्याने रब्बीच्या पेरणीत वाढ होणार आहे. हरभरा, ज्वारी, गहू, करडई या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ४० हजार २२३ हेक्टर आहे. यंदा यात वाढ होऊन साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हरभरा लागवडीकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल असेल. त्यापाठोपाठ चारा पीक म्हणून ज्वारीला पसंती असेल.

पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत खरिपापाठोपाठ रब्बीतही शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून राहते. हंगामात यंदा प्रामुख्याने हरभरा हेच मुख्य पीक असेल, अकोला जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३१० हेक्टर आहे. रब्बीत काही क्षेत्रावर ओवा, मागील काही हंगामांपासून ज्वारीचीही लागवड केली जात आहे. तर वाशीम जिल्ह्यात हरभरा, गव्हासोबतच चियासीडची लागवड मोठ्या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हरभरा, डॉलर हरभरा, मका आणि गव्हाची लागवडच अधिक होईल.

दृष्टिक्षेपात रब्बी हंगाम

- सरासरी क्षेत्र : ५४ लाख हेक्टर

- गेल्यावर्षीचा पेरा : ५९ लाख हेक्टर

- यंदा अपेक्षित पेरा : ६६ लाख हेक्टर

रब्बीतील प्रमुख पिके

- हरभरा, गहू, ज्वारी, मका, चिया, जवस, तीळ, करडई, सूर्यफूल आदी.

इतर प्रमुख पिके

- कांदा, ऊस, पपई, केळी, टरबूज, खरबूज, भाजीपाला

रब्बी हंगाम तयारी...

- पश्‍चिम महाराष्ट्रात गहू, ज्वारी, मका, हरभरा पेऱ्याकडे कल

- मराठवाड्यात सर्वाधिक हरभऱ्या, पाठोपाठ ज्वारीला पसंती

- खानदेशात हरभरा, मक्यासह तृणधान्यांच्या पेरणीकडे

- विदर्भात हरभरा, गव्हासोबतच चियासीडची लागवड वाढणार

‘‘रब्बीसाठी यंदा अतिशय पोषक स्थिती राज्यभर आहे. जलाशयांमध्ये पुरेसा साठा असल्यामुळे संरक्षित सिंचनाच्या क्षेत्रात असलेल्या रब्बी पिकांना सिंचनाची अडचण येणार नाही. रब्बी हंगामाला अत्यावश्यक असलेली खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाची तयारी सुरू झाली आहे.’’
- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग
यंदा विहीर, बोअरला चांगले पाणी आहे. रब्बीत हरभरा आणि गहू पेरणीचे नियोजन आहे. रब्बीसाठी ८० ते ९० हजार रुपये खर्च अपेक्षित. पण यंदा कमी बाजारभाव, घटलेल्या उताऱ्यामुळे सोयाबीन विकून पैशाची तजवीज शक्य दिसत नाही. उधार-उसनवारी करून पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान व पीकविमा जमा केला, तर पेरणीसाठी थोडा आधार मिळेल.
- शंकर गुट्टे, शेतकरी, बेलुरा, ता. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अकोल्यात ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टर बाधित

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू

Bamboo Farming : शेतकऱ्यांनी बांबूलागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल

Paddy Disease : भात पिकावर करपा, तांबेराचा प्रादुर्भाव

Kalamana APMC : संत्रा-मोसंबीवरील काट पद्धत अखेर कळमना बाजारात बंद

SCROLL FOR NEXT