Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : आभाळ मायेची सय

Team Agrowon

शेतकऱ्याला आणि त्याच्या लेकरांना जन्म देणाऱ्या आईची माया (Mothers Love) आणि शेताची माया (Soil) सारखीच मिळत असते. शेतातील विविध हंगाम त्यांच्या जीवनात रंग भरत असतात. तिन्ही ऋतूंच्या विभ्रमांना तो यशस्वीपणे तोंड देऊ शकतो ते या माये मुळेच.

शेतीमातीत (Agriculture) राबताना, कष्ट करताना त्याला आईच्या आशीर्वादाचे सतत बळ मिळते. त्या बळाने तो अधिक जोमाने, उत्साहाने शेतीत विविध प्रयोग करत राहतो. घरातील, शेतातील, समाजजीवनातील बऱ्या-वाईट प्रसंगात आईच्याच मायेचा आधार त्याला असतो.

अगदी पायात काटा जरी टोचला किंवा मोडला तरी आपसुकच ‘आईऽ गंऽऽ’ असा उद्‍गार बाहेर पडतो. कष्टणाऱ्या कृषिपुत्राच्या नि कृषिकन्येच्या लोकगीतातील पुढील ओळी अशावेळी सहजच ओठी येतात.

‘आई म्हणू आई साऱ्या संसारात आई

मोडला काटा पाई, तिथं झाली तुझी सई’

आईची सय ही खूप भावविभोर असते. संकट छोटे किंवा मोठे असे कोणतेही असो त्यात पहिला आधार देणारी आईच असते. म्हणूनच तिची सय सर्वांत आधी येते.

शेतात जशी पाऊस पाण्यापासून निवारा मिळावा म्हणून एखादी कोपी किंवा खोप शेतकरी उभी करतो अगदी तशीच असते आईची माया. स्त्रियांच्या एका लोकगीतातील ओळी याच अर्थाच्या आहेत.

‘असा पडतू पाऊस, झुळूक येई ग वाऱ्याची

माता मपली माऊली, गं पासोडी निवाऱ्याची’

आई जशी आपल्याला निवाऱ्याची पासोडी (पडवी) वाटते. तसाच निवारा निसर्गाच्या ऊन-पावसाळी रूपात झाडाझुडपाखाली देखील मिळत असतो. शेतातील एखाद्या खोलगट भागात बोरीचे भरपूर सावली देणारे झाड असावे, अगदी तसेच आईचे रूप असते. ती सावली दीर्घकाळ लाभावी असे प्रत्येकाला वाटते.

‘माय म्हणू माय आहे, लवणाची बोर

तुझ्या सावलीला जप, चल बिनघोर’

असे एखादी माहेरवाशीण हमखास गुणगुणायची. आजच्या पिढीला हे लोकगीतांचे धन फारसे माहिती नाही. पण आईची माया कुणीही कुणाला समजून सांगण्याची आवश्यकता नसते. कारण बहुतेकांनी ती अनुभवलेलीच असते.

तिच्या वात्सल्यापुढे लाखो रुपये जरी असतील तरी त्याची तुलना होऊ शकणार नाही. हे आपल्या भावाला समजावणारी बहीणही एका गाण्यात येते. ती म्हणते...

‘मायीची माया माझी, लाखाचं झालं पाणी

नाहीतरी उपकार, येड्या लेकराच्या मनी’

आजच्या काळात शेतकऱ्याची आई होणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. रोज नवनवी आव्हाने पेलण्याची तयारी ठेवावी लागते. कधी कधी अभावाचा सामनाही करावा लागतो. जोवर मातीचे आईपण आणि आईचे वात्सल्य कायम आहे, तोवर इथल्या कृषिपुत्रांना सतत ऊर्जा आणि बळ मिळतच राहील. आई आणि शेती त्याच्यासाठी गाणी देईल.

‘जशी जन्म देते माता

तशी माती जगवते

थकलेल्या जीवालाही

माती अंती मांडी देते.’

असं माझ्या एका कवितेत म्हटलंय ते यामुळेच. जेव्हा जेव्हा शेतकऱ्याचा सण- उत्सव असतो तेव्हा तेव्हा तो मातेला आणि मातीला विसरत नाही. दिवाळीला मातीचे दिवे तेवतात, पोळा सणाला मातीचे बैलांची पूजा करतो, संक्रांतीला मातीचे सुगट (सुगड) सवाष्णीच्या हाती असतात.

नवरात्रोत्सवाचा घट आदिशक्तीचे प्रतीक बनतो. मातीचे चैतन्य माणसाच्या अंगोपांगी मुरलेले असते. जेव्हा जेव्हा कृषकाला आनंदाचे आणि परीक्षा पाहणारे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा माती त्याच्या मदतीला धावून येते. त्याच्या सुखदुःखात सहभागी होते. माता काय नि माती काय वात्सल्याचीच लोभस रूपे. फक्त

‘आभाळ मायेची सय’ अंतरंगात उतरली पाहिजे एवढेच. मग शेतकरी असो की शेतमजूर असो. त्यामुळेच कामात आनंद वाटू लागतो. सर्जनाचा सोहळा रंगू लागतो. आपले सुनियोजित कष्ट करणारे लेकरं पाहून कोणत्या आईला आनंद होणार नाही मग ती आई असो की काळी आई!

(लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT