Wardha News : तणाला प्रतिकारक असल्याची बतावणी करीत शेतकऱ्यांच्या माथी अनधिकृत बियाणे मारले जात आहे. अशाच अनधिकृत बियाणे प्रक्रिया केंद्रावर गुणनियंत्रण विभाग व पोलिसांनी छापेमारी करीत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
येथून तणनाशकाला प्रतिकारक अनधिकृत बियाण्यांचा पुरवठा होत होता. एकदा फसवणूक झालेला शेतकरी परत हे बियाणे वापरत नसला तरी नवे ग्राहक मिळत जातात. परिणामी हा धंदा गेल्या काही वर्षात चांगलाच विस्तारला आहे.
वर्धा जिल्ह्यात अशाच अवैध बियाणे कारखान्यावर पोलिस आणि गुणनियंत्रण विभागाच्या पथकाने छापेमारी करीत बियाणे साठा व पॅकिंग साहित्य जप्त केले. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेली माहिती अशी, की टाकळी झडशी (ता. सेलू) येथे गोपाल सुरेश पारटकर हा बियाणे पॅकिंग करून एचटीबीटी आड विकत असल्याची माहिती गुणनियंत्रणला मिळाली होती. त्यानुसार पारटकर यांच्या प्लॉटवरील टीनशेडच्या रूममध्ये छापेमारी करण्यात आली.\
शुक्रवारी (ता.९) सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १४६६ अनधिकृत बियाणे पाकिट साठा, खुले बियाणे विक्रीकरिता वापरण्यात येणारी कार, वजन काटा, बियाणे पॅकिंग कामी असलेली सिलींग मशिन यासह सुमारे ५० लाख तीन हजार ३०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोपाल पारटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हाधिकारी वानमती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलिस अधिक्षक अनुराग जैन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, कृषी अधिकारी सुनील मुरारकर, सेलू तालुका कृषी अधिकारी चंद्रकुमार माहुले, मनोज नागपूरकर, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, राहूल विटेकर यांनी केली.
या साहित्याचा आहे समावेश (चौकटीत किंमत रुपयांत)
निर्भया गोल्ड चॅलेंजर बियाणे : २७ पाकिटे (२७,०००)
तिलक रिसर्च सीड कॉटन : ७३९ पाकिटे (७,३९,०००)
आरसीएच ६५९ बीजीएस : २३ पाकिटे (१,१२,०००)
कबड्डी बीजीएस : ५६५ पाकिटे (५,६५,०००)
पींक कॉट बिग बॉल : ११२ पाकिटे (१,१२,०००)
आरसीएच ६५९ रिकामे पाकिटे : ५९५ पाकिटे (२९,७५०)
पिंक कॉट बीग बाल रिकामे पाकिटे : ४७७ पाकिटे (२३,८५०)
खुले कापूस बियाणे : ११८५ किलो (२६,३०,७००)
होंडा अमेज कार : १ (७,००,०००)
वन प्लस मोबाईल : १०,०००
सेलू तालुक्यातील कारवाईत खुल्या बियाण्यांचा साठा व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. त्यावरूनच एचटीबीटी आड शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरवठा होत असल्याचे सिद्ध होते. या संदर्भातील भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये.- चंद्रशेखर कोल्हे, विभागीय तंत्र अधिकारी, कृषी सहसंचालक कार्यालय, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.