Kolhapur News : इथेनॉलची निर्मिती वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत ऊस, साखर, मका यासह अन्य धान्यांपासून इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न सुरू असताना आता बटाट्याच्या सालीपासूनही इथेनॉल निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी कच्च्या बटाट्याच्या अवशेषांपासून सेंद्रिय इथेनॉल निर्मितीच्या नवीन पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधन ‘वेस्ट टू वेल्थ’ उपक्रमांतर्गत केले गेले आहे.
स्कूल ऑफ बायोकेमिकल इंजिनिअरिंगचे सहायक प्राध्यापक डॉ. अभिषेक ढोबळे व एम.टेक.ची उन्नती गुप्ता या विद्यार्थिनीने हे संशोधन केले आहे. त्यांनी बटाट्याच्या सालीचे घटक इथेनॉलमध्ये प्रभावीपणे रूपांतरित करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. या प्रयोगाला शासकीय औद्योगिक जोड मिळाल्यास हे संशोधन क्रांतिकारी ठरू शकते, असा दावा इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सध्या उत्पादित होणाऱ्या बटाट्यापैकी आठ ते दहा टक्के बटाट्यापासून(सुमारे ५० लाख टन) चिप्स तयार करणे व तळण्यासारखी प्रक्रिया केली जाते. बटाटा काढण्यापासून ते बाजारात आणि पर्यंत अनेकदा विविध कारणाने बटाटा खराब होतो. अशा बटाट्यांच्या अवशेषाचा वापर जर या इथेनॉल निर्मितीसाठी केला तर ते खूपच फायदेशीर ठरू शकते.
बटाटा खराब झाल्याने तयार होणारा अन्न कचरा दूर होऊ शकतो. विशेषत: बटाट्याच्या सालीचे आता उपयुक्त आणि मौल्यवान उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी उद्योगपती व शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. हे संशोधन केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर ऊर्जा आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या क्षेत्रात क्रांती करणारे ठरू शकते, असे ही इन्स्टिट्यूटच्या तज्ञांनी सांगितले.
बटाट्याच्या उत्पादनात भारत चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. सुमारे १५० लाख टन उत्पादनासह उत्तर प्रदेश हे भारतातील बटाटा उत्पादनात आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना, आसाम, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्येही बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
सध्या ऊस, साखर व मक्यावरच मुख्यत्वे करून इथेनॉलचा भार आला आहे. कोणत्याही परिस्थितीत इंधन आयातीचा खर्च कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी केंद्र सर्व स्तरावरून प्रयत्न करत आहे. इथेनॉल निर्मितीमध्ये बटाटा ही कच्चा माल म्हणून वापरल्यास याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.